Wednesday 15 April 2015

मृण्मयी -6

आधीचे भाग इथे वाचा
भाग -१   भाग -२  भाग-३ भाग-४  भाग-५

डोक बधिर झालं होत तीच . तशीच पाय ओढंत ओढंत ती निघाली . सगळ जग सुन्न झालं होतं . मागून येणाऱ्या ट्रक चा हॅार्न पण ऐकू आला नाही तिला . जेव्हा शुध्द आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती . बाजूला काका होते . तिने आजूबाजूला नजर फिरवली , मीत दिसला नाही तिला .
 डोळ्यात पाणी आलं तिच्या , काकांच्या लक्षात आलं . तिच्या डोक्यावर थोपटून ते म्हणाले ,"अगं , आत्ताच घरी गेला आहे तो . संध्याकाळी येईल परत ".
तिच्या नकळत काकांनी डोळ्यातलं पाणी लपवलं . मनु ला परत ग्लानी आली . असेच दिवस जात होते , शुद्ध - बेशुद्धीच्या वेशीवर . आणि एक दिवस असा उजाडला कि तिला खूप फ्रेश वाटंत होतं . आज मीत येईपर्यंत आपण जाग राहायचंच असा तिने निर्णय घेतला . रोज तो नुकताच गेलेला असायचा आणि काकाच समोर असायचे . असा कसा हा ? आणखी थोडा वेळ का नाही थांबला ??. असे प्रश्न डोक्यात यायचे तिच्या . आपण काहीतरी विसरतो आहे असं सारंख वाटंत होतं तिला , पण काय लक्षात येत नव्हंत . आठवायचा प्रयत्न केला कि ग्लानी यायची तिला .
पण आज मात्र असा काही वाटत नव्हंत . सकाळी डॉक्टर येवून गेले होते आणि त्यांनी तिला २-३ दिवसात घरी जाता येईल म्हणून सांगितलं होतं . आज काका पण चांगल्या मूड मध्ये होते .
"आपण लवकरच घरी जाऊ हं मनु "
"हो काका , मला पण कंटाळा आला आहे इथे ".
"हो ग , समजू शकतो मी ".
"काका , मीत कधी येणार आहे ? आज मात्र मी झोपणार नाही हं , तो आल्याशिवाय ".
"अगं सांगायचो विसरलो मी , आज येणार नाहीये तो . शहरात नाहीये , बाहेर गेला आहे , कामासाठी . ३-४ दिवस लागतील म्हणाला होता ".
"असा कसा काका हा ? एक फोन पण केला नाही त्याने इतक्या दिवसात ". खट्टू होवून मनु म्हणाली .
"अग , विचारलं होत त्याने डॉक्टरांना , पण डॉक्टर नको म्हणाले , सध्या फोन वगैरे काही नको ".
"का ? फोन का नको म्हणाले ?"
"काही माहिती नाही गं ? झोप बघू तू आता ? किती प्रश्न विचारतेस ? लवकर घरी जायचं आहे नं ? मग झोप ".
असा बोलून काका खिडकीपाशी बाहेर बघत उभे राहिले . मनु ला पहिल्यांदा जाणवलं काहीतरी बिनसलं आहे . आपण काहीतरी विसरलो आहोत. तिने आपल्याला  काय आठंवत नाही ते आठवण्याचा प्रयत्न केला , पण उपयोग झाला नाही .
सकाळी सकाळी ती दचकुन जागी झाली आणि तिला तिची आणि  मीत ची भेट लख्ख आठवली . सगळ अंग घामेजलं तीच . ती तशीच उठून बाहेर आली आणि समोर रीसेप्शन वर जाउन तिने मीत चा फोन नंबर फिरवला .
'हा नंबर अस्तित्वात नाही , this number does not exist ' सतत हीच ट्युन ऐकायला यायला लागली . गोंधळून गेली ती . सारखा सारखा नंबर फिरवत राहिली . तेवढ्यात मागून काका आले . त्यांनी तिला फोन खाली ठेवायला लावला आणि काही न बोलत तिला खोलीकडे घेवून आले .
"काका काका , अहो त्याचा नंबर लागत नाहीये , असा कसा होईल ? कुठे आहे तो ? मला भेटायला का आला नाही? त्याने रोहीणिशी लग्न केलं का ?"
प्रश्नाच्या धबडग्यात अचानक तिच्या लक्षात आलं , काकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे .
"तो. . . तो ठीक आहे नं काका ? " आता मात्र धीर सुटायला लागला तिचा . खोलीमध्ये डॉक्टर पण आले होते .
"मनु बाळ  , तू शांत हो जरा . मीत … मीत या जगामध्ये नाही आता ".
"काय ?" विस्फारल्या डोळ्यांनी मनु बघतच राहिली
" हो , त्या दिवशी तू बाहेर पडल्यावर , रोहिणीच्या वडलांच आणि मीत च खूप जोरात भांडण झालं . त्यात रोहिणीच्या वडिलांचा तोल गेला आणि त्यांनी मीत वर हात उचलला . मीत टी-पॉय वर पडला . आणि … आणि मनु त्याच डोकं जोरात आपटलं . डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही ". काकांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या . मनु तशीच होती स्तब्ध . डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी तिला झोपेच इंजक्शन दिलं .
ते दिवस कसे सरले एकट्या मनुला माहिती . आपण का जगतोय ? याचा विचार करत तासंतास घालवले तिने . मीत ची प्रत्येक आठवण तिचा छळ करत होती . उठता बसता , सगळीकडे तिला मीत च दिसत होता . न भूक लागत होती न तहान , न झोप यायची न जाग रहाव हि इच्छा . तिच्या अवती भोवती सतत काका असायचे . जबरदस्तीने तिला भरावयाचे , सतत रडणाऱ्या आणि त्रास करून घेणाऱ्या मनु ला बघून त्यांच आतडं तुटंत होतं . तिला यातुन बाहेर कसं काढाव हे काही त्यांना कळंत नव्हंत .
अशातच एक दिवस मीत चे वडील भेटायला आले त्यांना . मनुची अवस्था बघून घाबरले . तिच्या जवळ जात म्हणाले ," मनु , तुमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं माहिती आहे मला . तु सोडून दुसरा कोणताही विषय असायचा नाही आमच्यात . सुरवातीला मी नाही म्हणालो होतो कारण मला त्याचं भविष्य चांगल घडलेलं हव होतं . पण मनु , त्याने तुझ्यावर इतक प्रेम केलं आहे कि काय सांगू ? तुमच्या पुढच्या आयुष्याचे प्लान करून ठेवले होते त्याने . तुझ्याशिवाय जगणार नाही मी असा म्हणायचं गं तो . तुला खूप सुखात ठेवायचं होतं त्याला . तुझ्या तोंडावर दुःखाची सावली पण पडू द्यायची नव्हती त्याला . त्याच सगंळ तूच होतीस .पण मनु , आपल्या नशिबात नव्हंता ग तो ."
मनु स्फुंदून स्फुंदून रडायला लागली .
" बाळा , शांत हो . त्याचं आयुष्य तेवढंच होतं . पण मला माहिती आहे तो तुझ्या जवळच आहे . तो नक्कीच तुला बघंत असेल . तुझी अशी अवस्था बघून त्याला काय वाटंत असेल गं ? त्याला किती त्रास होत असेल ? तुला नाही का गं वाटत कि त्याला त्रास होवू नये ?"
रडत रडतच मनुने मान हलवली .
"मग मनु , आता रडंण बस . माझा मीत आपल्या दोघांवर लक्ष ठेवून आहे . त्याला त्रास होईल असा काहीही आपल्याला करायचं नाहीये ".
"हो बाबा " मनुच्या तोंडून निघून गेलं . मीत च्या बाबांचे पण डोळे पाणावले .
"बाबा म्हणतेस नं ? मग या बाबांच ऐकायचं . उद्यापासून नोकरी परत सुरु करायची . डोळ्यातून पाणी न काढता राहायचं . आणि अधे मध्ये या बाबाला भेटायला यायचं ".
"हो बाबा" म्हणत मनु त्यांच्या कुशीत शिरली आणि दोघांनी पण पोटभर रडून घेतलं .
त्यानंतर मात्र मनु रडली नाही . ऑफिस च्या कामात गुंतवून घेतलं तिने . अधून मधून मीत च्या बाबांना भेटायला जायची . हळू हळू त्यांच्याबरोबर ती बाहेर जायला लागली , थोडी मोकळी व्हायला लागली . ती , काका आणि बाबा असा छानसा ग्रुप झाला तिचा . हळूहळू चेहऱ्यावर हसू पण यायला लागलं .
आणि तेवढ्या मागच्याच वर्षी मीत चे बाबा हार्टट्याक ने गेले . जाताना त्यांचा फ्लॅट मनूच्या नावावर करून गेले .
मनुला खुप एकंट एकंट वाटायला लागंल . पण काकांच्या कडे बघून ती सावरली . अलीकडे तर काकू पण गोड बोलायची तिच्याशी . दोघांच पण वय झालं होतं . काकांना आता तिच्या एकट्या राहण्याची काळजी वाटायला लागली . त्यांनी मनु पाशी विषय काढला .
आम्ही पिकलं पान , कधीही गळून पडू . आमच्या डोळ्यासमोर तुझे दोनाचे चार झाले तर मरताना माझी काळजी मिटेल .
हो, नाही करता करता मनु तयार झाली . आणि आज हे स्थळ आलं होतं . मनूच्या डोळ्यासमोरून मागची ५ वर्षे झर्रकन निघून गेली .
ती विचारात CCD पाशी पोहोचली . तर मंद हसत प्रसाद तिची वाट बघत होता . हातातला पुष्पगुच्छ तिच्यापुढे धरत तो म्हणाला ," खूप छान दिसते आहेस मनु तू ".
मनूच्या नकळत लाजली ती .
दोघ कॅफी ची आॅर्डर देवून आत बसले . कुठून सुरवात करावी असा विचार करत असतानाच प्रसाद म्हणाला ," मनु , काका बोलले आहेत सगंळ माझ्यापाशी . काहीही सांगू नकोस . तू मला पाहताक्षणीच अावडलीस . आयुष्य काढायचं तर तुझ्याबरोबरंच असा ठरवलं मी . एक खात्री देतो तुला , तुला त्रास होईल असा काहीही मी करणार नाही . मी मीत ची जागा नाही घेवू शकणार आणि मला तसं काही करायचं पण नाहीये . पण मनु , येणारं भविष्य आपलं असणार आहे आणि ते फक्त तुझ माझं असावं असं वाटतय मला . तुझ्या साथीनेच येणारा प्रत्येक क्षण उपभोगायचा आहे".
प्रसाद च्या मोकळ्या बोलण्यामुळे  हळू हळू मनु च्या चेहऱ्यावर मंदहास्य यायला लागलं . 

