Wednesday, 15 April 2015

मृण्मयी -6

आधीचे भाग इथे वाचा
भाग -१   भाग -२  भाग-३ भाग-४  भाग-५

डोक बधिर झालं होत तीच . तशीच पाय ओढंत ओढंत ती निघाली . सगळ जग सुन्न झालं होतं . मागून येणाऱ्या ट्रक चा हॅार्न पण ऐकू आला नाही तिला . जेव्हा शुध्द आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती . बाजूला काका होते . तिने आजूबाजूला नजर फिरवली , मीत दिसला नाही तिला .
 डोळ्यात पाणी आलं तिच्या , काकांच्या लक्षात आलं . तिच्या डोक्यावर थोपटून ते म्हणाले ,"अगं , आत्ताच घरी गेला आहे तो . संध्याकाळी येईल परत ".
तिच्या नकळत काकांनी डोळ्यातलं पाणी लपवलं . मनु ला परत ग्लानी आली . असेच दिवस जात होते , शुद्ध - बेशुद्धीच्या वेशीवर . आणि एक दिवस असा उजाडला कि तिला खूप फ्रेश वाटंत होतं . आज मीत येईपर्यंत आपण जाग राहायचंच असा तिने निर्णय घेतला . रोज तो नुकताच गेलेला असायचा आणि काकाच समोर असायचे . असा कसा हा ? आणखी थोडा वेळ का नाही थांबला ??. असे प्रश्न डोक्यात यायचे तिच्या . आपण काहीतरी विसरतो आहे असं सारंख वाटंत होतं तिला , पण काय लक्षात येत नव्हंत . आठवायचा प्रयत्न केला कि ग्लानी यायची तिला .
पण आज मात्र असा काही वाटत नव्हंत . सकाळी डॉक्टर येवून गेले होते आणि त्यांनी तिला २-३ दिवसात घरी जाता येईल म्हणून सांगितलं होतं . आज काका पण चांगल्या मूड मध्ये होते .
"आपण लवकरच घरी जाऊ हं मनु "
"हो काका , मला पण कंटाळा आला आहे इथे ".
"हो ग , समजू शकतो मी ".
"काका , मीत कधी येणार आहे ? आज मात्र मी झोपणार नाही हं , तो आल्याशिवाय ".
"अगं सांगायचो विसरलो मी , आज येणार नाहीये तो . शहरात नाहीये , बाहेर गेला आहे , कामासाठी . ३-४ दिवस लागतील म्हणाला होता ".
"असा कसा काका हा ? एक फोन पण केला नाही त्याने इतक्या दिवसात ". खट्टू होवून मनु म्हणाली .
"अग , विचारलं होत त्याने डॉक्टरांना , पण डॉक्टर नको म्हणाले , सध्या फोन वगैरे काही नको ".
"का ? फोन का नको म्हणाले ?"
"काही माहिती नाही गं ? झोप बघू तू आता ? किती प्रश्न विचारतेस ? लवकर घरी जायचं आहे नं ? मग झोप ".
असा बोलून काका खिडकीपाशी बाहेर बघत उभे राहिले . मनु ला पहिल्यांदा जाणवलं काहीतरी बिनसलं आहे . आपण काहीतरी विसरलो आहोत. तिने आपल्याला  काय आठंवत नाही ते आठवण्याचा प्रयत्न केला , पण उपयोग झाला नाही .
सकाळी सकाळी ती दचकुन जागी झाली आणि तिला तिची आणि  मीत ची भेट लख्ख आठवली . सगळ अंग घामेजलं तीच . ती तशीच उठून बाहेर आली आणि समोर रीसेप्शन वर जाउन तिने मीत चा फोन नंबर फिरवला .
'हा नंबर अस्तित्वात नाही , this number does not exist ' सतत हीच ट्युन ऐकायला यायला लागली . गोंधळून गेली ती . सारखा सारखा नंबर फिरवत राहिली . तेवढ्यात मागून काका आले . त्यांनी तिला फोन खाली ठेवायला लावला आणि काही न बोलत तिला खोलीकडे घेवून आले .
