Wednesday, 3 December 2014

मुग्धा -५ - शेवटचा भाग

मुग्धा सुन्न होवून बघतच राहिली त्याच्याकडे . तो जे काही बोलला , ते समजायला वेळ लागला तिला . आणि तिला अचानक सगळ्याची भयानकता जाणवली . काय करून बसलो आपण हे ? वरद असा आहे ? आपल्याला कसं कळल नाही हे ?
"बघ मी असा आहे . आपल्याला कुणी आवडलं तर चार दिवस मजा करावी झालं . नंतर तू तुझ्या वाटेला , मी माझ्या . कुणीही एकमेकाच्या वाटेत यायचं नाही . मी लग्न करेन पण तुझ्यासारख्या मुलीशी नक्की नाही . "  एवढं बोलून वरद उठला आणि निघून गेला .
ती तशीच बसून राहिली मिळणारे धक्के पचवत . हे सगळ असह्य होतं तिच्यासाठी . ती कितीतरी वेळ तशीच बसून राहिली . जेंव्हा वेटर थोडा मोठ्या म्हणाला ," काही आणु का मॅडम ?" तेव्हा ती दचकली आणि भानावर आली . ती तशीच उठली , सगळ जग आपल्याभोवती गरगरतय असा वाटत होतं तिला . ती ऑफिस कडं निघाली , पण धड चालताही येईना तिला . पायातली ताकद कुणीतरी शोषून घेतली आहे असं वाटत होतं तिला . डोक्यातले विचार भरकटत चालले होते तिचे . काय करून बसलो आपण हे ? एवढे वाहवलो ? त्याच्यासाठी , ज्याला आपली काहीही किंमत नाहीये . त्याच्यासाठी हा  खेळ होता फक्त . आपण  मूर्ख आहोत . आपण कसलीच खात्री करून घेतली नाही . त्याच्या प्रेमाची पण नाही .  त्याने बोलावलं आणि आपण गेलो . शी .
याच विचारांमध्ये ती ऑफिस ला पोहोचली . शिल्पा तिच्या जवळ आली . " मुग्धा , काय झालाय तुला ? अशी का दिसते आहेस ? तू आणी वरद हॉटेल मध्ये गेला होता ना ?  काय झालं ?"  ती सुन्नपणे बघतच राहिली शिल्पाकडे . शिल्पाच बोलणं जणू तिच्या कानापर्यंत पोहोचताच नव्हंत . शिल्पा ला कळेना हि अशी का बघतेय ते . काहीतरी झालं आहे एवढ लक्षात आलं तिच्या . तिने थोडं काळजीनच विचारलं " काय झालं ?" तिच्या काळजीन मुग्धाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तशी शिल्पा तिला  बाहेर आली आणि थोडी वैतागूनच म्हणाली ,"काय झालं आहे नक्की ? सांगणार आहेस का आता ? काल पण असंच केलंस ."
थोडी शांत होत पहिल्यांदाच मुग्धा ने जे घडलं ते सांगितलं . शिल्पा आवक् झाली ऐकुन . " अगं , इतकं सगळं मनात होतं  आणि एकदाही बोलली नाहीस मला ? निदान त्याच्याघरी जायच्या आधी तरी ? काहीतरी माहिती काढली असती आपण . अशी कशी तू ? त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही , आणि भेटायला गेलीस तू त्याला ?"
ती काहीही बोलली नाही . फक्त रडतं राहिली . शिल्पा ला दया आली तिची . " रडू नको गं . मी बोलू का वरद शी ?"
"काय बोलणार तू ? त्याच प्रेम नाहीये माझ्यावर ", कळवळून मुग्धा म्हणाली ," त्याला फक्त शरीर हवं होतं गं, माझ्या मनाशी काही लेणदेण नाही त्याला . मी सगळ्यांपासून लांब राहत होते तेच बरं होतं . निदान अशी फसले तरी नसते . " शिल्पाने तिला थोडं शांत होवू दिलं आणि मग विचारलं ," आता काय ठरवलं आहेस ?"
" मी नोकरी सोडेन ".
"काय !?" शिल्पाचा काय इतका मोठा होता , कि आजूबाजूने जाणारे सगळे तिच्याकडे बघायला लागले .
" अगं वेड लागलं आहे का तुला ? एवढी सोन्यासारखी नोकरी सोडणार तू ? आणी घरी काय सांगणार ? "
"घरी काय सांगणार अगं ?पण वरद समोर असताना असं परक्यासारख काम करणं जमणार नाही मला . आणि त्यातून तो दुसऱ्या मुलीच्या हातात हात घालून बसलेला तर अज्जीबातच चालणार नाही . वेडी होईन गं मी . " एवढं बोलून ती परत रडायला लागली .
"अगं रडतेस कसली ? चीड यायला हवी तुला . त्याच्या मुस्कटात मारायला हवीस . सरांच्या कडे तक्रार करायला हवीस . ते राहील बाजूला , रडतेस कसली ? आणी या असल्या माणसासाठी नोकरी सोडणार तू ? त्याला काय तू साधी आहेस , त्याच्यावर प्रेम करतेस हे कळलं नसेल ? त्यान गैरफायदा घेतला आहे तुझ्या भावनांचा ,त्याला काय असंच सोडायचं ?" खूप  पोटतिडकीन बोलत राहिली आणि आपण फक्त तिला खूप रडवतो आहे हे जाणवल्यावर गप्प झाली .
ऑफिस मधून घरी येताना पण रस्त्यावरच्या सगळ्यांना कळलंय आपण काय केलाय ते ,आपण कसे मुर्ख आहोत ते , असंच काहीसं वाटत राहिलं तिला .
 घरी आल्यावर बरं नाही म्हणून ती सरळ आत जाउन पडली . तशी आई आत आली ," मुग्धा , तुला राग येत असेल ना गं माझा ? सारखी बोलते म्हणून ? पण अगं आम्ही असेच वाढलो आहोत . स्वतःच्या मनाला मारून जगायचं . मनासारखे काहीही करणं म्हणजे चुकीचंच आहे असंच शिकवलं गेलं आम्हाला . मन मारण्यात संसाराचं भलं होत याच विचारांची
झाले गं मी पण . तु पण तसंच करावस असं वाटत होत मला . म्हणून तुझ्यावर बंधन घालंत गेले मी . लोकांना भिवून जगतो  गं आम्ही, तू पण तसंच जगावस असा वाटत राहील मला . तुला वाटत असेल आई आज हे सगळं का बोलतेय ? खरतर २-३ दिवसापासुन बोलायचं ठरवत होते मी . पण तुझी तब्येत बरी नाही  बसले .
परवा तुझी डायरी वाचली , त्यातली तुझी स्वप्नं वाचली . उंच आकाशात उडायची , सगळ जग बघायची , भरपूर पुस्तकं वाचायची , एक सुंदर हसरं आयुष्य जगायची . आणि जाणवलं आपण आपल्या पोटाच्या मुलीलाच ओळखु शकलो नाही . आई अशी नसते न गं ? तुलापण असंच वाटत असेल ."  बोलतां  बोलतां आईचा कंठ भरून आला .
मुग्धा बघतां  बघतां आई च्या कुशीत शिरली आणि स्फुंदून स्फुंदून रडायला लागली . आईचा हात डोक्यावरून फिरत असताना अपराधीपणाची जाणीव अजूनच गडद झाली .
सकाळी तिला उठवेना , डोकं आणि अंग पण जड झाल्यासारखं  वाटत होतं . आई उठवायला आली आणि तिची अवस्था बघून घाबरली . तिने कपाळावर हात ठेवला आणि चटका बसला तिला . चांगलीच तापली होती ती . आईने तिला ताप  उतरायची गोळी दिली आणि त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन केला .
" खूप जास्त ताण घेतला आहे मुग्धाने वाहिनी . तिला एक आठवडा तरी ऑफिस ला जाऊ देवू नका . फक्त विश्रांती गरजेची आहे ." डॉक्टरांनी सांगितले .
तिने एक आठवड्याची सुट्टी टाकली .  एकीकडे आईशी संबंध सुधारत होते आणि दुसरीकडे टोचणी अजूनच वाढत होती.
आठवड्यानंतर ती ऑफिस ला परत आली . शिल्पा तिच्या जवळ आली ," कशी आहेस मुग्धा आता ? किती त्रास करून घेतलास गं स्वतःला ? तिकडे तो मज मारतोय आणि तू मात्र ?"
" चूक माझ्या हातून घडली आहे . शिक्षा पण मलाच भोगायला हवी . " खिन्नपणे मुग्धा म्हणाली .
"मुग्धा तू बदली करून घे , आपल्या गोव्याच्या ऑफिस ला . आवडेल तुला तिथं राहायला "
"बघते " म्हणून तिने कॉम्पुटर मध्ये डोकं घातलं . पण तिचं  मन काही कामात लागेना . तेवढ्यात तिला वरद दिसला , मीना बरोबर परत येताना . आणि मुग्धाच्या हृदयातून कळ आली . ती अस्वस्थ झाली खूप . वरद नं लक्ष दिला नाही .
आजचा दिवस संपतच नाहीये असं वाटलं तिला .
शेवटी आईशी बोलून तिनं गोव्याला बदली करून घेतली . आईने पण फारसे आढेवेढे घेतले नाहीत . कुणास ठाऊक आजपर्यंत जे वागली त्याचं परिमार्जन असावं .
गोव्याला दोघींच्या पण आयुष्याचा नवीन अध्याय सुरु झाला . गोव्याच्या वातावरणान तिला भुरळ घातली . जे घडलं त्याची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागली . दोघींचं आयुष्य खूप छान जायला लागलं . इथे दिवस भरभर जात होते . ती आईबरोबर अष्टविनायक करून आली आणि आई तिच्यासाठी म्हणून केरळ ला आली . दोघींना पण आपण एकमेकींसाठी आहोत याचा खूप आनंद होत होता , नव्याने सापडलेलं नातं दोघीही मनापासून उपभोगत होत्या .
बघता बघता दोन वर्ष निघून गेली . आता मात्र आईला तिच्या लग्नाचे वेध लागले . आणि ती मात्र विषय टाळायला लागली . मात्र या सगळ्यामुळे तिला जे घडलं होतं ते आठवल आणि पहिल्यांदाच जाणीव झाली , हे ओझ घेवून आपण लग्न नाही करू शकत .
एके दिवशी ऑफिस मध्ये काम करत असताना कुणीतरी अचानक समोर येवून उभं राहिलं . तिने मन वर करून पाहिलं . वरद . ती दचकली . तो खूप हरवल्यासारखा दिसत होता , बारीक झाला हित , डोळे खोल गेले होते .
"काय हवंय ?" नकळत खूप कोरडेपणाने तिने विचारले ?
" तुझ्याशी बोलायचं आहे " त्याच आवाज पण खूप खोल गेला होता
" मला वेळ नाही , खूप काम आहेत मला "
" नाही म्हणू नको गं मला , खूप धाडस करून आलो आहे इथं मी . हात जोडतो तुझ्यापुढे . खूप वेळ नाही घेणार तुझा ." तो गयावया करत म्हणाला . तिला आश्चर्याचा धक्का बसला  आणी नकळत बोलून गेली ती ,"ठीक आहे , लंच मध्ये भेटू . ऑफिस समोर सुखसागर म्हणून हॉटेल आहे तिथे ये १वाजता . "
" खूप उपकार झाले गं " त्याने हात जोडले
तो गेला आणी मुग्धाच कामातलं लक्ष उडालं . काय  झालाय याचं ? असा काय झाला आहे हा ? काय बोलायचं असेल ? ते पण एवढ्या दिवसांनी ?
कसाबसा १वाजेपर्यंत वेळ काढला तिने . आणि ती हॉटेल कडे गेली . तो आधीच आला होता .
"काही खाणार का ? "
"नको "
" थोडं  घे गं  , प्लीज ." त्याने आर्जवाने म्हटलं , तिला नाही म्हणता आलं नाही .
त्याने कॉफी आणी सॅंण्डविचेस् मागवली. "बोल आता , माझ्याकडे फारसा वेळ नाही " .
" माफ कर माल . मी तुझा अपराधी आहे गं . मला त्याची जाणीव नव्हती . आपल्याच मस्तीत होतो मी . जोपर्यंत सॅली भेटली नाही , तोपर्यंत मुलीना वापरून सोडून द्यायचं असतं , असाच वाटत राहिलं मला . खूप चुकलं गं माझं" म्हणून त्यानं ओंजळीत चेहरा लपवून रडायला सुरवात केली .
मुग्धाला आपण काय करावं हे कळेना . ती गप्प बसली . थोडा शांत झाल्यावर वरद ने परत बोलायला सुरवात केली ," तू निघून गेल्यावर मला काहीही फरक पडला नाही . किंवा तुझ मी काय करून ठेवलं होता याचाही . कारण मला भेटलेल्या मुलीपण अशाच होत्या, फारशा न गुंताणाऱ्या . माझी मौजमजा चालुच होती . आणी त्यातचं ती भेटली , सॅली. तुझ्याच जागेवर आली . सुंदर , हुशार आणि खूपच छान होती . कुणीही प्रेमात पडावी अशी .
मी तर तिला बघितल्यावर पागलच झालो . एकदम प्रेमात पडलो . तिच्याशिवाय जगण व्यर्थ आहे असं वाटायला लागलं.  एकत्र काम करत असल्यामुळं तिचा सहवास पण भरपूर होता . तिच्या  वागण्याने  आणि हुशारीने तर  जास्तच आवडायला लागली मला ती . तिच्याशिवाय मला काही सुचेना . ती पण खूप जवळ येत गेली . बाकी मुलींबद्दल जसं वाटायचं तसं सॅलीबद्दल वाटत नव्हत . तिच्याबद्दल फक्त प्रेम होतं मनात . तिचं माझ्याबरोबर असणं खूप महत्वाचं वाटत होत मला . तिच्याशिवाय एकही क्षण काढणं म्हणजे शिक्षा वाटत होती मला . मी तिला काहीही सांगितलं नव्हत पण तिला कल्पना आली असावी . माझे सगळे दिवस आनंदाने भरलेले होते . ती म्हणेल ते करायची तयारी होती माझी . अगदी उंच कड्यावरून उडी मार म्हणाली असती तरी , मी मारली असती .
जवळपास ६ महिन्यांनी मी तिला मागणी घालायची ठरवली . तिला लोणावळा खूप आवडायचं . म्हणून मग तिकडेच तिला घेवून जायचं ठरवलं . मी तिला विचारल्यावर ती हो म्हणाली . तिला बहुतेक अंदाज आला होता . लोणावळ्याला पोहोचल्यावर एका छानशा ठिकाणी नेलं तिला मी . तिथे पोहोचल्यावर तिला एक टपोरं लाल गुलाबाचं फुल दिलं . आणि सिनेमात दाखवतात तसा तिच्यापुढे गुडघे टेकून , तिच्यासाठी घेतलेली हिऱ्याची अंगठी पुढे करत तिला म्हणालो ,' सॅली, आयुष्य खूप सुंदर आहे . पण , त्याला जर सुंदर साथ मिळाली तर ते अजूनच सुंदर होतं . मला तुझ्या साथीने माझं आयुष्य सुंदर करायचं आहे . तुझ माझ अस्तित्व एकचं असावं असं वाटतंय मला . माझ्या आयुष्याला अर्थ तुझ्यामुळे मिळणार आहे . तू आणि मी एक व्हावं असं वाटतंय मला . होशील का गं माझी ? विरघळशील माझ्यात ?'
सॅली खूप लाजली . तिने पुढे केलेल्या बोटात मी अंगठी चढवली आणि तिला मिठीत घेतलं . मी पूर्ण झालो होतो .
आजही लाजलेली सॅली आठवली कि पीळ पडतो माझ्या मनाला . माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता तो . आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो , नवीन आयुष्याची स्वप्नं रंगवत होतो .
पण आयुष्य किती क्रूर असतं गं . मी तुझ्याशी जे वाईट वागली त्याचा बदला म्हणून देवाने माझी सॅली माझ्यापासून दूर केली . " वरद चा गळा भरून आला . मुग्धा शांत बसली होती .
" आम्ही परत येत असताना एका ट्रक ने धडक दिली आम्हाला . सॅली जागच्या जागी गेली . मी बेशुद्ध होतो आठवडाभर . शुद्धीत आलो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या हातात ती अंगठी ठेवली . आणि मला कळलं आपण आता कायमचे एकटे राहिलो . दोन महिन्यात मी बरा झालो . पण मनाच्या जखमा भरून येत नाहीत गं . तुला मी दिलेल्या जखमा पण तशाच असतील . सॅली शिवाय येणारा प्रत्येक दिवस माझ्या यातना वाढवत होता . मला जगणं  नकोसं करत होता . माझी अवस्था बघून आईने मानसोपचार तज्ञाला दाखवले मला . त्यांच्या उपचाराने मला बंर वाटत होतं . पण मनावरच ओझं काही उतरत नव्हत . असंच  एके दिवशी मी डॉक्टरांना तुझ्याबद्दल सांगितलं . आणि त्यांनी मला माझीचूक सांगितली . तुझी माफी मागायला सांगितली . खंर सांगतो मुग्धा , तुझी माफी मागायची ठरवली आणि मला खूप हलक वाटलं . खूप धाडस करून आज तुझ्यापुढे उभा आहे मी . माझ खूप चुकलं गं , माफ कर मला " त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि हात जोडून उभा होता तो .
मुग्धाच्या डोळ्यात अश्रु होते आणी मनात खळबळ . खूप वाईट वाटत होता तिला . तो कसाही असला तरी एकेकाळी प्रेम केलं होत तिने त्याच्यावर .
तिथून निघताना पहिल्यांदा खूप मोकळं वाटत होतं तिला . एवढ्या दिवसातली अपराधी पानाची जाणीव नाहीशी झाली होती . खांदे पाडून पाठमोऱ्या चालणाऱ्या वरद कडे पाहून देवाला साकडं घातलं तिने ,'याला सुखी ठेव'.