Monday 13 April 2015

मृण्मयी -5

मनु खोलीत परत आली तोपर्यंत मीत चे ३-४ मेसेज आणि तेवढेच काॅल येवून गेले होते . मित चा चेहरा डोळ्यापुढे आला आणि मनु च्या डोळ्यात पाणी आलं . काकूंच्या पदर पसरण्यामुळे तिने काय निर्णय घेतला आहे याची तीव्र जाणीव तिला झाली . काय करावं ? कस सांगाव मित ला ? का काही बोलूच नये ? आपलं आयुष्य महत्वाच कि एका आईचं गार्हाण ? मनु गोंधळून गेली .
तेवढ्यात फोन वाजला,
"मनु , अग मनु , कुठे आहेस सकाळपासून ? किती फोन करतोय तुला ? बरी आहेस ना गं ? काकू काही बोलली का परत ?" मित चा काळजीने भरलेला आवाज ऐकून मनूच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या . तिला काहीच बोलता येईना .
"मनु , बोल नं ".
"उं. .उं. ." मनुचा हुंदका तीव्र झाला
"रडत्येस ? का गं ? बोल गं ? मला काळजी वाटतेय तुझी आता . मनु , राणी , बोल please बोल पिल्ल्या ".
आता मात्र मनु ला असह्य झालं . तिने फोन बंद केला आणि छातीशी घट्ट धरून हुंदका आवरायचा प्रयत्न करायला लागली . फोन वाजतच राहिला पण मनुने घेतला नाही .
घरी काकूची बोलणी नकोत म्हणून ती ऑफिस ला गेली , पण तीच मन ताळ्यावर नव्हंत अज्जिबात . कशातच लक्ष लागत नव्हंत .
३.३० -४ च्या सुमारास ऑफिस च्या शिपायाने सांगितलं कि कुणीतरी तिला भेटायला आलं आहे . कोण असेल म्हणून मनु बाहेर गेली . मित होता समोर . मनुला धक्का बसला , तो असा ऑफिस मध्ये येईल असं वाटलं नव्हंत तिला .
"काय झालंय तुला ? अशी का दिसते आहेस ?" मित ने विचारलं .
मित च्या चेहऱ्याकडे बघवत नव्हंत मनु ला . त्याचा प्रश्न टाळून तिने विचारलं , " तू , तू इथे कसा ?".
"मनु तू विचारावंस मला हे ? सकाळपासून माझा फोन घेतला नाही आहेस , स्वत: फोन करत नाही आहेस ? किती काळजी करू मी ? मला कळेना काय झालंय नक्की ते ? " बघतां बघतां मित चा आवाज वाढायला लागला . तशी इकडे तिकडे बघत मनु त्याला म्हणाली ," शु... मित , हळू . sorry रे . संध्याकाळी भेटते तुला , ६. ३० वाजता . " बोलून मनु वळली पण. तिच्याकडे आश्चर्याने बघणाऱ्या मीत कडे बघायची हिम्मत होत नव्हती तिला .
संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेटल्यावर धुसफुसत मित तिला म्हणाला ," काय चालंल आहे तुझं मनु ? का असा छळ करते आहेस माझा ?".
मनुला आता स्वत:ची खूप ताकद एकत्र करावी लागली ," मीत , आपण आता भेटता कामा नये . तुझ लग्न ठरलं आहे ." असं म्हणून सकाळी झालेला सगळा प्रकार तिने मित ला सांगितला आणि तिचा निर्णय पण .
" तू , तू निर्णय घेवून पण टाकलास ? तुझ्या आणि माझ्या वतीने ? मला काय हवं आहे याची पर्वा न करता ? आपलं आयुष्य आहे हे मनु आणि कोणीही येवून तुला माझ्यापासून दूर करू शकत नाही . " मित चा संताप संताप झाला होता अगदी . तो इतका संतापला कि काही काळ त्याला बोलतां पण आलं नाही . मनु घाबरून त्याच्याकडे बघत राहिली .
दोन  क्षण गेल्यावर खूप हळुवारपणे तिने हाक मारली ,"मीत ". मित ने तिच्याकडे बघितलं आणि त्याला जाणवलं ती खूप घाबरली आहे . त्याचं अवसान गळालं .
"काय करून बसलीस मनु तू हे ?", कशाचीही पर्वा न करता मीत ढसाढसा रडायला लागला . मनु ला स्वतः ला आवरण खूप कठीण जात होतं . आजूबाजूच्या टेबलावरच्या मन आता त्यांच्याकडेच बघत होत्या . तिने मितच्या खांद्यावर हात ठेवला , "सावर मित , आपण इथून बाहेर जाऊया . दूर कुठेतरी ".
मित आणि ती बाहेर पडले तेव्हा तिला असा वाटंल कि मित तिच्यापासून कोसो मिल दूर आहे . तिच्या गळ्यात हुंदका दाटून आला .
मित ने काहीही न बोलता तिला घरी सोडलं . मनु च्या गळ्यात हुंदका अडकला . मित तिच्याकडे बघायला पण तयार नव्हता . आता मात्र रात्र डोळ्यात उतरली होती तिच्या . ना धड रडू येत होतं ना झोप . सगळंच कसं अस्थिर वाटंत होतं . कालची रात्र दुसर्या जन्मातली वाटंत होती .
सकाळी सकाळी मित चा फोन आला . खूप अधीरपणे तिने घेतला . " तुझ माझ्यावर प्रेम होत होत माहिती आहे मला , त्याच प्रेमासाठी आत्ता घरी ये ", एवढ बोलून त्याने फोन ठेवून दिला . मनु ला कळेना काय करावं . तिने परत फोन लावायचा प्रयत्न केला पण स्वीच ऑफ आला . धास्तावलेली मनु गडबडीने त्याच्या घरी निघाली .
दारावरची बेल दाबली . बराच वेळ कुणी दार उघडेना . मनु ला कळेना काय करावं . ईतक्यात दार उघडलं . समोर मीत आहे हे कळायला काही सेकंद जावे लागले तिला . रात्रभर न झोपल्यामुळे तारवटलेले डोळे , चुरगळलेला शर्ट . मनु आत आली , तसा तिचा हात पकडून मीत ने विचारलं ,"आता कशी आलीस ? मी नकोय नं तुला तुझ्या आयुष्यात ? मग का आलीस ?"
त्याचा अवतार बघून घाबरलेल्या मनूच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ," मीत , please ".
"please काय please ?"
"मीत , तुला लांब करून मी तरी कुठे जगणार आहे रे ? मला किती  त्रास होतो माहिती आहे का याचा ?" स्फुंदत स्फुंदत तिने विचारलं .
"मग का करते आहेस राणी तू हे सगळं ? माझ्या पिल्ला नको नं दूर करू मला . बघ रोहिणी विसरून जाइल हे सगळं . मग फक्त तुझं आणि माझं आयुष्य राहील मागे . नको ग करू असा . तू नसशील तर वेडा होईन मी राणी ". बघता बघता मित तिच्या कुशीत शिरला . मनूला स्वत:ला सावरणं खूप कठीण गेलं . तिने मित च्या केसांवरून हात फिरवत त्याच्या कपाळावरती आपले ओठ ठेवले .
मित ने तिच्याकडे बघितलं आणि तिला घट्ट मिठी मारली . "मनु नको ना गं जाऊ , मला सोडून नको जाऊ ".
मित इतका कळवळून बोलला कि मनु पूर्ण विरघळली . काही न बोलता ती त्याच्या मिठीत शिरली . थोड्या वेळाने जेव्हा भानावर आली तेव्हा काय झालं हे जाणवून लाजली . आता मात्र मित पासून दूर जायचं नाही हे पक्क ठरवलं तिने .
कपडे ठीकठाक करतेय तोपर्यंत दारावरची बेल वाजली . मित तसाच झोपला होता . काय करावं न सुचून तिने दार उघडंल . समोर रोहिणीचे पप्पा उभे होते . ते पण आवक झाले मनु ला बघून .
" तू ? इथे ?"
"उं. . . हो " मनु जेमतेम बोलली . तेवढ्यात ते आत शिरले , त्यांना परिस्थितीचा अंदाज आला . संतापुनच त्यांनी विचरलं ," तुझ काय काम आहे इथे ? तू मित च्या आयुष्यातून निघून जाणार  म्हणून वचन दिलं होतंस नं ? मग इथे काय करते आहेस ? "
मनूच्या तोंडून शब्द फुटत नव्हता .
"चल निघ इथून . झालं गेलं विसरून जा . परत जर मला तू मित च्या आसपास दिसलीस तर तो मात्र आपल पुढंच आयुष्य जगू शकणार नाही , हे लक्षात ठेव ".
मनु खूप घाबरली , गोंधळली . ती तशीच उभी राहिली . रोहिणीच्या पप्पांनी हात धरून तिला बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला .

क्रमश :

















Wednesday 4 March 2015

मृण्मयी -४

आता सगळे दिवस आनंदाने भरलेले होते . सगळं जग एकीकडे आणि मीत आणि तीच जग दुसरीकडे , असं काहीसं वाटत होतं तिला . येणारा प्रत्येक दिवस मीत प्रेमाने भरून टाकत होता , जणू आधीची सगळी दु:खं पुसून टाकायची होती त्याला . मृण्मयी ला त्याच्या बरोबर काढलेला प्रत्येक क्षण जसा च्या तसा आठवत रहायचा . तिला मीत भेटला कि काळ तिथेच थांबून रहावासा वाटत होता . दोघं मिळून त्यांच भविष्य रंगवत रहायचे .
एवढ्या काळात तिची आणि रेणुकाची काही परत भेट झाली नव्हती . तरीपण मृण्मयीला एक प्रकारचं आश्चर्य वाटत होतं कि रेणुकाने हे सगळं स्वीकारलं कसं ? एके दिवशी तिने मीत ला विचारलंच . मीत चा चेहरा पडला , तो काहीच बोलला नाही . मृण्मयीने खूपच हट्ट धरला .
"मनु ", मीतचा आवाज पडला होता .," मी सांगितलं नाहीये अजून रेणुकाला ".
"काय ?" मनु ला एकदम खुप अस्वस्थ वाटलं .
"मला संधीच मिळाली नाहीये गं "
"अरे पण मीत , हे असं कसं चालेल ?"
"मनु , तू काळजी नको ग करू , मी सांगेन त्यांना . मी ठरवलं होतंच कि १-२ दिवसात सांगेन . कारण , कारण ".
"कारण काय मीत ?" धास्तावलेल्या आवाजात मनु ने विचारलं .
"मला असं वाटतंय कि ते सगळे लग्नाच्या तयारीला सुरवात करतील लवकर . कालच रेणूच्या पपांचा फोन आला होता . १-२ दिवसात भेटून लग्नाची तारीख पक्की करूया म्हणून ". त्याच पडलेल्या आवाजात मीत सांगत होता .
मनु ला आपण काय बोलावं हे सुचेना . ती वेड्यासारखी मीत च्या चेहऱ्याकडे बघतच राहिली . खूप अस्वस्थता दाटून आली तिच्याभोवती अचानक . ते घरी जायला निघेपर्यंत मीत तिची समजूत काढत राहिला , पण मनु च्या कानापर्यंत जणू काहीही पोहोचतच नव्हंत .
त्याच अस्वस्थतेत ती घरी आली . रात्री स्वप्नात पण आपण कुठेतरी खोल काळोखामध्ये बुडतोय अशीच स्वप्नं पडत राहिली तिला . सकाळ पण अस्वस्थच होती . मीतला भेटावं आणि त्याच्याशी बोलावं अशी तीव्र इच्छा झाली तिला . काकांनी विचारलं पण तिला , काही बिनसलं आहे का ? काकू तर संशयानच बघत होती .
इतक्यात दारावरची बेल वाजली . एवढ्या सकाळी कोण आलं म्हणत काकांनी दरवाजा उघडला . कोण आलं आहे , बघायला बाहेर आलेली मनु दचकलीच . रेणुका ची आई होती . रडुन रडून डोळे सुजलेले आणि चेहऱ्यावर प्रचंड काळजी .
"या न काकु , आत या . रेणु ठीक आहे नं ?" मनु ने पुढे होत विचारलं .
काकुंनी रडायला सुरवात केली ," तुझ्यापुढे भिक मागते मृण्मयी , तू मीत ला सोड . माझ्या रेणु ला वाचव ".
मनु दचकलीच . काय हे ?
" काल रात्री मीत घरी आला होता . त्याने हे लग्न होणार नाही म्हणून सांगितलं आहे . त्याच तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याला रेणूशी लग्न करायचं नाहीये ", काकू स्फुंदत म्हणाल्या ," माझ्या लेकीला वाचंव गं , कालपासून रडतेय , जीव द्यायची धमकी देतेय . आज सकाळी तर गळफास लावून घ्यायचा पण प्रयत्न केला . तिचे पप्पा वेळेवर पोहोचले म्हणुन बरं ".
मनु दिग्मूढ झाली.
"पदर पसरते ग मृण्मयी तुझ्यापुढे . माझी एकुलती एक लेक आहे गं . उद्या तिला काही झालं तर , मी कशी जगु गं ? तू मीत ला आज नाहीतर उद्या विसरून जाशील . तो पण रेणूशी लग्न झाल्यावर तुला विसरेल . ऐक गं . एक आई भिक मागतेय तुझ्याकडे ".
मनु च्या डोळ्यातून नकळत पाणी यायला लागलं. आई , अशी असते ? एवढं प्रेम ? माझ्या पेक्षा किती मोठ्या आहेत या आणि रेणु साठी इतक्या व्याकूळ होत आहेत ? माझी आई असती तर ? तिने पण असंच केलं असत का ? ती पण अशीच धावून गेली असती का?
विचारात अडकलेल्या मृण्मयीच्या खांद्यावर काकांनी हात ठेवला आणि ती भानावर आली . रेणुची आई तशीच तिच्यापुढे पदर पसरून रडत होती .
तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला ," काकु , रेणू खूप भाग्यवान आहे . मी कधीच आड येणार नाही तिच्या . "
काकुनी तिच्याकडे बघितलं आणि एकवार या आईवेगळ्या पोरीला कवटाळावसं वाटल त्यांना . पण त्या घाईघाईने बाहेर पडल्या .
मनु तिच्या खोलीत आली . मोबाईल बघितला तर मीत चे जवळ जवळ १० फोन होते आणि तितकेच मेसेज पण होते . तिने मेसेज उघडले . त्यात त्याने रेणु ला लग्न करणार नाही म्हणून सांगितलं आणि त्यावर घरी झालेला गोंधळ सांगितला होता . तो खूप आनंदात होता कारण शेवटी त्याच त्याच्या बाबांनी ऐकल होतं . त्याला लवकरात लवकर मनु ला भेटायचं होत .
मनूच्या नकळत तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला . तिच्या लक्षात पण आलं नाही कि तिच्या मागोमाग तिचे काका पण आत आले होते .
"बाळ ", काकांनी खूप प्रेमाने हाक मारली तिला . मनु वळली आणि काकांच्या मिठीत गेली . तिच्या पाठीवर थोपटत ते म्हणाले
"मनु , किती अवघड निर्णय घेतला आहेस . मागचे काही दिवस तुझ्या आनंदात असण्याच कारण मला आत्ता कळलं आणि त्याचबरोबर तुझा निर्णय पण . बाळा, त्या बाईच तू ऐकायला हवं असं नाहीये . तुमचं जर खरंच एकमेकांवर एवढं प्रेम असेल तर , मी तुझ्या पाठीशी उभा आहे ".
मनु थोडी शांत होत म्हणाली ," नाही काका . माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे . पण एका आईचं आपल्या मुलीवर जेवढं असंत तेवढं नाही . काका , माझी आई असती तर , तिनेपण असंच केलं असंत नं ? आणि मग माझी आई जर माझ्याकडे काही मागायला आली असती तर , मी नाही म्हटलं असंत का ? काका , मी माझा जीव पण दिला असता ".
काकांच्या डोळ्यात पाणी आलं . त्यांना खूप आतून त्यांच्या दादा आणि वहिनीची आठवण आली .
मनुला आता मीत ला काय आणि कसं सांगाव हे कळंत नव्हत . ठरल्याप्रमाणे तिने त्याला भेटायचं ठरवलं .