"काका काका , अहो त्याचा नंबर लागत नाहीये , असा कसा होईल ? कुठे आहे तो ? मला भेटायला का आला नाही? त्याने रोहीणिशी लग्न केलं का ?"
प्रश्नाच्या धबडग्यात अचानक तिच्या लक्षात आलं , काकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे .
"तो. . . तो ठीक आहे नं काका ? " आता मात्र धीर सुटायला लागला तिचा . खोलीमध्ये डॉक्टर पण आले होते .
"मनु बाळ  , तू शांत हो जरा . मीत … मीत या जगामध्ये नाही आता ".
"काय ?" विस्फारल्या डोळ्यांनी मनु बघतच राहिली
" हो , त्या दिवशी तू बाहेर पडल्यावर , रोहिणीच्या वडलांच आणि मीत च खूप जोरात भांडण झालं . त्यात रोहिणीच्या वडिलांचा तोल गेला आणि त्यांनी मीत वर हात उचलला . मीत टी-पॉय वर पडला . आणि … आणि मनु त्याच डोकं जोरात आपटलं . डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही ". काकांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या . मनु तशीच होती स्तब्ध . डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी तिला झोपेच इंजक्शन दिलं .
ते दिवस कसे सरले एकट्या मनुला माहिती . आपण का जगतोय ? याचा विचार करत तासंतास घालवले तिने . मीत ची प्रत्येक आठवण तिचा छळ करत होती . उठता बसता , सगळीकडे तिला मीत च दिसत होता . न भूक लागत होती न तहान , न झोप यायची न जाग रहाव हि इच्छा . तिच्या अवती भोवती सतत काका असायचे . जबरदस्तीने तिला भरावयाचे , सतत रडणाऱ्या आणि त्रास करून घेणाऱ्या मनु ला बघून त्यांच आतडं तुटंत होतं . तिला यातुन बाहेर कसं काढाव हे काही त्यांना कळंत नव्हंत .
अशातच एक दिवस मीत चे वडील भेटायला आले त्यांना . मनुची अवस्था बघून घाबरले . तिच्या जवळ जात म्हणाले ," मनु , तुमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं माहिती आहे मला . तु सोडून दुसरा कोणताही विषय असायचा नाही आमच्यात . सुरवातीला मी नाही म्हणालो होतो कारण मला त्याचं भविष्य चांगल घडलेलं हव होतं . पण मनु , त्याने तुझ्यावर इतक प्रेम केलं आहे कि काय सांगू ? तुमच्या पुढच्या आयुष्याचे प्लान करून ठेवले होते त्याने . तुझ्याशिवाय जगणार नाही मी असा म्हणायचं गं तो . तुला खूप सुखात ठेवायचं होतं त्याला . तुझ्या तोंडावर दुःखाची सावली पण पडू द्यायची नव्हती त्याला . त्याच सगंळ तूच होतीस .पण मनु , आपल्या नशिबात नव्हंता ग तो ."
मनु स्फुंदून स्फुंदून रडायला लागली .
" बाळा , शांत हो . त्याचं आयुष्य तेवढंच होतं . पण मला माहिती आहे तो तुझ्या जवळच आहे . तो नक्कीच तुला बघंत असेल . तुझी अशी अवस्था बघून त्याला काय वाटंत असेल गं ? त्याला किती त्रास होत असेल ? तुला नाही का गं वाटत कि त्याला त्रास होवू नये ?"
रडत रडतच मनुने मान हलवली .
"मग मनु , आता रडंण बस . माझा मीत आपल्या दोघांवर लक्ष ठेवून आहे . त्याला त्रास होईल असा काहीही आपल्याला करायचं नाहीये ".
"हो बाबा " मनुच्या तोंडून निघून गेलं . मीत च्या बाबांचे पण डोळे पाणावले .