Tuesday, 2 December 2014

मुग्धा - 4

असेच ३-४ महिने निघुन गेले. . एवढ्या वेळात आॅफीसच्या पार्टीच्या नावाखाली तिघेही १-२ वेळा रात्री जेवायला गेले, सिनेमाला गेले. त्यावेळी ती आणि वरद जवळ बसले होते. त्याच्या अधुन मधुन होणा-या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उठत होते.
यातच एकदा त्याने 'माझ्या घरी येशील का ?' म्हणून विचारले . शिल्पाला सांगू नको म्हणून सांगायलाही विसरला नाही तो . तिला आपण जगाच्या सर्वोच्च स्थानी असल्यासारखं वाटलं . काय करू आणि काय नको . माझ्या आईला आवडेल तुला भेटायला . असं म्हटल्यावर तर स्वर्ग दोन बोटं उरला तिला .
ती खूप खुश होती , अजून घरी सांगितलं नव्हत तिने . पण, अलीकडे आईच्या बोलण्याच काही वाटेनास झालं होतं . तरीपण आईला न सांगता असं त्याच्या घरी जाणं म्हणजे काहीतरी धाडसी वाटत होतं मुग्धा ला . आई आजपर्यंत जे काही वागली , जो काही मनाचा चुराडा तिने केला , त्या सगळ्याचा बदला घेतल्यासारखा वाटत होता . आपल्याला वरद मिळणार असेल तर अजून काहीही नको , इथपर्यंत विचार गेले तिचे .
तिच्या आईला तिचं वागण खूप खटकत होतं . नवीन कपडे घेणं , बाहेर जेवायला जाणं , सिनेमाला जाणं , काही काहीच बरं वाटत नव्हतं . येणाऱ्या सगळ्या स्थळांना ती नकार देत सुटली होती , त्यामुळं आई अजूनच अस्वस्थ होत होती . फक्त नोकरी चांगली आहे म्हणून आई टोकाला जात नव्हती .
पण आज मात्र , सुट्टीच्या दिवशी , नटून थाटून बाहेर जाणाऱ्या आपल्या लेकीला तिने जर वैतागुनच विचारले ," आता कुठे दौरा ? घरी नाही का बसता येत?"
" अगं तुला मधे बोलले नव्हते का मी ?ऑफिस मध्यल्या सगळ्याजणी मिळून आम्ही बाहेर जेवायला जाणार आहोत ते? तू माझी वाट बघत बसू नको , मी किल्ली घेतली आहे . तू जेव आणि झोप . " मुग्धाचं बोलणं ऐकुन , आई चिडूनच म्हणाली ,
" हे बघ मुग्धा , या आधी पण सांगितलं होतं तुला , मला हि असली थेरं पसंत नाहीत . लग्न करायचं आहे तुझ , उगाच मुलाकडच्या लोकांच्या कानावर काही वाकडं तिकडं जाता कामा नये . "
"चुकलं माझं आई , शेवटचं जाऊन  येते . यापुढे नाही जाणार . आजच्यासाठी आधीच कबूल केलं होतं त्यांना . " अगदी गयावया करत बोलली . आजचा दिवस कोणत्याही परिस्थितीत चुकवायचा नव्हता तिला .
वरदने सांगितलेल्या खुणांवरून त्याचं घर शोधणं जड गेलं नाही तिला . आजूबाजूची वस्ती तशी बरी होती . ज्या इमारतीत त्याचा फ्लॅट होता ती पण चांगली दिसंत होती . तिच्यापण नकळत तिला हायसं वाटलं . लग्न झाल्यावर आपण इकडे राहणार या विचरानेच   लाजली ती . वरद चा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता आणि त्याला लिफ्ट होती , म्हणून बरं . तिला त्यांच घर आठवलं . एका साध्याशा बिन लिफ्ट च्या इमारतीत , चौथ्या मजल्यावर होत्या .
विचारांच्या धुंदीत तिने वरदच्या फ्लॅटची बेल कधी वाजवली , हे पण तिला कळलं नाही . एका तरुणाने दार उघडलं . " वरद , वरद इथेच राहतात का?" तिने थोडं आश्चर्याने विचारलं . "हो " ताडकन बोलून बोलून तो तरुण झपझप पायऱ्या उतरून गेला .
" ये गं मुग्धा , आत ये " वरद चा आवाज आला तशी ती आत गेली . घर मोठं नसावं असं  वाटलं तीला . हाॅल तरी लहान होता. घरात सामान पण फारसं दिसत नव्हतं . हाॅलमधून दुसऱ्या खोलीकडे जाणारया वाटेवर उभं राहून वरद बोलत होता . त्या बाजूला बहुतेक दोन खोल्या आहेत , तिच्या मनात आले . सोफ्याकडे बोट दाखवत वरद म्हणाला ," बैस बैस . मी पाणी घेवुन येतो . आता गेला तो माझा मित्र . आमचा जरा वाद झाला म्हणून तो भांडून गेला आहे . येईल परत . तू बैस , मी पाणी आणतो ".
त्याच्या मनमोकळ्या खुलाशाने तिला बंर वाटलं . घरात अजून कुठलाच आवाज येत नव्हता . तिला थोडं आश्चर्य वाटलं . याची आई कुठं गेली ? तिच्या मनात आलं आणी तेवढ्यात पाणी घेवून वरद आला . मस्तपैकी ट्रे मधून काचेच्या पेल्यातील पाणी बघून तिला एकदम हसू आलं .
" काय झालं ?"
" काही नाही रे , खूप छान वाटलं ".
तिच्या हातात पाणी देवून वरद तिच्या जवळ बसला. त्याला आपल्या इतकं जवळ बसलेलं बघून लाजली ती . त्याच्या स्पर्शाने अंगावर रोमांच आले .
"वरद , आई कुठे आहे रे ?"