मृण्मयी -३

मनु कशीबशी स्वतःला सांभाळत घरी आली . स्वतःच्या खोलीमध्ये बसून पोटभर रडावसं वाटत होत तिला . तीने पर्स टेबलावर ठेवली , आणि काकूने हाक मारली . काकूचा चिडका आवाज ऐकून धडकीच भरली तिला . ती हाॅल मध्ये आली . काका पण तिथेच होते , त्यांचा चेहरा पडला होता आणि काकू रागाने लालबुंद झाली होती. ती जशी हाॅल मध्ये आली तशी काकू कडाडली ,
" लाज नाही वाटत तुला ? मैत्रिणीच्या होणा-या नव-यावर डोळा ठेवायला ?"
मनु बघतच राहिली . आपण काही बोलायला हवं हे पण सुचलं नाही तिला .
" आई - बाबा विना पोर म्हणून पोटच्या पोरीप्रमाणे वाढवली तुला , ते काय असले खेळ करायला ?"
हे शब्द तिच्या कानात सळईप्रमाणे घुसले आणि ती बधिर झाली . सगळ अंग गरम झालं तीच , कानशिलं तापली . काकू काय बोलतेय हे पण कळेनासं झालं . काकू कदाचित बराच वेळ बोलत होती , मग काकांनी तिला आत नेलं . तिला शांत करून ते बाहेर आले आणि त्यांना मनु खाली कोसळलेली दिसली .
मनु ला जेव्हा जाग आली तेव्हा आपलं डोकं खूप जड झालंय हे जाणवलं . तिला पटकन आपण कुठे आहोत हे कळेचना . तिने परत डोळे मिटले आणि काकांचा हात कपाळावर जाणवून उघडले . आता तिच्या लक्षात आलं . ती हाॅल मधेच सोफ्यावर झोपली होती , आणि काका शेजारी बसले होते , चिंताग्रस्त .
"कसं वाटतंय बाळा ?" काकांनी खूप प्रेमाने विचारलं .
मनुने बोलायचं प्रयत्न केला , पण तिच्या तोंडातून शद्ब फुटला नाही . आपल्या तोंडाला कोरड पडलेली जाणवली तिला.
"थोडं पाणी घेतेस का ?" काकांनी परत विचारलं . तिने मान डोलावली . काकांनी तिच्या मानेखाली हात देवून तिला उठवलं आणि तिच्या हातात पाण्याच भांड दिलं . पाणी पिल्यावर तिला थोडी हुशारी वाटली .
आणि काय झालं होतं ते पण आठवलं . बघता बघता तिचे डोळे भरून आले . हुंदका दाबून ती म्हणाली ," काका, यात... "
तिला तिथेच थांबवत काका म्हणाले ,
"मनु , शांत हो बाळा . मला काय नक्की झालं हे माहिती  नसलं तरी तुझी यात चूक नसणारच . माझे संस्कार इतके तकलादू असूच शकत नाहीत . तू शांत हो आणि नंतर सांग मला काय झालय ते . इथे नक्कीच काहीतरी समजण्यात घोटाळा आहे ".
काकांच्या बोलण्याने मनुचा हुंदका बाहेर पडला . तिने मीत भेटल्यापासून जे जे घडलं होतं , ते सगळं काकांना सांगितलं . काका गंभीर झाले , " तुझी काहीच चूक नाहीये मनु , पण यापुढे तू त्यांच्याबरोबर जात जाऊ नको . काकूची समजूत कशी काढायची ते मी बघतो ".
आई - बाबा गेल्यावर काका जेव्हा पहिल्यांदा तिला घरी घेवून आले तेव्हापासून तिने सतत काकुच्या कपाळावर आठ्याच पहिल्या होत्या . पण काकांच्या प्रेमाच्या बळावर ती सगळं सहन करत होती . काकाचं तिच्यावर आणि तीच काकांवर खूप प्रेम होतं . प्रत्येकवेळी काका तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते , आत्तापण ते तसेच तिच्या पाठीशी होते , तिला कसलाही दोष न देता .
मनु आपल्या खोलीत आली . तीच डोकं अजूनही दुखंत होतं.तिने डोकेदुखीवरची गोळी घेतली आणि बघता बघता गाढ झोपली. रात्रीत कधीतरी जाग आली तिला . किती वाजले बघण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला , तर मीत चे २-३ मेसेजेस आले होते . तिने whats app उघडलं .
'I'm really sorry मनु . रेणुने जे काही केलं त्याबद्दल खरंच , मनापासून माफी मागतो तुझी . तिने तुझ्या घरी पण फोन केला म्हणून सांगितलं मला . सगळ ठीक आहे नं ?
दुसरा मेसेज होता , 'मनु , तू खूप disturb झाली असशील माहिती आहे मला . हे सगळं माझ्यामुळे झालं , पण काय करू गं ? तुझ्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही मी '.
तिसरा मेसेज होता ,' मनु , एकदा भेटशील का गं मला ? फक्त एकदा . आपण दोघेच . रेणू नको . please ?'
मनु ला काय करावं कळेना . जे झालं ते सगळं आठवंत होतं तिला आणि दुसरीकडे आपल्याला please लिहिताना मीत चा चेहरा किती केविलवाणा झाला असेल , असं पण वाटंत होतं .
तेवढ्यात परत एक मेसेज आला ,' मनु online दिसते आहेस . तूच आहेस नं ?' तिने काहीच उत्तर दिलं नाही .
परत मेसेज आला ,' बोल मनु . तूच आहेस नं ? '
'हो ' तिने शेवटी उत्तर दिलं .
'भेट नं एकदा , please '.
'मीत , अरे कसं शक्य आहे ? '
'का शक्य नाही ? मला एकदा भेटून सगळं सांगू तर दे तुला . '
मनु ला कळेना काय लिहावं यावर , खरंच एकदा भेटायला काय हरकत आहे ? आणि तसंपण एवढ सगळं झाल्यावर आपल्याला नक्की काय घडलंय हे जाणून घ्यायचा हक़्क़ तर आहेच .
'मनु ????' मीत ने परत बीप केलं .
'ठीक आहे ' मनुने शेवटी हो म्हणून टाकलं .
'thank you so much my dear . उद्या साधारण ११ वाजता तू बाजारापाशी उभी रहा . मी गाडी घेवून येतो आहे . आपण किल्ल्यावर जाउन येवू .'
'इतक्या लांब ?'
'हो , कारण तिथे आपल्याला बोलतां येईल आणि कुणी बघणार पण नाही '
'हं , ठीक आहे '.
उद्या मीत काय बोलेल याचा विचार करत करत तिला झोप लागली .
"काकु , संध्याकाळी थोडी उशिरा येईन . ऑफिस मध्ये थोडं काम आहे आणि नंतर जेवण पण ".
मनुला सहाच महिने झाले होते नोकरी करायला सुरवात करून  , आणि तिथेच तिला रेणुका भेटली होती आणि नंतर मीत .
जेवणाच कारण तिने मुद्दाम काकूला सांगितलं होतं . मीत ला भेटून आल्यावर तिला काकु समोर जायची इच्छा नव्हती. आॅफीस मधे फोन करुन तीने ती येत नसल्याच कळवलं .
तिने बाजारात फिरून थोडा वेळ काढला . तिथल्या आवाजांनी जर बरं वाटलं , निदान तिच्या डोक्यातले विचार बाजूला पडले . ठरलेल्या वेळी मीत आला आणि ती त्याच्या गाडीत बसली . बसताना कुणी बघत नाहीये याची खात्री करून घेतली तिने .
किल्ल्यावर पोहोचेपर्यंत दोघेही एकमेकांशी काहीही बोलले नाहीत . तिथे पोहोचल्यावर तिथल्या बागेत दोघेही जाउन बसले . कुणीच काही बोलत नव्हंत  . शेवटी मीत नेच सुरवात केली .
"मनु , मला खूप काही सांगायचं आहे तुला ."
"बोल नं ", मनूच्या गळ्याशी आवंढा आला एकदम .
"रेणू जे काही बोलली त्याबद्दल माफी मागतो मी तुझी ", असा म्हणून त्याने खरंच तिच्यापुढे हात जोडले . तिने नकळत त्याच्या हातांवर आपले हात ठेवले आणि म्हणाली ,
"नको रे मीत , यात तुझी काहीच चूक नाहीये . माझं नशिबच असं आहे ", डोळे भरून आले तिचे आणि तिला जाणवलं आपण मीत च्या हातांवर हात ठेवले आहेत . तिने गडबडीने ते बाजूला केले , पण तोपर्यंत मीत नेच तिचे हात पकडले .
" मनु , रडू नको. मी तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत . चूक माझीच आहे गं . मी आधीच बोलायला हवं होत हे सगळ्यांशी .रेणु ला मी आवडतो हे माहिती आहे मला , आमच्या घरी आमच्या लग्नाची बोलणी पण सुरु होती . पण माझ्यापाशी अजून कुणी शब्द काढला नव्हता . मला तिच्या पपांच्या business मध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये गं . मला माझ्या बळावर सगळं उभं करायचं आहे . पण माझ्या पप्पानी आणि त्यांनी मिळून जे काय ठरवलं होतं त्यातलं मला काहीच माहिती नव्हतं .
आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हाच तू आवडलीस मला. हळू हळू तुझ्यामध्ये गुंतत गेलो. तुला सगळं सांगायचं ठरवलं पण धीर झाला नव्हता . तू नाही म्हणाली असतीस तर मला सहन झालं नसतं. माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर . आणि मला माझं आयुष्य तुझ्याबरोबरच काढायचं आहे . "
"पण , मग रेणूशी झालेला साखरपुडा ?".
"सांगतो मनु , सगळं सांगतो . रेणूने त्या दिवशी हॉटेल मध्ये हंगामा केल्यावर मी घरी जाउन पप्पांशी बोललो . आणि त्यांनी मला emotionally blackmail केलं . आई गेल्यावर त्यांनीच माझं सगळं केलं होतं. वय असूनही दुसरं लग्न करायचं टाळलं त्यांनी . या लग्नानी  माझच भलं होणार आहे हे त्यांच्या मनानी घेतलं होतं . आणि त्यापुढे ते माझं काहीही ऐकायला तयार नव्हते . त्याच दिवशी रात्री रेणूचे पप्पा आमच्या घरी आले , आणि साखरपुडा ठरवून गेले . पप्पानी मला गप्प राहायला सांगितलं , स्वतःची शप्पथ घातली . मला काही करता आलं नाही गं ." बोलता  बोलता मीत चा गळा भरून आला.
"पण आता नाही . मला रेणू बरोबर लग्न करायचं नाही . मला तुझ्याबरोबर राहायचं आहे . गेले दोन दिवस माझी प्रचंड घुसमट होतेय . न जेवण जातंय अन झोप येतेय . डोळ्यापुढे सारखा तुझा हॉटेल मधला रडवेला चेहरा उभा राहतोय . मी साखरपुडा तोडून टाकतोय. पण मला तुझी साथ हवीये . देशील ना ग मनु मला साथ ? ". त्याचा काकुळतीचा स्वर एकुन  मनुला कसतरीच झालं .
"मित "
"नाही म्हणू नको मनु , मी जगू शकणार नाही तुझ्याशिवाय . माझ जग मला तुझ्याबरोबर हवंय. बोल मनु , देशील नं साथ ?"
मनुचे पाणावलेले डोळे त्याच्याकडे बघतच राहिले .
" मीत , मी … मी … ".
"नाही म्हणालीस तर आत्ता जीव देईन ". असा म्हणून मीत उठला पण . मनु धसकली. तिने पटकन मीत चा हात धरला .
" देईन , तू म्हणशील तशी साथ देईन तुला ". मीत खाली बसला . मनुकडे बघत म्हणाला ,"मनु , कसा सांगू तुला , मला आज काय वाटतय ते ?. या जगात जर सगळ्यात आनंदी कोण असेल , तर तो मीच आहे . ". त्याच्या हस-या चेहऱ्याकडे मनु बघतच राहिली आणि मंग हळू हळू त्या आनंदाची लागण तिला पण झाली . सगळ विसरून तिने मीत च्या खांद्यावर डोकं टेकलं आणि डोळे मिटून घेतले.