"बाबा म्हणतेस नं ? मग या बाबांच ऐकायचं . उद्यापासून नोकरी परत सुरु करायची . डोळ्यातून पाणी न काढता राहायचं . आणि अधे मध्ये या बाबाला भेटायला यायचं ".
"हो बाबा" म्हणत मनु त्यांच्या कुशीत शिरली आणि दोघांनी पण पोटभर रडून घेतलं .
त्यानंतर मात्र मनु रडली नाही . ऑफिस च्या कामात गुंतवून घेतलं तिने . अधून मधून मीत च्या बाबांना भेटायला जायची . हळू हळू त्यांच्याबरोबर ती बाहेर जायला लागली , थोडी मोकळी व्हायला लागली . ती , काका आणि बाबा असा छानसा ग्रुप झाला तिचा . हळूहळू चेहऱ्यावर हसू पण यायला लागलं .
आणि तेवढ्या मागच्याच वर्षी मीत चे बाबा हार्टट्याक ने गेले . जाताना त्यांचा फ्लॅट मनूच्या नावावर करून गेले .
मनुला खुप एकंट एकंट वाटायला लागंल . पण काकांच्या कडे बघून ती सावरली . अलीकडे तर काकू पण गोड बोलायची तिच्याशी . दोघांच पण वय झालं होतं . काकांना आता तिच्या एकट्या राहण्याची काळजी वाटायला लागली . त्यांनी मनु पाशी विषय काढला .
आम्ही पिकलं पान , कधीही गळून पडू . आमच्या डोळ्यासमोर तुझे दोनाचे चार झाले तर मरताना माझी काळजी मिटेल .
हो, नाही करता करता मनु तयार झाली . आणि आज हे स्थळ आलं होतं . मनूच्या डोळ्यासमोरून मागची ५ वर्षे झर्रकन निघून गेली .
ती विचारात CCD पाशी पोहोचली . तर मंद हसत प्रसाद तिची वाट बघत होता . हातातला पुष्पगुच्छ तिच्यापुढे धरत तो म्हणाला ," खूप छान दिसते आहेस मनु तू ".
मनूच्या नकळत लाजली ती .
दोघ कॅफी ची आॅर्डर देवून आत बसले . कुठून सुरवात करावी असा विचार करत असतानाच प्रसाद म्हणाला ," मनु , काका बोलले आहेत सगंळ माझ्यापाशी . काहीही सांगू नकोस . तू मला पाहताक्षणीच अावडलीस . आयुष्य काढायचं तर तुझ्याबरोबरंच असा ठरवलं मी . एक खात्री देतो तुला , तुला त्रास होईल असा काहीही मी करणार नाही . मी मीत ची जागा नाही घेवू शकणार आणि मला तसं काही करायचं पण नाहीये . पण मनु , येणारं भविष्य आपलं असणार आहे आणि ते फक्त तुझ माझं असावं असं वाटतय मला . तुझ्या साथीनेच येणारा प्रत्येक क्षण उपभोगायचा आहे".
प्रसाद च्या मोकळ्या बोलण्यामुळे  हळू हळू मनु च्या चेहऱ्यावर मंदहास्य यायला लागलं . 

Monday, 13 April 2015

मृण्मयी -5

मनु खोलीत परत आली तोपर्यंत मीत चे ३-४ मेसेज आणि तेवढेच काॅल येवून गेले होते . मित चा चेहरा डोळ्यापुढे आला आणि मनु च्या डोळ्यात पाणी आलं . काकूंच्या पदर पसरण्यामुळे तिने काय निर्णय घेतला आहे याची तीव्र जाणीव तिला झाली . काय करावं ? कस सांगाव मित ला ? का काही बोलूच नये ? आपलं आयुष्य महत्वाच कि एका आईचं गार्हाण ? मनु गोंधळून गेली .
तेवढ्यात फोन वाजला,
"मनु , अग मनु , कुठे आहेस सकाळपासून ? किती फोन करतोय तुला ? बरी आहेस ना गं ? काकू काही बोलली का परत ?" मित चा काळजीने भरलेला आवाज ऐकून मनूच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या . तिला काहीच बोलता येईना .