" आई ? अगं आई इथे राहत नाही . ती गावाकडे असते . इथे मी आणि  मगाशी गेला तो मित्र , असे आम्ही दोघेच राहतो."
मुग्धा दचकली आणि पटकन उभी राहिली . " मी त्यांना भेटायला आले होते , निघते अरे मी . " तिच्या हाताला धरून खाली बसवत वरद म्हणाला ," तुला आवडत नाही का गं मी ? तुझ्याबरोबर अज्जिबात वेळ मिळत नाही म्हणून तुला इथे बोलावलं . आणि तू निघालीस .?" वरद अशा  पद्धतीने म्हणाला कि मुग्धा पटकन खाली बसली . वरद तीच्या बोटांत बोटं अडकवून , तिच्या डोळ्यात डोळे घालून कानात कुजबुजत म्हणाला ," मला तू खूप आवडतेस मुग्ध . अगदी मनात लपवून ठेवावी अशी. तू खूप सुंदर आहेस . मला खूप आवडतेस ". तिला त्याचा श्वास आपल्या कानावर जाणवत होता. त्यामुळे येणारे शरीरातील उमाळे थांबवण तिला शक्य झालं नाही . तो अजूनच जवळ सरकला .
साधारण दोन तासांनी दारावरची बेल वाजली . त्याने गडबडीने तिच्या अंगावर कपडे फेकले . आणी "आलो आलो " अशी आरोळी ठोकली .  ती दचकली , आपल्या आयुष्यातल्या इतक्या सुंदर प्रसंगाची अशी सांगता ? पण तिला विचार करायला फारसा वेळ न देता, तो तिला कपडे घालायची घाई करायला लागला . ती बेसिन पुढे उभे राहून विस्कटलेले केस आणि चेहरा सरळ करत असतानाच त्याने दार उघडलं . तो मगाचा मित्र आत आला , तशी मुग्धाच्या हाताला धरून तिला जवळ जवळ ओढतच वरद खाली घेवून आला .
"काय झालं वरद ? आपण असे घाई गडबडीने खाली का आलो ? ". वरद काहीच बोलत नाहीये असं बघून मुग्धाच पुढे म्हणाली ," वरद , जेवायला जाऊया ना रे ?" तिच्याकडे एकदम वैतागून बघत वरद म्हणाला ," तू जा आता घरी , उद्या बोलू " तिच्या बोलण्याची वाटही न बघता तो सरळ इमारतीकडे चालायला लागला . तिला धक्का बसला . त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघतच राहिली , सुन्न होवून . कितीवेळ अशी उभी होती कोणास ठावून . रस्त्यावर मारलेल्या कर्कश होर्नमुळे दचकली आणी भानावर आली . आधी तिला आपण या इमारतीकडे का बघत आहोत हेच लक्षात येईना . मग हळू हळू मागे वळून ती रस्त्याकडे चालायला लागली . आपलं  काहीतरी हरवलं आहे असा वाटंत राहिलं तिला .
रिक्षातून परत येताना लागणाऱ्या गार वाऱ्याने जर बंर वाटलं तीला . मनातले विचार शांत व्हायला लागले . उद्या विचारू त्याला . नक्की काय झालं ते ? आणी लग्नाचं पण विचारू . आपण उगाचच असा विचार केला . त्याच नक्कीच प्रेम
असणार आपल्यावर . या विचारांबरोबर तिला खूप छान वाटलं . त्याचा स्पर्श आठवला आणि लाजली ती . त्याच धुंदीत
घरी कधी पोचली ते कळलंच नाही तिला .
आई झोपली होती म्हणून बरं. नाहीतर तिला आज तोंड देण खूप अवघड झालं असतं. ती झोपायला गेली , पण आज झोप लागणं शक्यंच नव्हतं . सगळ्या अंगभर सुखाच्या लाटा जाणवत होत्या तिला . ती तशीच पडून राहिली . पाहते कधीतरी डोळा लागला तिचा . आणि लगेच आईची हाक आली . आज अंग जड झालं असलं तरी मन मात्र ताजतवानं होतं . कधी एकदा ऑफिसला जाउन वरद ला बघू असं झालं होतं तिला . त्याला आवडणारा ड्रेस घालून ती ऑफिस ला निघाली . आई तिच्याकडेच  बघत होती . पण बोलली नाही काही . तिला थोडं विचित्र वाटलं . पण आज आईकडे लक्ष द्यायचा दिवस नव्हता. ती निघाली .
नेहमीप्रमाणं ती आपल्या जागेवर बसली . तिला वाटलं , तिला आलेली बघून वरद लगेच येईल . पण बराचवेळ झाला तरी तो काही आला नाही . मग तीच त्याच्या जागेकडे निघाली आणि वाटेतच थबकली . तो मीनाशी बोलत होता , तिच्या डोळ्यात डोळे घालून काहीतरी सांगत होता . मीना लाजत होती . मुग्धाच्या भोवती ऑफिस गर्र्कन फिरलं . तिचे डोळे भरून आले. ती पटकन आपल्या जागेवर येवून बसली . तेवढ्यात शिल्पा आली . मुग्धाच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताचं दचकली .
" काय गं ? काय झालं मुग्धा ? अशी का दिसते आहेस ? आईशी भांडण झालं का ? का साहेब काही बोलले ?"
मुग्धाच्या तोंडातून शब्दच फुटेना . शिल्पा च्या प्रेमळ बोलण्याने तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या . शिल्पाच्या लक्षात आलं कि काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात बिनसलं आहे . शिल्पा तिला घेवून बाहेर आली आणि सरांना सांगून येते म्हणून परत आत गेली . मुग्धा तशीच उभी राहिली , हरवल्यासारखी . तिला काही सुचत नव्हत . वरद असा का वागतो आहे आपल्याशी ? मीनाशी इतक्या जवळून काय बोलत असेल ? विचारांचा नुसता गुंता होता तिच्या . इतक्यात वरदाच बाहेर येताना दिसला . तिच्याकडे बघून बेफिकीरपणे हसत म्हणाला , " मंग ? मजा आली न काल ? " तिच्या उत्तराची वाट ही न बघता तो समोरच्या हॉटेल मध्ये शिरला .
ती थिजली . "मजा " शब्द तिच्या मस्तकात घण घातल्यासारखा आदळला . आपलं प्रेम , आपलं समर्पण म्हणजे मजा ?तिचं डोक भिरभिरायला लागलं , आणि तिला चक्कर आली . तेवढ्यात शिल्पा आली म्हणून बरं . तिने सावरलं . सरळ
रिक्षा केली आणि मुग्धाला घरी सोडलं . तिला असं घरी आलेलं  बघून आई घाबरली. तिने मुग्धाला झोपवलं . . दुपारच गरम गरम खायला घातलं. एरवी कटकट करणारी आई इतक्या प्रेमाने लागतेय हे तीला सहन झालं नाही . तीला एकदम खुप रडायला आलं.
आपल्याला नक्की काय होतंय हे कळेना तिला . वरद च्या वागण्याने खूप अस्वस्थ झाली होती ती . सगळी दुपार आणि संध्याकाळ अस्वस्थतेत गेली तीची . ससंध्याकाळी कुणीतरी बाहेर आलेलं जाणवलं तिला . आई कुणाशी तरी बोलत होती . ' हो हो आहे ती . बरी आहे आता . थांबा उठली आहे का बघते , म्हणत आई आत आली  . " मुग्धा साहेब आले आहेत गं तुझे " . तिला उठलेली बघून तिने हाॅल कडे बघून म्हटलं ," या सर , आत या ". मुग्धाला आश्चर्य वाटलं , सर ? इथे ? आणि तेवढ्यात वरद आत आला , त्याला बघून मुग्धा दचकली . हा ! इथे ? आई चहा आणते म्हणून आत गेली . वरद तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाल " कुठं काय झालं आहे तुला ? ठणठणीत तर दिसते आहेस . मी आज पण संध्याकाळचा बेत ठरवला होता , भेटायचा ." आणि वरद हसला . तिला एकदम किळस आली . इतक्यात आई आली . चहा घेवून , " उद्या बरी होवून ऑफिस ला ये " असं काहीसं म्हणत वरद निघून गेला . तिला हायसं वाटलं .
थोड्या धडधडत्या मनानेच दुसऱ्या दिवशी ती ऑफिस ला गेली . जागेवर बसत क्षणीच वरद तिच्या जवळ आला . " आज संध्याकाळी तू घरी यायचं आहेस . " थोडा दरडावून बोलला आणि निघून गेला . तिला घाम फुटला , हे काय चाललं आहे तिला काळात नव्हत . आपण याविषयी वरद शी बोलायलाच हवं हे मात्र लक्षात आलं तिच्या .
" वरद बोलायचं आहे मला तुझ्याशी . "
"बोल "
" नाही इथे नाही , आपण बाहेर जाऊ कुठेतरी "
" चल , समोरच जाऊ . म्हणजे पटकन येत येईल . आज कामं पण खूप आहेत ".
दोघ हॉटेल मध्ये जाऊन बसले .
" वरद , काय झालाय  तुला ? असा का वागतो आहेस ? " भरल्या गळ्याने तिने विचारले .
"कुठं काय झालं आहे मला ? असा काय वागलो आहे मी तुझ्याशी ?"
"तू , तू मला असा का विचरतो आहेस सारखं ? "
" ते ? तुला नाही आवडलं का ? बघ मुग्धा , मला तू आवडलीस आणि तुला पण मी आवडतो म्हणून मी घरी बोलावलं तुला . राजीखुशीचा मामला आहे अगं सगळा "
"तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते ? मी तसली मुलगी नाही . माझं तुझ्यावर प्रेम आहे , म्हणून …"
वरद खो खो हसायला लागला ," प्रेम ? कोणत्या जमान्यात राहतेस अगं तू ? "
" म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही ? " तिचा आवाज तिलाच ओळखता येईना .
" नाही , मी कधीतरी म्हटलं का कि माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? तू जर बरी दिसतेस पण मी प्रेम करावं एवढी चांगली नाहीस . वेळ घालवायला चांगली आहेस , बस्स . तू प्रेम वगैरे शब्द वापरणार असलीस तर आपण लांबच राहू ".

क्रमश:






Monday, 1 December 2014

मुग्धा - 3

आज सकाळ तशी आळसावलेली होती. घड्याळात बघितले आणि ती दचकलीच , एक तास उशीर झाला होता तिला . त्यात आईने तिच्या नावाने ठणाणा सुरु केला . आईपेक्षा आज वरद महत्वाचा होता तिला त्यामुळे आईच्या बोलण्याकडे तीने लक्ष दिलं नाही आणि आवरायला सुरवात केली . एवढ्या वर्षात पहिल्यांदाच तिला जाणवलं कि आपल्याकडे एकही ड्रेस चांगला नाही. खट्टू झाली ती . त्यातल्यात्यात बरा ड्रेस घालून ती ऑफिस ला गेली आणि जाताजाताचं तिने ठरवलं कि आपण शिल्पा ला विचारु , आपल्याबरोबर खरेदीला येशील  का म्हणून . तिला कळंत यातलं खूप . आणि तसंही कितीही झालं तरी ती एकटीच अशी होती जिची मदत होवू शकली असती. ऑफिस मध्ये आल्याआल्या तिची नजर वरदला शोधत शोधत त्याच्यावर जाउन स्थिरावली आणि तो  आपल्याकडेचं बघतो आहे म्हटल्यावर दचकली . खाली मान घालून धडधडत्या हृदयाने आपल्या जागेवर येवून बसली .
दुपारी शिल्पा जेवायला हाक मारेपर्यंत ती तशीच काम करत राहिली . जेवण हसत खेळत पार पडलं. म्हणजे वरद आणि शिल्पा हसत होते , गप्पा मारत होते आणि मुग्धा मात्र मान खाली घालून त्यांच बोलण ऐकत होती. १-२ वेळा दोघांनी तिला गप्पात ओढायचा प्रयत्न केला . पण ती गप्प राहिलेली बघून त्यांनी परत आग्रह केला नाही .
जेवून परत आल्यावर मात्र ती शिल्पाच्या जागेवर गेली . "शिल्पा , माझं एक का आहे . मदत करशील का गं?"
"बोल ना , काय झालं?"
"अगं मला थोडी खरेदी करायची आहे , येशील का ? जावूया का आज ? "
"आज? बंर ,  सांगते घरी आईला , जाऊया आपण ".
मुग्धा एकदम खुश झाली , शक्य असतं तर , लगेचंच गेली असती ती . संध्याकाळी दोघींनी मिळून तिच्यासाठी चांगले ५-६ ड्रेस घेतले . ती सगळे ड्रेस शिल्पाच्या आवडीचे घेत होती. शेवटी परत निघताना शिल्पा म्हणाली पण तिला , "काय गं ? काय विशेष आहे आज ? एकदम एवढे सगळे ड्रेस आणि ते पण माझ्या आवडीचे ? "
"काही विशेष नाही गं . तुला कळंत त्यातलं म्हणून."
"हो ? पण हा साक्षात्कार आता कसा झाला बाई ? एका वर्षाने ? शहाणे , सहा महिन्यापूर्वी तुला चांगले ड्रेस घे म्हटलं तर आजीबाई किती घाबरल्या होत्या ? मग आता काय झालं ? थांब , थांब काही बोलू नको . हा वरदइफेक्ट नाही ना ? बोल , बोल ?"
तीच बोलण एकूण मुग्धा खूप लाजली . हिला कसं कळंल ? नकळतच तिची मान नाही नाही म्हणत खाली गेली . तशी शिल्पाने हसायला सुरवात केली . "अगं लाजू नको इतकी , मला हा बदल आवडला तुझ्यातला म्हणून चेष्टा केली फक्त ". तरीपण शिल्पा जे समजायचं ते समजली .
दुस-या दिवशी नवीन ड्रेस घालताना तिच्या मनात आलं , वरद बघेल न ? त्याला ड्रेस आवडेल न ? त्याच्या लक्षात येईल का ? काय म्हणेल तो आपल्याला ? त्याला समजेल आपल्याला तो आवडला आहे ते ? हा विचार मनात येताच लाजली ती . आणि पटापट आवरून ऑफिस ला पोहोचली . काळाच्या प्रसंगाची पुनरावृत्ती नको म्हणून सरळ खाली मान घालून ती जागेवर गेली . खरतर ती आत आली तसा वरद तिच्याकडेच बघत होता . आणि त्याला तिच्यातला बदल जसा लक्षात आला तसं त्याच्या चेहऱ्यावर स्मित आलं . तो उठून तिच्याकडे गेला ,
"आज काहीतरी विशेष आहे का ?"
"न नाही ", ती गडबडली आणि बघतच राहिली त्याच्याकडे . "नाही म्हणजे ऑफिस मधे काही असेल तर माहिती नाही मला "
"अगं ऑफिसबद्दल नाही विचारात आहे तुला , खूप छान दिसते आहेस आज . "
त्याच्या बोलण्यावर लाजली ती आणि वरद च्या तोंडातून हलकी शीळ बाहेर पडली . तेवढ्यात मागून येत शिल्पा म्हणाली ,"वरद, अरे तू बोलतो आहेस , हेच विशेष आहे तिच्यासाठी ". मुग्धाला अगदी कानकोंड झालं .
अशी कशी हि शिल्पा ? काहीही सांगतेय . असं बोलतात का ? उगाच नेलं काल आपण तिला . इकडे वरद आणि शिल्पा हसत होते . शिल्पा तेवढं बोलून निघून गेली , तसा वरद तिला म्हणाला , "खरंच का गं ? काहीही असलं तरी खूप छान दिसते आहेस तू आज ". हे आईकून तिने मान वर केली , तर वरद तिच्या डोळ्यांमधेच बघत होता . ती लाजली . आज मात्र जेवताना तीच लक्ष पूर्णपणे वरद कडेच होतं. तो काय खातोय , काय बोलतोय आणि तिला जाणवल कि ओ पण आपल्याकडे बघत असतो .
 हे असं रोजच घडायला लागंल आता . ती ऑफिस ला पोहोचल्यावर वरद जर बोलायला आला नाही तर चुकल्याचुकल्या सारखं व्हायला लागलं . आता तर ती पण आपणहून त्याच्याशी बोलायला जायला लागली . आणि तिचं जगचं जणु स्वप्नांचं होवून गेलं . आजूबाजूला काय चाललं आहे यातलं लक्ष उडालं तिचं . तिच्यासाठी सगळीकडे वरदचं  असायला लागला . पण , अलीकडे शिल्पा ला मात्र आपण तिसरे असल्यासारखं वाटायला लागलं . आणि तिने मुग्धाला वरद वरून चिडवायला सुरवात केली . मुग्धाच्या स्वप्नांना पंख फुटले आणि तिने लग्नाची स्वप्न रंगवायला सुरवात केली .