Tuesday 24 February 2015

मृण्मयी -2

मृण्मयी बघता बघता भुतकाळात शिरली .
"मनु , meet my friend , 'मीत' ", रेणुका ने तिची ओळख तिच्या बरोबर आलेल्या एका मुलाशी करून दिली . बघताक्षणीच तिला आवडले होते ते त्याचे डोळे , पिंगट रंगाचे , हसरे .
"काय गं ? कुठं हरवलीस ?" रेणुकाने , तिच्या मैत्रिणीने तिला भानावर आणले , तशी ती लाजलीच .
"oh , marvellous!", मीत म्हणाला .
" तू तिच्याशी अज्जिबात फ्लर्टिंग करू नको हं ', रेणुकाने त्याला दटावलं .
तसा खो खो हसत तो म्हणाला ," रेणु , वेडी काय गं तु ? काय वाटेल तिला ? मी दिसेल त्या मुलीच्या मागे लागतो असा समज होईल तिचा". बोलता बोलता त्याने मनु ला shake hand केलं .
मनुच्या स्वभावामुळे तिला फारशा मैत्रिणी नव्हत्या . पण रेणुकाशी तिची मैत्री चांगली होती . पण त्यातल्या त्यात ती एकटीच अशी होती कि जिच्या बरोबर मनु ला राहायला आवडत असे. 
ती घरी आली . राहून राहून ते पिंगट डोळे आपला पाठलाग करत आहेत असा वाटायला लागलं तिला . मीत दिसायला भारदस्त होता , आणि स्वभावाने मिश्किल पण . त्यामुळे त्याच्याबरोबर तिला गप्पा मारायला आवडू लागलं . आता तर सगळे प्लान्स त्या तिघांचे असायला लागले . भरपूर धमाल करायचे तिघे मिळून . मनुला हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी काळ आहे असं वाटायला लागलं . त्याचबरोबर आपण आणि मीत एकमेकांच्या जास्त जवळ येत चाललो आहेत हे पण जाणवायला लागलं तिला . खरंच असं घडलं तर? आपण आणि मीत , स्वप्नांमध्ये रंगून जाणं आवडायला लागलं तिला .
पण, हळू हळू तिला जाणवायला लागलं कि रेणुका आपल्याशी नीट बोलत नाही आहे . आपण बरोबर असलो कि तिच्या कपाळावर आठी असते . मीत जेव्हा जेव्हा आपलं कौतुक करतो तेव्हा तेव्हा रेणु चा चेहरा पडतो .
रेणुका आता तिला टाळायचा प्रयत्न करते हे पण तिच्या लक्षात यायला लागलं. एक - दोन वेळा मनुने  रेणूशी बोलायचा प्रयत्न केला, पण रेणुने ते टाळलं . 'तुझं तुलाच कळायला हवं ', असा म्हणून तिने विषय संपवला . मनु ला कळेना आपण काय करावं ? कारण तोपर्यंत तिला आपण मीत च्या प्रेमात आहोत याची जाणीव झाली होती.
आणि खरच एक दिवस या सगळयाचा भडका उडाला . कारण खुप साधं होतं. ते तिघे एकत्र असताना , मनु जायला निघाली, तिची घरी जायची वेळ झाली होती . मीत ने पटकन तिचा हात पकडला आणि आणि थोडावेळ थांबायला सांगितलं .
"मीत , हात  सोड तिचा ," रेणुकाचा एकदम टिपेचा आवाज ऐकु आला , मीत आणि मनु दचकलेच. मीत ने पटकन तिचा हात सोडला आणि खूप आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागला . रेणुका त्याच आवाजात म्हणाली , " तु माझा आहेस आणि फक्त माझा . तुझा आणि तिचा काहीही संबंध नाही . तू तिचा हात तरी कसा धरू शकतोस ? का फसवतो आहेस मला ? " रेणुकाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. तिच्या आरड्याओरड्याने मनुला एकदम कसनुसं झालं . आजूबाजूला बसलेले लोक पण त्यांच्याकडे बघायला लागले. डोळ्यातलं पाणी लपवत , मान खाली घालून ती लगेच निघून आली होती .
मनूच्या मनाला रेणुकाचं वागणं खूप लागलं होतं , आपण तिची माफी मागायला हवी , हे तिच्या मनानं घेतलं . तिनं खूप धीर धरून रेणुकाला फोन केला पण पलीकडून काहीही उत्तर आलं नाही . पुढचे दोन दिवस मनु सतत तिला फोन करायचा प्रयत्न करत राहिली , तिने मेसेज पण पाठवून बघितले . पण रेणुका कडून काहीच उत्तर आलं नाही . शेवटी धीर धरून तिने रेणुका च्या घरी जायचं ठरवलं . तशी १-२ वेळा ती तिच्या घरी गेली असल्यामुळे तिला रेणुकाच घर माहिती होत .
मनाचा हिय्या करून तिने दाराची बेल वाजवली. रेणुकाच्या आईने दरवाजा उघडला . " अगं मृण्मयी , ये ना . आत ये . "
"काकु , रेणुका आहे का ?"
"आहे आत आहे , आणि काल तिच्या साखरपुड्याला का आली नाहीस? "
"रेणूचा साखरपुडा झाला ?", मनूच्या आवाजात आश्चर्य होतं .
"घ्या , म्हणजे या मुलीने तुला ते पण नाही सांगितलं ? अगं , तसंपण आमच्या मनात तीच आणि मीत च लग्न व्हाव असं होतंच. तुला माहिती आहे न मीत ? ( मनुने नकळत मान डोलवली ). मीत , रेणूच्या पप्पांच्या मित्राचा मुलगा . खूप हुशार आहे . लग्न झाल्यावर त्याला अमेरिकाला पाठवायचं ठरलं आहे . तिकडे पण ऑफिस सुरु करायचा विचार आहे . दोन दिवसापूर्वी अचानक म्हणाली उद्याच्या उद्या आमचा साखरपुडा करा . अगं , किती समजावलं तिला . पण हिचा हट्ट सुरु झाला. आणि तुला माहिती आहे , रेणूचे पप्पा तिच्यावर किती प्रेम करतात ते . मग काय ? केला घराच्या घरी".
मनु ला जबरदस्त धक्का बसला , तोंडाला कोरड पडली . डोळ्यातून पाणी यायला लागलं.
"आत आहे बघ ती , भेट जा तिला ".
जड पायाने मनु रेणूच्या खोलीकडे वळली . रेणू तिच्या पलंगावर पालथी पडून मोबाईल वरती काहीतरी वाचत होती. मनुने हलकेच तिला हाक मारली . रेणू झटकन उठली, डोळे मोठे करून तिरस्काराने ती ओरडली ,"तु ? हिम्मत कशी झाली तुझी इथे यायची ? परवाचा तमाशा पुरा झाला नाही का तुला ? माझ्या मीत ला माझ्यापासून हिरावून घ्यायचा विचार पण मनात आणु नको . त्याच्या किंवा माझ्या जवळपास पण यायचा प्रयत्न नको करू तू . " मनुला काही कळेना . ती अस्पष्ट शब्दात म्हणाली , "रेणू , ऐक ना ".
"काय ऐकू ? ," रेणू कडाडली ," तू नसलीस तरी मीत तुझ्याबद्दलच बोलत राहतो . सतत मनु , मनु . आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा तू हवीसचं . परवा तर हात पण धरला त्याने तुझा. बस्स झालं . तू जा इथून आणि परत अशी येवु नको ". मनु सुन्न झाली .
 