"मनु , बोल नं ".
"उं. .उं. ." मनुचा हुंदका तीव्र झाला
"रडत्येस ? का गं ? बोल गं ? मला काळजी वाटतेय तुझी आता . मनु , राणी , बोल please बोल पिल्ल्या ".
आता मात्र मनु ला असह्य झालं . तिने फोन बंद केला आणि छातीशी घट्ट धरून हुंदका आवरायचा प्रयत्न करायला लागली . फोन वाजतच राहिला पण मनुने घेतला नाही .
घरी काकूची बोलणी नकोत म्हणून ती ऑफिस ला गेली , पण तीच मन ताळ्यावर नव्हंत अज्जिबात . कशातच लक्ष लागत नव्हंत .
३.३० -४ च्या सुमारास ऑफिस च्या शिपायाने सांगितलं कि कुणीतरी तिला भेटायला आलं आहे . कोण असेल म्हणून मनु बाहेर गेली . मित होता समोर . मनुला धक्का बसला , तो असा ऑफिस मध्ये येईल असं वाटलं नव्हंत तिला .
"काय झालंय तुला ? अशी का दिसते आहेस ?" मित ने विचारलं .
मित च्या चेहऱ्याकडे बघवत नव्हंत मनु ला . त्याचा प्रश्न टाळून तिने विचारलं , " तू , तू इथे कसा ?".
"मनु तू विचारावंस मला हे ? सकाळपासून माझा फोन घेतला नाही आहेस , स्वत: फोन करत नाही आहेस ? किती काळजी करू मी ? मला कळेना काय झालंय नक्की ते ? " बघतां बघतां मित चा आवाज वाढायला लागला . तशी इकडे तिकडे बघत मनु त्याला म्हणाली ," शु... मित , हळू . sorry रे . संध्याकाळी भेटते तुला , ६. ३० वाजता . " बोलून मनु वळली पण. तिच्याकडे आश्चर्याने बघणाऱ्या मीत कडे बघायची हिम्मत होत नव्हती तिला .
संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेटल्यावर धुसफुसत मित तिला म्हणाला ," काय चालंल आहे तुझं मनु ? का असा छळ करते आहेस माझा ?".
मनुला आता स्वत:ची खूप ताकद एकत्र करावी लागली ," मीत , आपण आता भेटता कामा नये . तुझ लग्न ठरलं आहे ." असं म्हणून सकाळी झालेला सगळा प्रकार तिने मित ला सांगितला आणि तिचा निर्णय पण .
" तू , तू निर्णय घेवून पण टाकलास ? तुझ्या आणि माझ्या वतीने ? मला काय हवं आहे याची पर्वा न करता ? आपलं आयुष्य आहे हे मनु आणि कोणीही येवून तुला माझ्यापासून दूर करू शकत नाही . " मित चा संताप संताप झाला होता अगदी . तो इतका संतापला कि काही काळ त्याला बोलतां पण आलं नाही . मनु घाबरून त्याच्याकडे बघत राहिली .
दोन  क्षण गेल्यावर खूप हळुवारपणे तिने हाक मारली ,"मीत ". मित ने तिच्याकडे बघितलं आणि त्याला जाणवलं ती खूप घाबरली आहे . त्याचं अवसान गळालं .
"काय करून बसलीस मनु तू हे ?", कशाचीही पर्वा न करता मीत ढसाढसा रडायला लागला . मनु ला स्वतः ला आवरण खूप कठीण जात होतं . आजूबाजूच्या टेबलावरच्या मन आता त्यांच्याकडेच बघत होत्या . तिने मितच्या खांद्यावर हात ठेवला , "सावर मित , आपण इथून बाहेर जाऊया . दूर कुठेतरी ".
मित आणि ती बाहेर पडले तेव्हा तिला असा वाटंल कि मित तिच्यापासून कोसो मिल दूर आहे . तिच्या गळ्यात हुंदका दाटून आला .