क्रमशः 

Sunday, 30 November 2014

मुग्धा -२

मुग्धाला तिच्या डेस्क वर एक रुबाबदार मुलगा बसलेला दिसला. त्याचा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर पण दिसत होता. तिला बघून तिच्या काळजाचा ठोकाचं चुकला . ती गबाळ्यासारखी त्याच्याकडे बघतंच राहिली. त्याच्याशी बोलायचं धाडसच झालं नाही तिचं . पण तिला तो अगदी पहिल्या दृष्टीक्षेपातंच आवडला . ती भांबावून उभी असतांनाच तिच्या साहेबांनी हाक मारली आणि 'वरद ' अशी हाक मारली . 'वरद ,वरद .... ' तिच्या मनात नाद उमटंत गेला . "आजपासून तू याला रिपोर्ट करायचा , म्हणजे आजपासून हा तुझा बॉस ". काहीच नं कळुन ती साहेबांच्याकडे बघतंच राहिली . "अगं म्हणजे मी तुझा बॉस राहणारच आहे पण वरद तुमच्याबरोबर काम करेल आणि तुमच्या रजेचं वगैरे माझ्याकडे असेल . वरद आजपासून आपल्या ऑफिसला जॉईन होतो आहे . तू आणि शिल्पाने त्याला रिपोर्ट करायचं आहे . आजचा दिवस तो तुझ्या जागेवर बसेल , तू आणि शिल्पाने मिळुन त्याला सगळं समजावून सांगा . वरद , तुला काही गरज लागली तर मुग्धा ला सांग ." "हो सर , मी सगळी मदत करेन त्यांना ". शिल्पा पण बरोबर आहे म्हणजे झालं , तिच्या मनांत  आलं . आत कशाला हा बोलेल आपल्या बरोबर ? मुग्धाला शिल्पा आवडंत नव्हती असं नाही. पण का कुणास ठावुक आता तिला ती बरोबर नको असं पण वाटत होतं तिला . तेवढ्यात तिला समोरून शिल्पा येताना दिसली तिला . खुपचं छान दिसंत होती आज ती . आल्या आल्या तिने मुग्धा ला  हाय केलं ," काय गं ?अशी का दिसते आहेस ? घरी सगळं ठीक ना ? साहेब काही बोलले का? " तिने बोलता बोलता मुग्धाच्या पाठीवर हात  ठेवला. 'हि इतकी चांगली कशी वागू शकते आपल्याशी ?हीच एकटी अशी आहे जीच्याशी आपण थोडंफार बोलू शकतो'. इतक्यात शिल्पाचं आणि वरदचं बोलणं कानावर पडलं आणि ती दचकली . आपण आपल्याच विचारात किती बुडलो होतो हे जाणवून ती अजुनच ओशाळली . तिच्या पाठीवर हात मारून शिल्पा वरदला म्हणाली , " तिच्या अश्या दिसण्यावर जाऊ नको हं . तिला खूप छान कविता महिती आहेत. आणि ती भरपूर पुस्तकं पण वाचते . आणि कामात तर ती १नंबर आहे . कळेलंच तुला ." वरद तिच्याकडे बघून छानसं हसत म्हणाला ," अरे वा !  छान . मला स्वतः ला कविता खूप आवडतात . मजा येईल तुझ्याबरोबर काम करायला . आता ऐकव बघू एखादी छानशी कविता . ती ऐकुनच कामाला सुरवात करू. " आता तर तिला त्याचा आवाज पण आवडला . पण कविता ऐकव म्हटल्यावर तिच्या मात्र तिचं त त प प व्हायला लागलं . तेवढ्यात शिल्पा पण म्हणाली , "ऐकव कि गं ". आता मात्र मुग्धाच्या गळ्यात आवंढा आला आणि तिला बोलताचं येईना . ती दोघांकडे बघत राहिली . दोघपण तीला आग्रह करत राहिले . आणि एकाएकी वरद तीला म्हणाला , " काय गं ? घाबरलीस का? अशी घाबरलीस तर कसं होणार गं? आपली मैत्री कशी होणार? चल, मीच ऐकवतो एक कविता .

अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ

मावळतीवर चंद्र केशरी
पहाट वारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन

विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुन थेंब सुखाचे
"हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव"

" वा! माझी आवडती कविता आहे ही, इंदिरा संतांची" नकळत मुग्धा बोलुन गेली आणि वरद आपल्याकडेच बघतोय म्हटल्यावर ती लाजली.
आजचा दिवस बघता बघतां संपला. पहिल्यांदाच असं झालं होतं , आॅफीसला आल्यावर वेळ कसा गेला हे कळंलच नाही तिला. घरी आल्यावर पण तीच्या डोक्यातुन वरद जात नव्हता. त्याच बोलंण सारखं आठवत राहिलं तीला, मनांत त्याच्या शब्दांचे तरंग उमटत राहिले  'आपंण मित्र कसे होणारं?'

क्रमश:







Saturday, 29 November 2014

मुग्धा - १

खूप अबोल होती ती, अगदी पहिल्यापासुन , नाही नाही पहिल्यापासून नाही , ती बनली होती अशी . मुलगी वयात येताना इतकी बंधनं घातली जातात कि त्यामुळे एकतर मुली घुम्या बनतात नाहीतात बंडखोर . खूप कमी घरं अशी आहेत, जी या वयातल्या मुलीना समजीन घेतात. असो , तिची प्रवृत्ती दुस-या प्रकारात मोडत होती . ती घुमी बनत गेली . ती म्हणजे "मुग्धा" . नावाप्रमाणेच मुग्ध . असो , तिच्या घुमेपणामुळे ती फारशी कुणामध्ये मिसळत नसे न तिला फारशा मैत्रिणी होत्या . जवळची तर एकही नव्हती. त्यामुळेच कोण जाणे पण ती तिच्या मैत्रिणींशी पण फारशी बोलू शकत नसे . भीती वाटायची तिला . ' आपल्या बोलण्याला हसल्या तर ?' सतत कसल्यातरी काळजीत असल्यासारखी वाटायची . तिला सतत असंच वाटायचं, जे घडतंय ते आपल्यामुळेच घडतंय , आपण विचित्र आहोत म्हणून घडतंय . आणि यातलं काही कुणाला कसं सांगणार ?
यावर उपाय म्हणून तीने पुस्तंक वाचायला सुरवात केली . तशी वाचनाची आवड तिला होतीच . आणि पुस्तक वाचनाला आई पण काही म्हणत नसे . घरात बसून काहीही करायला तिची ना नव्हती . मुग्धाला पण तेच बरं वाटायचं. पुस्तकात डोक घातलं कि ती आजुबाजुच्या जगाचं भान विसरत असे . तिचा वेळ कसा आज असे ते कळंतही नसे. तिला जास्त करून प्रेमकथा आवडत. हळू हळू तिने स्वतःच असं एक कल्पनाविश्व तयार केलं आणि त्यात ती रमत गेली . पण या सगळ्याचा परिणाम म्हणून कि काय तिच्या मैत्रिणी अजूनच कमी झाल्या. त्यातून आपल्याला जे वाटतंय ते सगळं चुकीचंच आहे असं तिच्या मनानं घेतलंआणि मनाला पण मोकळं सोडायला घाबरू लागली. स्वतः स्वतःच्या ब-याच वाटा बंद केल्या तिने . अशातच तीच शिक्षण पूर्ण झालं . आणि नोकरीसाठी वणवण सुरु झाली . प्रत्येकवेळी इंटरव्यु नंतर येणाऱ्या आईच्या टोमण्यांनी बेजार व्हायला लागली . काय करावं सुचेना तिला. पण तिचं नशीब जोरावर होतं. आणि लवकरचं तिला नोकरी लागली .
तिचं नवीन आयुष्य सुरु झालं , पण तिच्या लक्षात आलं कि आपलं आधीच आयुष्य आणि हे आयुष्य  काही फार वेगळं नाहीये.  आता तर आईचं बोलणं अजूनच कुत्सित व्हायला लागलं . ऑफिस मधंल वातावरण पण  फारसं चांगल न्हवतं . ती  एकटीच नवीन होती ऑफिस मधे. आणि जुन्या मुलींचे ग्रुप  झालेले होते . आजूबाजूला वावरणाऱ्या मुली तशा पण थोड्या  फॅशनेबल होत्या . तिला सुरवातीला त्यांनी बोलावयाचे  प्रयत्न केले. ती पण गेली , पण  त्यांचे विषय तिच्यासाठी खूप वेगळे होते .  ते मुलांचे , कपड्यांचे , शॉपिंग चे विषय तिला नकोसे झाले . कारण यात बोलावं असा काही तिच्याकडे नव्हतंच. म्हणुन तीआपणहूनच  त्यांच्यापासून लांब झाली . त्यातल्यात्यात तिची मैत्री फक्त शिल्पा बरोबर झाली . ती पण फक्त जेवायला जाण्यापुरती . ती शिल्पाकडे पण मोकळी होवू शकली नाही . आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तीचं आतल्याआत कुढणं वाढलं . या सगळ्यातुन बाहेर निघण्यासाठी तिचं मन तडफडत होतं . त्यातूनच रात्र रात्र रडणं सुरु झालं तिचं .
अशाच निराश मनस्थितीत ती ऑफिस ला पोहोचली .