क्रमश:

Wednesday 18 February 2015

मृण्मयी -1

प्रत्येकाचा काही न काही भुतकाळ असतो , तसा तिचा पण होता . चांगला का वाईट हे काही तिला ठरवता येत नव्हतं . चांगल्या गोष्टींनी तिला घडवलं होतं तर वाईट गोष्टींमुळे चांगल्याच महत्व तिला पटलं होतं . स्वभावाने जात्याच सोशिक असल्यामुळे, वाईट घडलं तरी त्यातून मार्ग काढत होती ती .

आता अशा वळणावर होती कि तिला निर्णय घ्यायचा होता . असा निर्णय जो तीच विश्व बदलणार होता . आई -बाबां नंतर सांभाळलेल्या काकांनी एक स्थळ आणलं होतं . काकांनी कधीच कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नव्हती तिला. तिचा कल बघूनच ठरवायचे ते . यावेळी मात्र काका खूप सविस्तर बोलले होते , त्यांना मुलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपलं सगळं प्रेम तिच्यावर उधळून दिलं होतं . उद्या आपण या जगात नसल्यावर मृण्मयी एकटी कशी राहणार या काळजीनं ते आतून पोखरून निघाले होते . मृण्मयीला हे सगळ जाणवलं होतं काल . त्यातून स्थळ चांगलंच होतं . देखणा , चांगली नोकरी , उच्च शिक्षीत, दादर सारख्या ठिकाणी ६ खोल्यांचा फ्लॅट , एकुलता एक असा प्रसाद आणि गावाकडे जमीन बाळगून असणारे आणि निवृत्ती नंतर तिथेच राहणारे त्याचे आई - बाबा. म्हणजे स्थळ असं कि, कुणी नाकारू नये . आणि दुसरीकडे तिचा भूतकाळ पुसून टाकणारी नोकरीची संधी , दुस-या शहरातली .
आई - बाबा गेल्यावर ज्या काकांनी एवढ सांभाळलं त्याचं मन तरी कसं मोडायचं ? आणि भविष्य स्वतःच्या बळावर घडवायचं असेल, तर मिळणारी संधी कशी सोडायची ? विचार करून करून  डोकं दुखायला लागलं तिचं . कात्रीत अडकल्यासारखं वाटतं होतं . ऑफीस मध्ये कुणाच्या काहीही लक्षात येवू नये म्हणून कॉम्पुटर मध्ये डोकं घालून बसली होती. आणि तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला , कुणाचातरी व्हाॅट्स अॅप्प वर मेसेज होता.  तिने नाव वाचलं आणि थोडं आश्चर्य वाटलं . उत्तर नाही दिलं तर वाईट दिसेल म्हणून तिने उत्तर दिलं .
"हाय "
"तुला राग येवू नये म्हणून प्रार्थना केली , आणि मगच मेसेज केला . I hope तुला राग आला नसेल ????".
" नाही राग नाही आला . पण माझा नंबर कुठून मिळाला तुम्हाला ?"
"अगं, तुझ्या काकांकडून घेतला. आपण कुठल्याही निर्णयापर्यंत येण्याआधी एकमेकांशी बोलू , आणि मग आपला निर्णय सांगू ".
खरंतर त्याचा फोन येईल याची कल्पना होती तिला . काकांनी सांगितलं होतं तसं . तरीपण त्याचा मेसेज बघून तिच्या छातीतील धडधड वाढली . तिने उत्तर दिलं नाही , तसा थोड्यावेळात परत त्याचा मेसेज आला ,
"काय ग ? काय झालं ? " 
"काही नाही , हातातलं काम संपवलं ".
"sorry , माझ्या लक्षात आलं नाही . तू कामात असशील तर नंतर बोलूया आपण ".
तिची तिलाच लाज वाटली .
"नाही नाही , बोला तुम्ही. झालंच माझं  ". तिने उत्तर दिलं .
"तुम्ही ??? अगं , अरे तुरे कर मला . उगाच म्हातारं झाल्यासारख वाटतं ".
तिच्यापण नकळत हसली ती .
"OK "
"मृण्मयी तुला पटताहेत का माझे विचार ? आपण आधी बोलूया आणि मग निर्णय घेऊ ".
" हो , मला पटतंय हे . आपण बोलूया आधी ".
"ठरलं तर मग , संध्याकाळी तुझ्या ऑफिस जवळच्या CCD मध्ये भेटूया . मी पोहोचेन ६.३० पर्यंत ".
"OK "
त्याला उत्तर देवून तिने लगेच काकांना फोन केला . "मनु , मुलगा आणि त्याच्या कडचे सगळे चांगले आहेत . तुझ्या मनात काय आहे ते पण मला माहिती आहे . तू योग्य निर्णय घेशीलच . आणि तो कोणताही असला तरी मी तुझ्या बरोबर आहे . "
मृण्मयी कॉम्पुटर कडे बघत शांत बसली होती . मनात प्रचंड खळबळ उडाली होती . काय सांगू प्रसाद ला ? कुठून सुरवात करू ? काय म्हणेल तो ? पण काहीही झालं तरी त्याला 'मीत' बद्दल सांगायलाच हवं . जे घडल ते सगळं . हे ठरवल्यावर थोडं शांत वाटलं तिला .

क्रमश.