मित ने काहीही न बोलता तिला घरी सोडलं . मनु च्या गळ्यात हुंदका अडकला . मित तिच्याकडे बघायला पण तयार नव्हता . आता मात्र रात्र डोळ्यात उतरली होती तिच्या . ना धड रडू येत होतं ना झोप . सगळंच कसं अस्थिर वाटंत होतं . कालची रात्र दुसर्या जन्मातली वाटंत होती .
सकाळी सकाळी मित चा फोन आला . खूप अधीरपणे तिने घेतला . " तुझ माझ्यावर प्रेम होत होत माहिती आहे मला , त्याच प्रेमासाठी आत्ता घरी ये ", एवढ बोलून त्याने फोन ठेवून दिला . मनु ला कळेना काय करावं . तिने परत फोन लावायचा प्रयत्न केला पण स्वीच ऑफ आला . धास्तावलेली मनु गडबडीने त्याच्या घरी निघाली .
दारावरची बेल दाबली . बराच वेळ कुणी दार उघडेना . मनु ला कळेना काय करावं . ईतक्यात दार उघडलं . समोर मीत आहे हे कळायला काही सेकंद जावे लागले तिला . रात्रभर न झोपल्यामुळे तारवटलेले डोळे , चुरगळलेला शर्ट . मनु आत आली , तसा तिचा हात पकडून मीत ने विचारलं ,"आता कशी आलीस ? मी नकोय नं तुला तुझ्या आयुष्यात ? मग का आलीस ?"
त्याचा अवतार बघून घाबरलेल्या मनूच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ," मीत , please ".
"please काय please ?"
"मीत , तुला लांब करून मी तरी कुठे जगणार आहे रे ? मला किती  त्रास होतो माहिती आहे का याचा ?" स्फुंदत स्फुंदत तिने विचारलं .
"मग का करते आहेस राणी तू हे सगळं ? माझ्या पिल्ला नको नं दूर करू मला . बघ रोहिणी विसरून जाइल हे सगळं . मग फक्त तुझं आणि माझं आयुष्य राहील मागे . नको ग करू असा . तू नसशील तर वेडा होईन मी राणी ". बघता बघता मित तिच्या कुशीत शिरला . मनूला स्वत:ला सावरणं खूप कठीण गेलं . तिने मित च्या केसांवरून हात फिरवत त्याच्या कपाळावरती आपले ओठ ठेवले .
मित ने तिच्याकडे बघितलं आणि तिला घट्ट मिठी मारली . "मनु नको ना गं जाऊ , मला सोडून नको जाऊ ".
मित इतका कळवळून बोलला कि मनु पूर्ण विरघळली . काही न बोलता ती त्याच्या मिठीत शिरली . थोड्या वेळाने जेव्हा भानावर आली तेव्हा काय झालं हे जाणवून लाजली . आता मात्र मित पासून दूर जायचं नाही हे पक्क ठरवलं तिने .
कपडे ठीकठाक करतेय तोपर्यंत दारावरची बेल वाजली . मित तसाच झोपला होता . काय करावं न सुचून तिने दार उघडंल . समोर रोहिणीचे पप्पा उभे होते . ते पण आवक झाले मनु ला बघून .
" तू ? इथे ?"
"उं. . . हो " मनु जेमतेम बोलली . तेवढ्यात ते आत शिरले , त्यांना परिस्थितीचा अंदाज आला . संतापुनच त्यांनी विचरलं ," तुझ काय काम आहे इथे ? तू मित च्या आयुष्यातून निघून जाणार  म्हणून वचन दिलं होतंस नं ? मग इथे काय करते आहेस ? "
मनूच्या तोंडून शब्द फुटत नव्हता .
"चल निघ इथून . झालं गेलं विसरून जा . परत जर मला तू मित च्या आसपास दिसलीस तर तो मात्र आपल पुढंच आयुष्य जगू शकणार नाही , हे लक्षात ठेव ".
मनु खूप घाबरली , गोंधळली . ती तशीच उभी राहिली . रोहिणीच्या पप्पांनी हात धरून तिला बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला .

क्रमश :