क्रमश:

Monday, 24 November 2014

मंगला

अशीच एक संध्याकाळ, भिजलेली, आणि मुंबई -पुणे हायवे वरून गाडी घेवून एकटीच निघालेली  मी . चिंब वातावरण आणि हिरवाई बघून भजी खायची खूप इच्छा झाली. आणि एका वळणावर ती दिसली , छोटीशी टपरी . जशी टपरी जवळ आली तसा कांदा भजी आणि चहाचा मस्त वास आला . लगेच गाडी थांबवली. टपरी वर एक तरुणी होती . तिला म्हटलं , " मला एक गरम गरम कांदा भजी आणि आल्याचा चहा दे". ती खुदकन हसली आणि म्हणाली , "बसा तर ताई , आत्ता देते तुमास्नी ".
दोनचं मिनिटांत गरम गरम भजीची प्लेट समोर आली . वासानं खाऊन घेतली आधी भजी ती . मस्त वाटलं एकदम . पहिली भजी तोंडात घातली आणि जिभेची तृप्तता झाली . चहा टाकून तिने विचारलं ,"आवडली का ताई भजी ?" "खूप सुंदर झाली आहे गं , अगदी मनाची चव आली आहे तिला ". तिला हसू फुटलं . आणि मग ती माझ्या समोर येवून बसली . आम्ही गप्पा मारायला लागलो .
तसंपण रहदारी कमी होती त्या दिवशी त्यामुळे वेळ होता बहुतेक तिच्याकडे . कोण , कुठली ? इथे इतक्या लांब कशी टपरी टाकली ? वगैरे प्रश्न सुरु झाले माझे. कदाचित तिला पण कुणाशीतरी बोलावसं वाटंत असेल. तिने बोलायला सुरवात केली .
"माझ नाव मंगला, ताई. जवळच्याच खेड्यात राहते. एकटीच टपरी चालवते . तसं हाकेवर एक पान बिडीच दुकान आहे बघा . जे गावातली अजून एक बाई सांभाळते . इथे कायबी धोका नाही . आम्ही बरोबर येतो आणि बरोबर जातो . तसे खूप मिळत नाहीत पैसे इथे पण खायचे वांधे होत नाहीत . आणि पावसाळ्यात लोक बरीच थांबतात . काहीतर नेहमीचे गिर्हाईक आहेत आता. "
इतक्यात कोपर्यातून रडण्याचा आवाज आला. बघितलं तर एक १-१/२ वर्षाचं पोर रडंत उठलं . ती लगबगीने तिकडे गेली . तिच्याकडे बघितल्यावर फारतर १८-१९ वर्षाची दिसत होती . ना कपाळावर कुंकू ना गळ्यात मंगळसूत्र. बोलण्यावरून थोडीफार शिकलेली असावी असं वाटलं .
तिने शांत केलं बाळाला आणि जोजवून झोपवलं परत त्याला. "ताई , माझी मुलगी आहे ,सरस्वती . आज , हट्ट केला म्हणून आणलं , नाहीतर आत्या सांभाळते तिला".
"म्हणजे तुझी सासू नाही ? आणि नवरा काय करतो ? कुठं असतो तो ? ". माझे प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं . मला कळेना , आपलं काही चुकलं का ? थोडी शांत होवून म्हणाली ," ताई , १६ वर्षांची होते . घरी आई -बाबा , भाऊ , सगळेच होते . माझे मामा -मामी पण शेजारच्याच गावात राहायचे . माझी नुकतीच दहावीची परीक्षा झाली होती . अभ्यास चांगला झाला होता त्यामुळं मला चांगले गुण मिळणारचं होते. माझा भाऊ माझ्यापेक्षा ३ वर्षांनी लहान , बाबांची नोकरी चांगली होती . आई घरीच असायची . मला काका - काकु वगैरे कुणी नाहीत . माझी दहावीची परीक्षा झाली , माझ्या भावाची पण परीक्षा संपली . शाळेला सुट्ट्या सुरु झाल्या. मला गणपतीपुळे बघायचं होतं, तसा मी बाबांकडे हट्ट धरला . बाबा एवढ्यात नको म्हणत होते , त्यांनी खूप समजावयाचा प्रयत्न केला . पण मी काहीही ऐकायला तयार नव्हते . म्हणतात न ताई , वेळ आली कि कुणाचं काही चालंत नाही  .माझंपण तसाच झालं असावं . बाबा म्हणत होते , कि हे पैसे तुला पुढं काॅलेज ला जायला लागतील . पण मी काहीच ऐकलं नाही ." तिचे डोळे परत भरून आले . काहीतरी कडू आठवण असावी असं वाटलं मला.
थोडी शांत होवून पुढं सांगायला लागली ती , " बाबा कसेतरी तयार झाले . मी मामा - मामीला पण तयार केलं. मामी नाहीच म्हणत होती .   छोटुला जमणार नाही म्हणत होती . पण माझ्या हट्टापुढे तीच काही चाललं नाही. शेवटी आम्ही ट्रॅक्स ने निघालो. आमचं दर्शन खूप छान झालं. परत येताना सगळे खूप आनंदी होतो. पण सकाळी लवकर उठून निघाल्यामुळे सगळेच पेंगुळले होतो . बहुतेक गाडीचा ड्रायवर पण पेंगुळला असावा . एका वळणावर गाडी कधी दगडाला धडकली आणि खाली दरीत घसरली हे कुणालाच कळलं नाही . काय घडतंय काही कळत नव्हतं. खूप अंग दुखत होतं . मला जाग आली ती हॉस्पिटल मध्ये. हातापायाला बॅण्डेज होतं. मला क्षणांत सगळं आठवलं. आणि मी आजूबाजूला बघितलं . माझ्या पलीकडच्या कॉट वर मामा दिसला मला, डोक्याला आणि हाताला बॅण्डेज लावलेला . पण बाकीच कुणीच दिसलं नाही. मी आई बाबा भाऊ दिसतातं का बघायचा प्रयत्न केला . थोडी उठले आणि मस्तकात कळ गेली . तेवढ्यात शेजारी असलेली नर्स पुढे आली आणि म्हणाली ," अज्जिबात उठायचं नाही . खूप लागंल आहे तुला". "माझे आई-बाबा कुठे आहेत ?" मी विचारलं . तर काहीच न बोलत पाठमोरी होत म्हणाली , 'कशाला दारुडे ड्रायवर घेवून जातात कुणास ठावूक? सगळ्यात जास्त आमचीच धावपळ '.
मी गप्प बसले , एकदम शांत झाले . मामाकडे बघताना लक्षात आलं कि मामी आणि छोटू पण दिसत नाही आहेत . मग वाटलं कि ते बरे असतील म्हणून सगळे बाहेर थांबले असतील . पण आई कशी नाही माझ्याजवळ ? एवढ लागलय मला आणि हि बाहेर काय करतेय? मला खूप राग यायला लागला तिचा . पण औषधाच्या परिणामामुळे मी फार वेळ जागी नाही राहू शकले आणि परत झोपले . कितीवेळ झाला काय माहिती ? कानाशी कुणीतरी कुजबुजत आहे असा वाटल्यामुळे मी डोळे उघडायचा प्रयत्न केला . पण ते इतके जड झाले होते कि उघडेचनात. तेवढ्यात मगाच्याच नर्स चा आवाज आला , ' डॉक्टर, मगाशी शुद्धीवर आली होती, आता परत झोपलेली दिसतेय.' 'सांगितलं का तिला कि फक्त ती आणि पलीकडचा माणूस , दोघंच वाचले आहेत म्हणून ", बहुतेक डॉक्टरांचा आवाज होता.
मी सुन्न झाले . फक्त मामा आणि मी ? आई, बाबा , भाऊ , मामी . छोटू सगळेच गेले ? मला काही कळंतच नव्हतं. काय झालं हे ? माझ्या भोवती सगळं तशाच अवस्थेत गरगरत राहिलं . माझ्या दुखा:मुळे मला बरं व्हायला जरा वेळ लागला .
मी बरी होवून घरी आले , मामाच्या . कारण , माझ्या घरी आता कुणी नव्हतंच . मला सारखी आई -बाबांची आठवण यायची . डोळ्यातून पाणी यायचं सारखं . मामा पण बदलला होता . बोलयचाचं नाही माझ्याशी . असेच ७-८ महिने निघून गेले . शेजारच्या काकुंशी  ओळख झाली होती . त्या मला स्वयंपाक शिकवत होत्या , माझ्याशी बोलत होत्या . त्यांच्यामुळे मला खूप बरं वाटत होतं.
असंच एका रात्री सगळं आवरून अंथरुणात पडले होते मी . विचार तर सुरूच होते , आता पुढे काय करावं ? मामा तर कॉलेज बद्दल काहीच बोलत नव्हता . आपणच विषय काढावा का? का काही काम करावं ? मामा ला पण फारसे पैसे मिळायचे नाहीत . काहीतरी काम केलं तर त्याला पण मदत मिळेल. आजच काकू विचारत होत्या , पापड लाटशील का म्हणून . १० पापडांचे २ रुपये मिळतील . विचार  करता करता कधी झोप लागली कळलीच नाही. रात्री अचानक जाग आली . माझ्या अंगावरून कुणीतरी हात फिरवत होतं . मी उठायचा प्रयत्न केला तसं माझ्या तोंडावर हात दाबून तो म्हणाला 'तुझ्या मामाला १००० रुपये रोख दिलेत तुझ्यासाठी , आवाज काढलास तर मुडदा गाडीन तुझा . ' मी खूप घाबरले . तेवढ्यात त्याने माझी ओढणी तोंडावर बांधली , आता माझा आवाज पण बाहेर येईना . मला कळलं माझ्या मामाचा मित्र होता तो . अलीकडं सारखा घरी यायचा आणि टक लावून पाहायचा . मला खूप त्रास व्हायला लागला , खूप कळा यायला लागल्या आणि माझी शुद्ध हरपली ." मंगला थोडी थांबली . टपरीमध्ये  पाणी घेवून शांत बसली . तिच्या चेहऱ्यावरची खळबळचं सांगत होती कि हिने खूप सोसंल आहे .
" मला जाग आली तशी घरात कुणी न्हवत . दरवाजाला बाहेरून कडी होती . मी उठायचा प्रयत्न केला पण माझ्या अंगातून एक जीवघेणी कळ आली . तशीच पडून राहिले मी . थोड्यावेळाने उठले . आणि थंड पाणी अंगावर ओतून घेतलं . मला त्या आठवणीने मळमळंत होतं . भरपूर रडत होते मी . काय झालं हे असं वाटंत होतं . आई - बाबांची खुर आठवण येत होती . आईच्या कुशीत जावसं वाटत होत मला . तशीच पडून राहिले मंग काहीही न खाता . दुपारी कधीतरी दार उघडलं आणि मामा आला . वडापाव माझ्याकडे फेकत म्हणाला  'सटवे , तुझ्या हट्टामुळे माझी बायको आणि छोटू मेले . माझी एकुलती एक बहिण गेली . कुटं फेडशील पाप हे ? बघंच आता कसं हाल करतो तुझं ते !' रागानं मामाचा चेहरा अगदी विचित्र दिसत होता . मी घाबरले . आता मला कळंल होतं मामा असा का वागतोय ते ? मला खूप भीती वाटायला लागली . काय करावं ते समजेना . मामा तसाच निघून गेला . दाराला बाहेरून कडी घालून . रडून रडून दमल्यावर झोपले मी . आणि रात्री परत तसंच झालं सगळं . माझं मन धसंकल , आपंल काही खरं नाही हे कळलं .
दुसर्या दिवशी मामा घरात नाही बघून मी शेजारच्या काकुंना जोरजोरात हाका मारल्या . काकुंनी कसंबसं कुलूप तोडलं आणि दरवाजा उघडला . माझी अवस्था बघून त्या पण घाबरल्या . पण डोक्यावर हात फिरवून मायेनी विचारलं त्यांनी 'काय झालं ग मंगल ?' मी हंबरडाच फोडला आणि सगळं सांगितलं त्यांना . कसं असतं मन ताई , जरा मायेचा स्पर्श मिळाला कि सगळं बोलुन टाकतं. त्या मला त्यांच्या घरी घेवून गेल्या. आणि लगेच मुलाला बोलावून घेतलं .  काकूंचा मुलगा पोलिसात होता .  त्यांनी त्याला सांगितलं संगळ. तो म्हणाला ,' पोलिसात तक्रार दिली तर हिला रिमांड होम मध्ये जावं लागेल कारण अजून लहान आहे हि. ' काकू म्हणाल्या 'अरे, तिथं तरी अत्याचार होणार नाही कशावरून ? त्यापेक्षा त्या दोघांना अद्दल घडेल असं काहीतरी कर आणि हि राहील इथेच माझ्याजवळ . तू पण इथे असत नाहीस . मला सोबत होईल हिची . ' ऐकून मला इतकं बंर वाटलं . ताई , जगात देव असाच असतो . माणसांच्या रुपात भेटतो बघा . काकूंच्या मुलाने पोलिस ठाण्यात नेवुन त्या दोघांना भरपूर बडवलं आणि ताकीद केली परत या गावात पाय ठेवायचा नाही म्हणून . माझा मामा आणी त्याचा मित्र त्यानंतर दिसलेच नाहीत कुटं.
माझं परत एकदा नवीन आयुष्य सुरु झालं काकूंबरोबर . पण देव माझी परीक्षा घेण काही सोडत न्हवता बघा . माझी पाळी चुकली . आणि काकू म्हणाल्या तुझं सगळं आयुष्य पडलं आहे पुढं, आताच ठरव . ताई , माझं आयुष्य संपलंच होतं . एवढं झाल्यावर परत एका जीवाचा बळी घ्यायचं पाप कसं करणार हो ? काकुंना पण समजावलं . आणि जे झालं होत त्यात जन्माला येणाऱ्या जीवाचा काय दोष हो ? काकुना हे पटलं . त्या तयार झाल्या , पण गाव? ५०-६० घरांच्या गावात काही लपत नाही . गावात सगळ्यांना कळलं बघा . आणि मग एका सकाळी गावाचे पंच काकूंच्या दारात आले . ते म्हणायला लागले काकू आम्ही तुमचा आदर करतो , पण हि घाण इथं नको . उद्या आमच्या पोरी बाळींची लग्न हिच्यामुळ व्हायची न्हाईत.
मग मीच म्हटलं पंचांना , 'तुमी काकुना बोलू नका , मी जात्ये इथून '.
सगळे पंच निघून गेल्यावर काकू म्हणाल्या ,' कुटं जाणार गं तू ? '. मला एक लांबची आत्या होती . कधीमधी आमच्याकडं यायची . ती आठवली . काकुना सांगितलं आणि काकुनी पत्र लिहिलं तिला , माझ लग्न केलं मामानं गडबडीत आणि नवरा मेला . आता गरोदर असलेल्या मला माझ्या सासरचे सांभाळायला तयार नाहीत . मामाचा पत्ता नाही कुठं , तुम्ही येवून घेवून जा .' ती आत्या आली . गरीब विधवा असणारी हि आत्या मात्र स्वभावानं फार चांगली होती. तिला बाबांनी अधे मध्ये केलेल्या मदतीची खूप जाणं होती . तसंपण तिला मुलबाळ काही न्हवत , त्यामुळ माझा आधार मिळेल असं वाटलं तिला '. निघताना काकुनी हातात २०० रुपये ठेवले आणि जप म्हणून सांगितलं .डोळे भरुन आले माझे. 
तेव्हापासून इथेच आहे. मला शिकायला मिळालं नाही . माझ्या आयुष्याची वाट लागली . पण सरस्वतीला शिकवून मोठ करायचं आहे आता  . तिचं माझ्यासारखं होवु नये म्हणून रोज थोडे पैशे बाजूला ठेवते मी . मला तिला खूप मोठी झालेली बघायचं आहे ताई . "
सांगताना तिचे चमकणारे डोळे बघतंच राहिले मी . पुढ्यातली भजी कधीच थंड होवून गेली होती . पण आता काही खायची इच्छा पण न्हवती . चहा घेतला आणि मी निघाले .
समोरच आभाळ मोकळं झालं होतं आता . पण मन ? ते कळतंच नव्हत , मोकळं झालाय का भरून आलंय ते .