Wednesday 3 December 2014

मुग्धा -५ - शेवटचा भाग

मुग्धा सुन्न होवून बघतच राहिली त्याच्याकडे . तो जे काही बोलला , ते समजायला वेळ लागला तिला . आणि तिला अचानक सगळ्याची भयानकता जाणवली . काय करून बसलो आपण हे ? वरद असा आहे ? आपल्याला कसं कळल नाही हे ?
"बघ मी असा आहे . आपल्याला कुणी आवडलं तर चार दिवस मजा करावी झालं . नंतर तू तुझ्या वाटेला , मी माझ्या . कुणीही एकमेकाच्या वाटेत यायचं नाही . मी लग्न करेन पण तुझ्यासारख्या मुलीशी नक्की नाही . "  एवढं बोलून वरद उठला आणि निघून गेला .
ती तशीच बसून राहिली मिळणारे धक्के पचवत . हे सगळ असह्य होतं तिच्यासाठी . ती कितीतरी वेळ तशीच बसून राहिली . जेंव्हा वेटर थोडा मोठ्या म्हणाला ," काही आणु का मॅडम ?" तेव्हा ती दचकली आणि भानावर आली . ती तशीच उठली , सगळ जग आपल्याभोवती गरगरतय असा वाटत होतं तिला . ती ऑफिस कडं निघाली , पण धड चालताही येईना तिला . पायातली ताकद कुणीतरी शोषून घेतली आहे असं वाटत होतं तिला . डोक्यातले विचार भरकटत चालले होते तिचे . काय करून बसलो आपण हे ? एवढे वाहवलो ? त्याच्यासाठी , ज्याला आपली काहीही किंमत नाहीये . त्याच्यासाठी हा  खेळ होता फक्त . आपण  मूर्ख आहोत . आपण कसलीच खात्री करून घेतली नाही . त्याच्या प्रेमाची पण नाही .  त्याने बोलावलं आणि आपण गेलो . शी .
याच विचारांमध्ये ती ऑफिस ला पोहोचली . शिल्पा तिच्या जवळ आली . " मुग्धा , काय झालाय तुला ? अशी का दिसते आहेस ? तू आणी वरद हॉटेल मध्ये गेला होता ना ?  काय झालं ?"  ती सुन्नपणे बघतच राहिली शिल्पाकडे . शिल्पाच बोलणं जणू तिच्या कानापर्यंत पोहोचताच नव्हंत . शिल्पा ला कळेना हि अशी का बघतेय ते . काहीतरी झालं आहे एवढ लक्षात आलं तिच्या . तिने थोडं काळजीनच विचारलं " काय झालं ?" तिच्या काळजीन मुग्धाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तशी शिल्पा तिला  बाहेर आली आणि थोडी वैतागूनच म्हणाली ,"काय झालं आहे नक्की ? सांगणार आहेस का आता ? काल पण असंच केलंस ."
थोडी शांत होत पहिल्यांदाच मुग्धा ने जे घडलं ते सांगितलं . शिल्पा आवक् झाली ऐकुन . " अगं , इतकं सगळं मनात होतं  आणि एकदाही बोलली नाहीस मला ? निदान त्याच्याघरी जायच्या आधी तरी ? काहीतरी माहिती काढली असती आपण . अशी कशी तू ? त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही , आणि भेटायला गेलीस तू त्याला ?"
ती काहीही बोलली नाही . फक्त रडतं राहिली . शिल्पा ला दया आली तिची . " रडू नको गं . मी बोलू का वरद शी ?"
"काय बोलणार तू ? त्याच प्रेम नाहीये माझ्यावर ", कळवळून मुग्धा म्हणाली ," त्याला फक्त शरीर हवं होतं गं, माझ्या मनाशी काही लेणदेण नाही त्याला . मी सगळ्यांपासून लांब राहत होते तेच बरं होतं . निदान अशी फसले तरी नसते . " शिल्पाने तिला थोडं शांत होवू दिलं आणि मग विचारलं ," आता काय ठरवलं आहेस ?"
" मी नोकरी सोडेन ".
"काय !?" शिल्पाचा काय इतका मोठा होता , कि आजूबाजूने जाणारे सगळे तिच्याकडे बघायला लागले .
" अगं वेड लागलं आहे का तुला ? एवढी सोन्यासारखी नोकरी सोडणार तू ? आणी घरी काय सांगणार ? "
"घरी काय सांगणार अगं ?पण वरद समोर असताना असं परक्यासारख काम करणं जमणार नाही मला . आणि त्यातून तो दुसऱ्या मुलीच्या हातात हात घालून बसलेला तर अज्जीबातच चालणार नाही . वेडी होईन गं मी . " एवढं बोलून ती परत रडायला लागली .
"अगं रडतेस कसली ? चीड यायला हवी तुला . त्याच्या मुस्कटात मारायला हवीस . सरांच्या कडे तक्रार करायला हवीस . ते राहील बाजूला , रडतेस कसली ? आणी या असल्या माणसासाठी नोकरी सोडणार तू ? त्याला काय तू साधी आहेस , त्याच्यावर प्रेम करतेस हे कळलं नसेल ? त्यान गैरफायदा घेतला आहे तुझ्या भावनांचा ,त्याला काय असंच सोडायचं ?" खूप  पोटतिडकीन बोलत राहिली आणि आपण फक्त तिला खूप रडवतो आहे हे जाणवल्यावर गप्प झाली .
ऑफिस मधून घरी येताना पण रस्त्यावरच्या सगळ्यांना कळलंय आपण काय केलाय ते ,आपण कसे मुर्ख आहोत ते , असंच काहीसं वाटत राहिलं तिला .
 घरी आल्यावर बरं नाही म्हणून ती सरळ आत जाउन पडली . तशी आई आत आली ," मुग्धा , तुला राग येत असेल ना गं माझा ? सारखी बोलते म्हणून ? पण अगं आम्ही असेच वाढलो आहोत . स्वतःच्या मनाला मारून जगायचं . मनासारखे काहीही करणं म्हणजे चुकीचंच आहे असंच शिकवलं गेलं आम्हाला . मन मारण्यात संसाराचं भलं होत याच विचारांची
झाले गं मी पण . तु पण तसंच करावस असं वाटत होत मला . म्हणून तुझ्यावर बंधन घालंत गेले मी . लोकांना भिवून जगतो  गं आम्ही, तू पण तसंच जगावस असा वाटत राहील मला . तुला वाटत असेल आई आज हे सगळं का बोलतेय ? खरतर २-३ दिवसापासुन बोलायचं ठरवत होते मी . पण तुझी तब्येत बरी नाही  बसले .
परवा तुझी डायरी वाचली , त्यातली तुझी स्वप्नं वाचली . उंच आकाशात उडायची , सगळ जग बघायची , भरपूर पुस्तकं वाचायची , एक सुंदर हसरं आयुष्य जगायची . आणि जाणवलं आपण आपल्या पोटाच्या मुलीलाच ओळखु शकलो नाही . आई अशी नसते न गं ? तुलापण असंच वाटत असेल ."  बोलतां  बोलतां आईचा कंठ भरून आला .
मुग्धा बघतां  बघतां आई च्या कुशीत शिरली आणि स्फुंदून स्फुंदून रडायला लागली . आईचा हात डोक्यावरून फिरत असताना अपराधीपणाची जाणीव अजूनच गडद झाली .
सकाळी तिला उठवेना , डोकं आणि अंग पण जड झाल्यासारखं  वाटत होतं . आई उठवायला आली आणि तिची अवस्था बघून घाबरली . तिने कपाळावर हात ठेवला आणि चटका बसला तिला . चांगलीच तापली होती ती . आईने तिला ताप  उतरायची गोळी दिली आणि त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन केला .
" खूप जास्त ताण घेतला आहे मुग्धाने वाहिनी . तिला एक आठवडा तरी ऑफिस ला जाऊ देवू नका . फक्त विश्रांती गरजेची आहे ." डॉक्टरांनी सांगितले .
तिने एक आठवड्याची सुट्टी टाकली .  एकीकडे आईशी संबंध सुधारत होते आणि दुसरीकडे टोचणी अजूनच वाढत होती.
आठवड्यानंतर ती ऑफिस ला परत आली . शिल्पा तिच्या जवळ आली ," कशी आहेस मुग्धा आता ? किती त्रास करून घेतलास गं स्वतःला ? तिकडे तो मज मारतोय आणि तू मात्र ?"
" चूक माझ्या हातून घडली आहे . शिक्षा पण मलाच भोगायला हवी . " खिन्नपणे मुग्धा म्हणाली .
"मुग्धा तू बदली करून घे , आपल्या गोव्याच्या ऑफिस ला . आवडेल तुला तिथं राहायला "
"बघते " म्हणून तिने कॉम्पुटर मध्ये डोकं घातलं . पण तिचं  मन काही कामात लागेना . तेवढ्यात तिला वरद दिसला , मीना बरोबर परत येताना . आणि मुग्धाच्या हृदयातून कळ आली . ती अस्वस्थ झाली खूप . वरद नं लक्ष दिला नाही .
आजचा दिवस संपतच नाहीये असं वाटलं तिला .