Wednesday, 19 November 2014

प्रेमाचं नातं

पहिल्यांदाच एवढी मोठी कथा लिहिली आहे . काही चूकभूल असल्यास माफ करणे .



"मीरा " एक स्वतःमध्ये रमलेलं व्यक्तिमत्व . पण खरंच इतकं प्रेम करता येत कुणावर ? नाही , माणसांवर तर नक्कीच नाही . कारण जिवंत माणसावर खूप प्रेम  करणं खूप कठीण असतं . कारण प्रेमाबरोबर अपेक्षा आणि मालकी हक्क पण येतो . खरंच जर कृष्ण जिवंत असता तर मीरा अशी वेडी झाली असती का ? आणि झाली असती तर कृष्णाने  तिला आपलं मानलं असतं का ?
तिला स्वतः लाच जाणवलं कि आपले विचार भरकटत चालले आहेत . का विचार करतोय आपण इतका ? आपलं कॉलेज संपून बरीच वर्ष झाली आहेत. बरीच वर्ष झालीत आपलं ते नातं संपुन. मग ऐकल्या जाणार्या प्रत्येक विरहाणित आपण आपल्यालाच का बघतो ? त्याला कदाचित आपण आठवत पण नसू. तो सुखी असेल त्याच्या संसारात, मस्त जगत असेल . तो तसाच होता मस्त जगणारा . जगण्यावर प्रेम करणारा . आणि फक्त जगण्यावरच प्रेम करणारा . आपण मात्र त्याला आपलं जग मानलं , पण तो ?? परत तसेच विचार सुरु झाल्यावर तिने उठून टीव्ही सुरु केला .  ती चॅनेल बदलत राहिली, मग बघण्यासारख काहीच नाही म्हटल्यावर तिनं कॉम्पुटर सुरु केला.

               'ती' तुमच्या आमच्यातली एक . एका मध्यमवर्गीय पापभिरू घरातली संस्कारक्षम मुलगी. स्वतःच्या आनंदापेक्षा समाजच भय बाळगणारी. आईने एखादी गोष्ट सांगितली तर तसेच करणारी. ठराविक मैत्रिणी असणारी , मुलांपासून चार हात लांब राहणारी . कधीतरी मैत्रिणींबरोबर सिनेमाला जाणारी ,  ते पण साधे सरळ  असेच बघणारी .

               ती खरच अशी होती का? परत एकदा विचार मालिका सुरु झाली तिची. खरच कशी होती ती ?
तिला स्वतःला नाटकांची खूप आवड , नुसतं बघायला नाही तर काम करायला मिळावं अशी इच्छा. तशी ती शाळेत असताना बाईंच्या आग्रहावरून काम करायची. पण जशी ती मोठी झाली तसं आईने तिला हे सगळ बंद करायची ताकीद दिली. नाटकं बंद , खेळणं बंद, बाहेर फिरणं बंद , काम असेल तर आईबरोबर जायचं , संध्याकाळी ७ च्या आत घरात आलंच पाहिजे . ती प्रयत्न करत राहिली हे सगळ सांभाळण्याचा आणि आतल्याआत कोमेजत राहिली. कधी कधी तीच मन बंद करून उठायचं , पण आईपुढे कधीच बोलू शकली नाही ती . मग थोडी घुमीच झाली .

              असंच मोठ्या मिनतवारीने मिळालेल्या परवानगीमुळे ती नाटक बघायला आली होती. आणि बघता बघता नाटकाने कब्जा घेतला तिचा. त्या नाटकातला हिरो तिच्या कॉलेज मधलाच होता. तिला तीचं भान राहील नाही, हरवून गेली ती .

               दुसर्या दिवशी पासून तिचे डोळे त्याचा वेध घेत कॉलेज मध्ये भिरभिरत राहिले. तो दिसला कि तिचा दिवस खूप छान जायला लागला आणि दिसला नाही कि आपलं नशीब खोटं म्हणून ती हिरमुसली व्हायला लागली. त्याचा एखादा तरी कटाक्ष आपल्यावर पडावा म्हणून धडपड करायला लागली. 'वेडी' खरच वेडी झाली होती ती त्याच्यासाठी. मग हळू हळू एक एक गोष्ट कळायला लागली तिला. तो कविता खूप छान वाचतो, एवढा छान कि ऐकताना भान हरपायला होतं. तिला कळंत होतं कि ती त्याच्या प्रेमात गुरफटत  चालली आहे. स्वतःला कसा थांबवावं हे काही कळंत नव्हत तिला , न त्याला हे कस सांगाव हे पण . दोघांमध्ये समान मित्र-मैत्रिणी नव्हते त्यामुळे त्याला यातलं काहीही कळण्याची शक्यताच नव्हती. मग काय करावं म्हणजे त्याला हे समजेल? दिवसेंदिवस ती अस्वस्थ होत चालली होती.

              आणि नशिबान तीच दार ठोठावलं. शेवटच्या वर्षाला असताना तीन खूप हिमंत करून नाटकात काम करायचं ठरवलं. आपण खूप मोठी चूक करतोय असा  यायला लागलं. तरीपण धाडस करून ती सरांना भेटली आणि त्यांनी तिची निवड केली . तो पण होता त्या नाटकात , नेहमीप्रमाणे. तालमी संध्याकाळी करायच्या ठरल्या आणि घरी कसा सांगायचं हा प्रश्न पडला तिला. आता मात्र इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली . त्याच्या सोबत वेळ मिळेल म्हणून नाटक महत्वाच होत आणि तसंपण शेवटची संधी होती तिला . पुढच्या वर्षी दोघांची पण वाट वेगळी व्हायची शक्यताच जास्त होती. पण घरी काय सांगायचं यानं ती अस्वस्थ झाली. शेवटी , शेवटच वर्ष असल्यामुळे रोज संध्याकाळी जास्तीचे वर्ग आहेत आणि नंतर आम्ही मैत्रिणी मिळून अभ्यास करणार आहोत असा सांगायचं ठरवलं तिने. हो ना करता शेवटी आई मैत्रिणी कडे अभ्यासाला परवानगी द्यायला तयार झाली . मग तिने एका मैत्रिणीला गळ घातली , पण त्या मैत्रिणीने सांगितलं तू माझ नाव सांग पण कुणी जर विचारलं तर मात्र मी खरं खरं सांगून टाकणार.

          आता मात्र नाटकाच्या तालमी जोरात सुरु झाल्या आणि त्याचा सहवास सुद्धा. तो तिला ओळखत नसल्यामुळे तिच्याशी फारसा बोलायचा नाही. पण हळू हळू तिच्या कामामुळे त्याच लक्ष तिच्याकडे जायला लागलं आणि तिचे टपोरे डोळे त्याला चक्क आवडायला लागले. मग मात्र त्याच्या लक्षात यायला लागलं की, ते डोळे त्याच्याकडेच बघत असतात आणि त्याने बघितलं कि हसतात. त्याला गंमत वाटत होती , पण एका क्षणी जाणवलं कि ते डोळे गुंतत चालले आहेत . मग मात्र अस्वस्थ झाला तो. एका मर्यादेपर्यंतच गोष्टी आवडायच्या त्याला, त्या पुढे नाही. त्याला त्याच एकटं असं प्रिय होतं. त्याच ध्येय वेगळ होत. त्यामध्ये हे असं कुणामध्ये गुंतणं मान्य नव्हत त्याला. त्याला ती चांगली वाटत होती, बोलायला , गप्पा मारायला. दोघांना पण वाचनाची आवड होती,  त्यामुळे गप्पा मारायला मजा यायची. पण आता मात्र तो हळू हळू तिच्यापासून लांब व्हायला लागला , तिला टाळू लागला. ती अस्वस्थ व्हायला लागली. तिला कळेना , अचानक त्याला काय झालं ते ? असा का घडतंय ते ? ती आपलं प्रत्येक  वागणं तपासून बघायला लागली. पण तिला कारण कळेनास झालं. आता मात्र तिला त्रास व्हायला लागला, तिला भरून टाकणारा तो , तीच मन व्यापणारा तो असा लांब लांब जाताना पाहून ती अस्वस्थ झाली. रात्र -रात्र विचार करायला लागली . आणि अशाच एका क्षणी घरी नाटकाविषयी कळलं . घरात वादळ उठलं. शिक्षण बंद करण्यापर्यंत बोलणी झाली. तिने गप्प राहणं पसंद केलं. आणि ती नाटकातून बाहेर पडली . सरांनी खूप प्रयत्न  केले , पण उपयोग झाला नाही. त्याला कळलं , पण त्याने थांबवलं नाही.

शिक्षण पूर्ण झालं , आता पुढे काय? तो कुठे आहे ? काय करतो आहे ? याची तिला माहिती असायचं काही कारणच नव्हत . ते दोघे तेवढे जवळचे मित्र नव्हते . शेवटी , तिच्या काकांच्या ओळखीने एका ठिकाणी तिला नोकरी मिळाली . ओळखीने नोकरी मिळण्याचे जसे फायदे असतात तसेच तोटे पण असतात. ऑफिस मध्ये तिला कुणी जवळ करत नव्हत, न ती आपणहून कुणाशी बोलायला जात होती. ती अजूनच अबोल झाली.

                          अशीच ३-४ वर्षे निघून गेली. आणि अचानक तो दिसला तिला . एवढ्या वर्षात तो कुठे होता काय करत होता काहीच कळलं नव्हत तिला. पण ती मात्र त्याला विसरू शकली नव्हती. तिला अस्तित्व तरी कुठे उरल होतं ? ती ती राहिलीच कुठे होती ? तिच्या डोक्यात फक्त तो आणि तोच होता. आणि असा अचानक तो आल्यावर ती गोंधळून गेली . तिला काही सुचेनासं झालं. त्यान तिला ओळखल पण नाही. तो तसाच तिच्या समोरून निघून गेला. आयुष्यात पहिल्यांदाच ती हादरली . ज्याच्याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही असा आपण मानतो, त्यानं ओळखलं पण नाही आपल्याला. ती सुन्नपणे बसून राहिली. डोक्यातले विचार काढायचा प्रयत्न केला तिने पण ते विचार काही पाठ सोडायला तयार नव्हते. त्याने साधं ओळखू पण नये आपल्याला ? या विचारांनी अस्वस्थता वाढायला लागली तिची. कामात चुका झाल्या . आणि तिच्या सरांची बोलणी खाल्ली तिने . एवढ्या वर्षात पहिल्यांदाच असं झालं . आणि दुसर्या दिवशी मात्र तो तिला  ऑफिस मध्ये दिसला, काहीतरी कामासाठी आलेला. तिच्या सरांनी तिला बोलावलं आणि ओळख करून दिली . मग मात्र मिश्कीलपणे तो म्हणाला , "आम्ही ओळखतो एकमेकांना , आम्ही एकाच कॉलेज आणि बॉचचे आहोत." ती स्तब्ध झाली. तीच जन त्या एका क्षणामध्ये थांबल. तिला तिथल्यातिथे एक आरोळी ठोकाविशी वाटली. ओळखलं याने मला. तो आणि सर पुढे काय बोलत होते ते ऐकु येत नव्हत तिला. आणि अचानक जाणवलं कि सर काहीतरी विचारात आहेत तिला, ती 'हो हो ' म्हणाली आणि बाहेर पडली. आपल्या जागेवर डोक धरून बसून राहिली. तो समोर येवून बसलेला पण कळलं नाही तिला. मग अचानक  टक  लावून पहातंय असा वाटलं तिला. म्हणून तिने मान वर करून पाहिलं तर तिच्या काळजाचा ठोकाच चुकला . तिच्या समोर बसून तिच्याकडेच पाहत होता तो .तिने मान वर करताच तो म्हणाला, " बंर नाही का वाटंत ?" भर उन्हाळ्यात , दुपारी प्राजक्तचा सडा पडल्यासारखा वाटला तिला. कालपासून सुरु असलेली मनाची तगमग थांबली आणि मन फुलून आलं. "नाही नाही ठीक आहे ", असा काहीतरी पुटपुटली. तिच्याकडे पहात मंदस्मित करत तो म्हणाला, मी इथे जवळच राहतो , नुकताच राहायला आलो आहे. तुझे सर म्हणजे माझे सख्खे काका . लहानपणपासून त्यांनीच सांभाळलं आहे मला. आता १ महिनाच झाला इथे राहायला आलो आहे. काही काम होत म्हणून आलो होतो इकडे, म्हटलं जाता जाता काकांना भेटून जाव . आज बाकी काही काम नाही ,  असेल तर संध्याकाळी भेटू . भरपूर गप्पा मारायच्या आहेत ". तिची फक्त मान हलली . " ठरलं तर मग वरळी सी फेस वर , संध्याकाळी ७ वाजता ". एवढ बोलून तो निघून गेला. ती मटकन खुर्चीवर बसली. मन अजूनही तळ्यावर आलं नव्हत. आत्ताशी कुठ १ वाजत आला होता, ७ पर्यंत थांबायचं होत तिला. खूप अस्वस्थ मनानं काम करत राहिली ती . काय बोलायचं असेल ? कुठे होता इतकी वर्ष तो ?, लग्न केलं असेल का त्याने ? आपली आठवण झाली असेल का कधी त्याला ? का लग्नाच्या मागणीसाठीच भेटणार असेल ? एक ना असंख्य प्रश्न. वेळ जाता जात नव्हता. तो भेटणार म्हणून मन एकीकडे शांत पण होत आणि अस्वस्थ पण. ५ वाजले तशी सरांना सांगून बाहेर पडली ती . आणि सरळ टॅक्सी केली तिने . आज तिला लोकल मधली गर्दी अज्जिबात नको होती. साधारण ६.३० वाजता ती वरळी सी फेस ला पोहोचली . तिथल्या समुद्राच्या दर्शनाने तिला बरं वाटलं. आता फक्त त्याची वाट पहायची. घरी आई वाट पाहत रहायची तिची, ७ वाजले , ती काळजी करत असेल असा वाटलं तिला . रोज ६.३० पर्यंत घरी पोहोचायची ती . मग भावाच्या संसारात संध्याकाळचा स्वयंपाक आणि अवरा अवर करून अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत उसंत मिळायची नाही तिला. आता मात्र ७. ३० झाले तरी पत्ता नव्हता त्याचा. अजून किती वेळ वाट पहायची ते कळत नव्हत तिला . शेवटी ७.४५ वाजता ती जायला निघाली . तिला आतून भरून येत होतं . स्वतः चा अपमान झाल्यासारखं वाटत होतं , स्वतःच्या भावनांचा अपमान झाल्यासारखं वाटत होतं . तिचे डोळे भरून यायला लागले होते . एकदम समोर एक टॅक्सी येवून उभी राहिली आणि तो उतरला. तिला १-२ क्षण लागले स्वतः ला सांभाळायला. तिलाच कळत नव्हत काय होतंय ते.

तो उतरला आणि हसला तिच्याकडे बघून, "साॅरी गं, काम संपवताना थोडा उशीर झाला. तुला कळवायला पण काही मार्ग नव्हता. तुला उशीर नाही झाला आहे न ?" ती त्याच्याकडे भरल्यासारखी बघतच राहिली आणि अभावितपणे बोलून गेली ," नाही नाही , मी पण आत्ताच आले आहे . मलाच वाटल तू निघून गेलास कि काय ?" "ठीक आहे , चाल बसू मग थोडावेळ", असा म्हणून त्याने तिचा हात धरला आणि दोघेपण समुद्राकडे चालायला लागले . सगळ्या जगाकडे दुर्लक्ष करून आपण त्याच्याबरोबर असल्याची भावना तिला भरून टाकत होती. त्यानेच सुरवात केली बोलायला. 'कॉलेज संपल्यावर , काकांच्या ओळखीने एका चांगल्या कंपनी मध्ये त्यने अगदी खालच्या लेवल वर काम करायला सुरवात केली होती. त्याचबरोबर तो नाटकात पण काम करत होता. व्यावसायिक नाटकात काम करायला अजून  सुरु केली नव्हती त्याने . तो जितका झोकून देवून नाटकात काम करायचा तेवढच त्याला पैसे कमवायला नोकरीची गरज आहे हे कळत होतं. स्वतः च काम  याची सांगड घातली होती त्याने. त्याला मानणार वर्तुळ होत एक, तिथे तो खूप लोकप्रिय होता. पण काहीतरी कमी वाटत होती त्याला. त्याच्या ऑफिस मधल्याच एका मुलीशी लग्न केल होतं त्याने, पूर्ण विचार करून. खूप आवडली होती ती त्याला. आणि आता साधारण काहीतरी खटकत होत. कुणाशी तरी हे सगळं बोलावसं वाटत होतं. घेतलेला निर्णय चुकला असा वाटत होतं आता. आणि अचानक मागच्या आठवड्यात ती दिसली. अचानक, त्याला  पटकन ओळखताच आलं नाही तिला. खूपच बदलली होती ती. तरीपण आपण हिच्यापाशी बोलू शकतो असा वाटत होत त्याला. "बायको छानच आहे माझी. पण , आजकाल काहीतरी बिनसलं आहे तीचं . घरीच असते , नोकरी वगैरे काही करत नाही . रोज काहीतरी कारण काढते  आणि चिडचिड करते . माझ्या नाटकात काम करण्याला पण विरोध आहे आता तिचा . आम्ही सगळे माझ्या घरी एकत्र जमलो तरी विचित्र बोलते. खूप हट्टी होत चालली आहे. लग्नाला ३वर्ष होतील आता . आधी कधीच अशी नव्हती ती . खूप सुखाचा संसार चालला होता आमचा. कसं बोलाव कसं वागावं काही कळेनासं झालं आहे गं ". बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला होता . थोडा थोडा थांबत तो सगळ तिला सांगत राहीला. आणि डोळ्यातून पडणाऱ्या पाण्याला परतवत , दुखर्या गळ्याने ती ते ऐकत राहिली. यानं लग्न केलं पण ? आणि आपण अजूनही वाट बघतोय याची ?

त्याच्या प्रश्नांनी ती भानावर आली , तो विचारतं होता , "तुला उशीर होत नसेल तर आपण बाहेरच जेवायचं का ? मला अजूनही खूप बोलायचं आहे . आणि मी तुला काहीच विचरला नाही . तू गप्पच आहेस . तुझ्याबद्दल पण ऐकायाच आहे". तिने घडल्याकडे पाहिलं , ९.३० वाजले होते ," अरे बापरे , बराच उशीर झालाय . मला घरी जायला हवं, आई वाट बघत असेल  ". "ठीक ठीक , मी सोडतो तुला . मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलल्यावर". त्याला थांबवत ती निघाली तिथून.

घरी आली , आईच्या प्रश्नाचा भडीमार कसाबसा टाळून , दुखर्या मनानं आणि उपाशी पोटानं अंथरुणावर पडली . इतका वेळ आवरून धरलेलं रडू आईच्या लक्षात घेवू नये म्हणून तोंडांत पांघरुणाचा गोळा कोंबून रडायला लागली. कधीतरी त्याच ग्लानीत झोप लागली तिला. सकाळी उठायला उशीरच झाला. आणि लक्षात आलं आज कुणीच कामावर गेला नहिये ना भाऊ, ना वहिनी. सगळे थोड्या विचित्र नजरेने बघत होते. सगळीकडे एक तणाव जाणवत होता. तिला कळत नव्हतं काय झालयं ते?... शेवटी तिच्या वहिनीने विचारलं तीला ’काल इतका उशीर का झाला? ती नजर चुकवत म्हणाली, "अगं ऑफीस मध्ये काम होतं". तीला काही कळायच्या आत तीच्य भावाने खाडकन् मुस्काटात मारली. तिच्या डोळ्यापुढे काजवेच चमकले. "खोटारडी साली रात्री कुणाच्या गळ्यात गळा घालुन वरळीला बसली होतीस?". तिला झटकन् जाणिव झाली. आणि डोळ्यांमधुन पाणी झिरपायला सुरुवात झाली. ती गप्प झाली. काय सांगणार यांना? कोण होता तो ते? म्हटलं तर सर्वस्व नाहीतर कुणीच नाही. तीच्या आईने आतुन तीची बॅग भरून आणली आणि भावानं सांगीतल आपण आता गावाकडे जातोय? ती चाचरत बोलली. "अरे पण माझे नोकरी?" "या नोकरी मुळेच नकोनको त्या गोष्टी करतेस.आजच फोन करुन सांगितलय की तु नोकरी सोडलीस. उद्या गावतल्या देवळात लग्न आहे तुझं माझ्या बॉस बरोबर." तिला धक्काच बसला, इतकी टोकाची भुमिका? तिला मान्य होत की, भावाचा बॉस चांगला आहे आणि त्याला ती आवडते. फक्त त्याचं लग्न झालं होतं आणि वर्षभरातचं डायवोर्स झाला होता. तिला कळतच नव्हतं काय विचार करावा यावर म्हणून.?

आणि लग्न झालं तीच. सगळेजण परत आले. तिचे डोळे एकदम कोरडे झाले होते. जे घडतय त्याच्याशी संबंध नसल्यासारखे घरी परत आल्यावर तीच्या लक्षात आले आता पुढच्या गोष्टी सरळ आहेत. पण तीच्या नवर्याने तीला सांगीतलं, "मी कसलीही जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर, माझी आई तर अश्या अवस्थेत नस्ती तर मी कधीच इतक्या गडबडीने, असे लग्न केलं नसतं." "अशी अवस्था म्हणजे काय झालयं?" ती कशीबशी म्हणाली." " तिचा ऍक्सीडन्ट झालाय पंधरा दिवसापुर्वी आणि आता ती शुद्धीवर आली आहे, पण डॉकटर म्हणतात तीच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. आणि आता फार दिवस ती राहणार नाही , जर जगलीच तर कोमात जाईल. म्हणूनच इतक्या घाईने लग्न केलं. नाहीतर तुझ्या इच्छेप्रमाणे मस्तपैकी सगळं ठरवून लग्न केलं असतं मी. पण, मी तुझा अनंत आभारी आहे. तु माझ्यावर विश्वास दाखवुन माझ्याशी लग्न केलसं." इतकं म्हणून तो बाहेर निघून गेला. ती तशीच बेडवर बसून राहीली. विचार करत.