शेवटी आईशी बोलून तिनं गोव्याला बदली करून घेतली . आईने पण फारसे आढेवेढे घेतले नाहीत . कुणास ठाऊक आजपर्यंत जे वागली त्याचं परिमार्जन असावं .
गोव्याला दोघींच्या पण आयुष्याचा नवीन अध्याय सुरु झाला . गोव्याच्या वातावरणान तिला भुरळ घातली . जे घडलं त्याची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागली . दोघींचं आयुष्य खूप छान जायला लागलं . इथे दिवस भरभर जात होते . ती आईबरोबर अष्टविनायक करून आली आणि आई तिच्यासाठी म्हणून केरळ ला आली . दोघींना पण आपण एकमेकींसाठी आहोत याचा खूप आनंद होत होता , नव्याने सापडलेलं नातं दोघीही मनापासून उपभोगत होत्या .
बघता बघता दोन वर्ष निघून गेली . आता मात्र आईला तिच्या लग्नाचे वेध लागले . आणि ती मात्र विषय टाळायला लागली . मात्र या सगळ्यामुळे तिला जे घडलं होतं ते आठवल आणि पहिल्यांदाच जाणीव झाली , हे ओझ घेवून आपण लग्न नाही करू शकत .
एके दिवशी ऑफिस मध्ये काम करत असताना कुणीतरी अचानक समोर येवून उभं राहिलं . तिने मन वर करून पाहिलं . वरद . ती दचकली . तो खूप हरवल्यासारखा दिसत होता , बारीक झाला हित , डोळे खोल गेले होते .
"काय हवंय ?" नकळत खूप कोरडेपणाने तिने विचारले ?
" तुझ्याशी बोलायचं आहे " त्याच आवाज पण खूप खोल गेला होता
" मला वेळ नाही , खूप काम आहेत मला "
" नाही म्हणू नको गं मला , खूप धाडस करून आलो आहे इथं मी . हात जोडतो तुझ्यापुढे . खूप वेळ नाही घेणार तुझा ." तो गयावया करत म्हणाला . तिला आश्चर्याचा धक्का बसला  आणी नकळत बोलून गेली ती ,"ठीक आहे , लंच मध्ये भेटू . ऑफिस समोर सुखसागर म्हणून हॉटेल आहे तिथे ये १वाजता . "
" खूप उपकार झाले गं " त्याने हात जोडले
तो गेला आणी मुग्धाच कामातलं लक्ष उडालं . काय  झालाय याचं ? असा काय झाला आहे हा ? काय बोलायचं असेल ? ते पण एवढ्या दिवसांनी ?
कसाबसा १वाजेपर्यंत वेळ काढला तिने . आणि ती हॉटेल कडे गेली . तो आधीच आला होता .
"काही खाणार का ? "
"नको "
" थोडं  घे गं  , प्लीज ." त्याने आर्जवाने म्हटलं , तिला नाही म्हणता आलं नाही .
त्याने कॉफी आणी सॅंण्डविचेस् मागवली. "बोल आता , माझ्याकडे फारसा वेळ नाही " .
" माफ कर माल . मी तुझा अपराधी आहे गं . मला त्याची जाणीव नव्हती . आपल्याच मस्तीत होतो मी . जोपर्यंत सॅली भेटली नाही , तोपर्यंत मुलीना वापरून सोडून द्यायचं असतं , असाच वाटत राहिलं मला . खूप चुकलं गं माझं" म्हणून त्यानं ओंजळीत चेहरा लपवून रडायला सुरवात केली .
मुग्धाला आपण काय करावं हे कळेना . ती गप्प बसली . थोडा शांत झाल्यावर वरद ने परत बोलायला सुरवात केली ," तू निघून गेल्यावर मला काहीही फरक पडला नाही . किंवा तुझ मी काय करून ठेवलं होता याचाही . कारण मला भेटलेल्या मुलीपण अशाच होत्या, फारशा न गुंताणाऱ्या . माझी मौजमजा चालुच होती . आणी त्यातचं ती भेटली , सॅली. तुझ्याच जागेवर आली . सुंदर , हुशार आणि खूपच छान होती . कुणीही प्रेमात पडावी अशी .
मी तर तिला बघितल्यावर पागलच झालो . एकदम प्रेमात पडलो . तिच्याशिवाय जगण व्यर्थ आहे असं वाटायला लागलं.  एकत्र काम करत असल्यामुळं तिचा सहवास पण भरपूर होता . तिच्या  वागण्याने  आणि हुशारीने तर  जास्तच आवडायला लागली मला ती . तिच्याशिवाय मला काही सुचेना . ती पण खूप जवळ येत गेली . बाकी मुलींबद्दल जसं वाटायचं तसं सॅलीबद्दल वाटत नव्हत . तिच्याबद्दल फक्त प्रेम होतं मनात . तिचं माझ्याबरोबर असणं खूप महत्वाचं वाटत होत मला . तिच्याशिवाय एकही क्षण काढणं म्हणजे शिक्षा वाटत होती मला . मी तिला काहीही सांगितलं नव्हत पण तिला कल्पना आली असावी . माझे सगळे दिवस आनंदाने भरलेले होते . ती म्हणेल ते करायची तयारी होती माझी . अगदी उंच कड्यावरून उडी मार म्हणाली असती तरी , मी मारली असती .
जवळपास ६ महिन्यांनी मी तिला मागणी घालायची ठरवली . तिला लोणावळा खूप आवडायचं . म्हणून मग तिकडेच तिला घेवून जायचं ठरवलं . मी तिला विचारल्यावर ती हो म्हणाली . तिला बहुतेक अंदाज आला होता . लोणावळ्याला पोहोचल्यावर एका छानशा ठिकाणी नेलं तिला मी . तिथे पोहोचल्यावर तिला एक टपोरं लाल गुलाबाचं फुल दिलं . आणि सिनेमात दाखवतात तसा तिच्यापुढे गुडघे टेकून , तिच्यासाठी घेतलेली हिऱ्याची अंगठी पुढे करत तिला म्हणालो ,' सॅली, आयुष्य खूप सुंदर आहे . पण , त्याला जर सुंदर साथ मिळाली तर ते अजूनच सुंदर होतं . मला तुझ्या साथीने माझं आयुष्य सुंदर करायचं आहे . तुझ माझ अस्तित्व एकचं असावं असं वाटतंय मला . माझ्या आयुष्याला अर्थ तुझ्यामुळे मिळणार आहे . तू आणि मी एक व्हावं असं वाटतंय मला . होशील का गं माझी ? विरघळशील माझ्यात ?'
सॅली खूप लाजली . तिने पुढे केलेल्या बोटात मी अंगठी चढवली आणि तिला मिठीत घेतलं . मी पूर्ण झालो होतो .
आजही लाजलेली सॅली आठवली कि पीळ पडतो माझ्या मनाला . माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता तो . आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो , नवीन आयुष्याची स्वप्नं रंगवत होतो .
पण आयुष्य किती क्रूर असतं गं . मी तुझ्याशी जे वाईट वागली त्याचा बदला म्हणून देवाने माझी सॅली माझ्यापासून दूर केली . " वरद चा गळा भरून आला . मुग्धा शांत बसली होती .
" आम्ही परत येत असताना एका ट्रक ने धडक दिली आम्हाला . सॅली जागच्या जागी गेली . मी बेशुद्ध होतो आठवडाभर . शुद्धीत आलो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या हातात ती अंगठी ठेवली . आणि मला कळलं आपण आता कायमचे एकटे राहिलो . दोन महिन्यात मी बरा झालो . पण मनाच्या जखमा भरून येत नाहीत गं . तुला मी दिलेल्या जखमा पण तशाच असतील . सॅली शिवाय येणारा प्रत्येक दिवस माझ्या यातना वाढवत होता . मला जगणं  नकोसं करत होता . माझी अवस्था बघून आईने मानसोपचार तज्ञाला दाखवले मला . त्यांच्या उपचाराने मला बंर वाटत होतं . पण मनावरच ओझं काही उतरत नव्हत . असंच  एके दिवशी मी डॉक्टरांना तुझ्याबद्दल सांगितलं . आणि त्यांनी मला माझीचूक सांगितली . तुझी माफी मागायला सांगितली . खंर सांगतो मुग्धा , तुझी माफी मागायची ठरवली आणि मला खूप हलक वाटलं . खूप धाडस करून आज तुझ्यापुढे उभा आहे मी . माझ खूप चुकलं गं , माफ कर मला " त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि हात जोडून उभा होता तो .
मुग्धाच्या डोळ्यात अश्रु होते आणी मनात खळबळ . खूप वाईट वाटत होता तिला . तो कसाही असला तरी एकेकाळी प्रेम केलं होत तिने त्याच्यावर .
तिथून निघताना पहिल्यांदा खूप मोकळं वाटत होतं तिला . एवढ्या दिवसातली अपराधी पानाची जाणीव नाहीशी झाली होती . खांदे पाडून पाठमोऱ्या चालणाऱ्या वरद कडे पाहून देवाला साकडं घातलं तिने ,'याला सुखी ठेव'.