सकाळी उठली  तेव्हा बराच उशीर झाला होता. शेजारीच एक चिठ्ठी मिळाली. "मला उशीर होतो आहे मी तुला दुपारी जेवायच्या वेळी भेटेन." स्वयंपाकाला बाई आहेत. आम्ही त्यांना ’काकु’ म्हणतो. त्यांना सांग तुला जे हवं असेल ते. माझ्या कपड्यांच्या कपाटात शेजारचा कप्पा तुझ्यासाठी रिकामा केला आहे. घरातल्या वरच्या कामासाठी ठेवलेल्या बाई १०.३० पर्यंत येतील. जेवणाच्या वेळी भेटूच आणि मग मिळून आईला भेटायला जाऊ."

चिठ्ठी वाचुन तिला कौतुकच वाटलं. किती व्यवस्थित आहेत हे. ती उठून बाहेर आली. तर घर एकदम व्यव्स्थीत असल्याची जाणीव झाली. प्रत्येक गोष्ट एकदम जाणीवपुर्णक निवडल्याची खुण जागोजागी दिसत होत्या. तीला बरं वाटायला  लागलं. तीन स्वत:साठी चहा बनवुन घेतलात तोपर्यंत स्वंयपाकाच्या काकू आणि वरकामाच्या बाईपण आल्या. तीला बघताच दोघींच्या डोळ्यात कौतुक दिसलं.

स्वयंपाकाच्या काकुंनी तिला जवळ घेऊन म्हटलं, "किती छान आहेस !. खुप बरं वाटलं बघ तुला घरी बघुन. ताई अश्या हॉस्पीटलमध्ये ऍडमीट झालेल्या आता त्या पण घरी येतील. दादांच पण सगळं ठिक होईल. डोळ्यातलं पाणी पुसुन त्या स्वयंपाकाला लागल्या. तीला काय आवडतं ते विचारुन त्यांनी स्वयंपाक सुरु केला. थोडावेळ तिथे बसुन ती परत बेडरुम मध्ये येऊन बसली.

दुपारी जेवणाच्या वेळी तो आला. "कसं वाटतय? माझं सकाळी जाणं खुप गरजेचं होतं गं. आईची तब्येत अचानक बिघडली आणि डॉक्टारांचा फोन आला होता. तु खुप गाढ झोपली होतीस, मग उठवायचं जीवावर आला, म्हणून उठवलं नाही. जेवुया का आपण? लगेच हॉस्पिटलला परत जायच आहे." तिने गडबडीत पानं घेतली. एकीकड ह्याच्या इतक्या प्रेमळ वागण्यानं गोंधळल्या सारखं होत होतं आणि दुसरीकडे बरं पण वाटत होत. गेल्या काही वर्षात इतका प्रेमळपणा तिच्या वाट्यालाच आला नव्हता.

पुढच्या आठवड्यातच त्याची आई गेली. जाताना मुलाचा संसार परत सुरू झाल्याच्या समाधानात गेली. तो खुप खचल्यासारखा दिसत होता तीला. खुप प्रयत्न करत होता तिच्याशी बोलण्याचा पण ती मात्र लांब लांबच होती. त्यातच आईच्या जाण्यानं तो अगदीच एकटा झाला होता. ती च्या त्याच्यातली कोंडी कशी फॊडावी हेच कळत नव्हतं त्याला. त्याच्या जवळच्या मित्राने सल्ला दिला. "अरे बाहेर फिरायला घेऊन जा. कदाचित तुम्हाला दोघांना पण बरं वाटेल." त्याला पण आशा वाटली. खरतर घटस्फोटानंतर त्याला धास्तीच वाटत होती लग्न करायची.ही पण तिच्यासारखीच निघाली तर? पण हिला त्यानं तिच्या भावाच्या घरात बघितलं आणि आवडली त्याला एकदम शांत कमी बोलणारी, समोरच्याला काय हवं ते ओळखुन वागणारी. पुढच्या प्रत्येक भेटीत तो प्रेमातच पडत गेला. आणो एक दिवस त्यानं तीच्या भावाला विचारचं. भाऊ चांगलाच गांगरला कारण ती लग्नाला अजुनही तयार नव्ह्ती आणि त्या दोघांत नाही म्हटलं तरी १० वर्षांच अंतर होतं. त्याला भावाची ही अवस्था समजली. तो म्हणाला "अरे मी फक्त माझ्या भावना सांगितल्या तुला तिला जर कुणी चांगला मुलगा मिळत असेल माझी काही हरकत नाही पण तु एकदा विचार तिला. भावाला हायसं वाटलं. त्यानं हा विषय आईकडं काढला. साहेबाबरोबर घरोब्याचे संबधं झाल्यावर पुढच्या कित्येक गोष्टी जमणार होत्या. हो, नाही करत आई तयार झाली होती. पण तीला विचारणार कोण? जरी घरात भावाचा धाक असला तरी अशी गोष्ट बोलायला तो बिचकत होता आणि त्यातच तीला कुणाबरोबर तरी वरळीला बघितल्याची बातमी कळली. भावाच्या मित्राने बघितलं होत तिला आणि लगेच त्याला फोन करून सांगितलं होतं. ही बया आपल्या पुढच्या नोकरीचा फज्जा उठवणार हे लक्षात आल्यावर भावानं कुणालाही न विचारता तिच्या लग्नाचा घाट घातला, त्याच्या आईच ऍडमीट होण्यानं परिस्थीती आणखिनच चिघळली आणि लग्न झालं.

पण लग्नाचा इतीहास माहिती नसलेली ती आणि तो मात्र पुर्ण जन्मासाठी एका बंधनात अडकले.  बाहेर जाण्याच्या एक दिवस आधी तिला तिच्या सरांचा फोन आला आणि त्यंनी भेटायला बोलावल तिला काही कागदपत्र पुर्ण करुन हवी आहेत म्हणाले. ती गेली ऑफीसला तास-दोन तासात परत येते म्हणून गेली.

ऑफीस मध्ये सरांच्या जागी ’तो’ बसला होता. तिला धक्काच बसला. "तू इथं कसा ? आणि सर कुठे आहेत? त्यान तिला बसायला सांगितलं काका १० दिवसापुर्वी हार्ट अटॅकनं गेले आणि मी माझ्याकडे सगळं सोपवुन गेले. तुझा नंबर त्यांच्या डायरीत मिळाला. म्हणून फोन केला तर कळलं की मागच्याच महिन्यात लग्न झालं तुझं. आपल्या भेटीनंतर लगेचच. पण त्यावेळी काहीच बोलली नाहीस. सांगितलं असतस तर लग्नाला  आलो असतो मी. तीच्या घश्याला कोरड पडली होती. ती तशीच उभी होती, काय गं काय झाल बर नाही का’ असं त्यानं  म्हणे पर्यंत ती चक्कर येऊन पडली. मागच्या महिन्याभरातला सगळा ताण खुप असह्य झाला होता तीला. ऑफीस मधल्या मॅडमच्या मदतीने त्याने तीला ऑफीसमधल्या गेस्टरुम मध्ये झोपवलं आणि डॉक्टरांना बोलवलं. ’बी.पी. लो आहे. खूप तणावाखाली वाटत आहेत या. काही गोळ्या देतो ह्यांना. पण आता ह्यांना शांत पडू द्या.’

बर्याच वेळानं तीने डोळे उघडले. आधी कळलच नाही तिला ती कुठं आहे ते ?  मंग भानावर आली. शेजारीच तो बसला होता. थोडा विचारात पडलेला आणि बराचसा काळजीत पडलेला. तिला आठवलं काय झालं ते. ती उठून बसली. 
"बंर वाटतय का आता ? कशाची काळजी करतेस एवढी ? बराच उशीर झाला आहे. चाल , मी सोडतो घरी तुला." उत्तराची अपेक्षा न करता तो उठायला लागला. 
"थोडावेळ बसशील ? मला बोलायचं आहे ", ती म्हणाली. 
तिच्याकडे आश्रयाने बघत तो खाली बसला. जे काही तिला पहिल्यांदा नाटक बघिल्याप्सून वाटत होत ते तिने सांगितलं , अगदी लग्नापर्यंत. 
तिच बोलण मन लावून ऐकणारा तो हसायलाच लागला. हसून हसून डोळ्यातून पाणी यायला लागलं. कसाबसा स्वताला थांबवत , आश्चर्यचकित तिला म्हणाला ," अगं वेडी आहेस का तू ? तुला वाटलाच कसं कि मी तुझ्यावर प्रेम करेन ? स्वतः ला बघ जरा , आपण खूप वेगळे आहोत गं . आपल्या काही आवडी सारख्या आहेत , पण याचा अर्थ आपण पूर्ण आयुष्य एकमेकांबरोबर कसे काय काढू शकतो ? माझे आणि माझ्या बायकोचे काही प्रश्न आहेत , पण याचा अर्थ मी तिला सोडून तुझ्याबरोबर येईन असा नाही होत ना ? तुझ्याशी मनमोकळ बोलतो म्हणजे तुझ्याशी मी लग्न कराव असा थोडंच आहे ? मला तू कायम चांगली मैत्रीण म्हणून पसंद आहेस. यापेक्षा जास्त काही नाही . तुझ्यासारख्या काकूबाई बरोबर कोण आयुष्य काढणार? मैत्रीण म्हणून ठीक आहेस गं . मी तुझ्याकडे आतापर्यंत सल्ला तरी मागितला आहे का कधी ?" 

तिच्या मनाच्या चिंधड्या होत चालल्या होत्या. इतकी वर्ष मनामध्ये जपलेल्या प्रेमाचे धिंडवडे निघताना ती कोरड्याठक्क डोळ्यांनी आणि बधिर मनान ऐकत राहिली. गप्प होवून गेली. 

तिथून निघाली तशी त्याने विचारलं , "सोडू का ?". तिच्यापर्यंत ते शब्द जणू पोहोचलेच नाहीत . ती चालत निघाली . दिशा कळत नव्हत्या तिला. आजूबाजूचा गोंगाट जाणवत नव्हता . एवढ्यात तिचा मोबाईल वाजला. नवर्याचा फोन होता ," कुठे आहेस गं ? बराच वेळ झाला , घरी आली नाहीस म्हणून फोन केला ". त्याचा प्रेमळ आवाज ऐकून भानावर आली ती. तिला एकदम खूप रडायला आलं . " तू तिथच थांब मी येतो ". समोर नवर्याला बघून खूप अपराधी वाटायला लागलं तिला. तो खूप प्रेमान वागवत होता तिला . गाडीत बसल्यावर त्याच्या मिठीत झोकून दिलं तिने स्वतःला . त्याला वाटल खूप दिवसांनी ऑफिस मधल्या मैत्रीणीना भेटल्यामुळे हळवी झाली असेल. घरी परत येताना त्याने तिच्यासाठी बाहेर फिरायला गेल्यावर घालता यावेत म्हणून काही कपडे घेतले. 

त्याच्याबरोबर हनिमून साठी बाहेर गेल्यावर मात्र नवर्याच्या प्रेमळ वागण्याने ती हळू हळू सावरली. तिला जाणवला तो त्याचा समजूतदार पणा , त्याचा प्रेमळपणा . आणि एका क्षणी तिला लक्ख जाणीव झाली. कि आता आपल्याला याच्याच बरोबर राहायचं आहे. जे घडल तो भूतकाळ होता . आणि तो संपला आहे . आपला वर्तमान काळ याच्याबरोबरच आहे . हळू हळू संसारामध्ये गुंतू लागली ती . पुढे २ वर्षांनी मुलगा झाल्यावर तर जे घडलं होत ते पण पुसट व्हायला लागलं.

आणि आता इतक्या वर्षानंतर नाटक बघताना तिला सगळं आठवायला लागलं. तिच्या मैत्रिणीने आग्रहाने तिला हे नाटक बघायला आणलं होतं . आणि या नाटकाचा हिरो तोच होता . त्या पण पुढच्याच रांगेत बसल्या होत्या . मधली सुट्टीत त्याने निरोप पाठवून बोलावून घेतलं तिला आणि भडभडा बोलायला लागला ,"खूप मिस केलाय तुला मी.  माझ तुझ्यावर खूप प्रेम होत, आहे. खूप उशिरा कळल मला. माझ लग्न झाल्यावर. म्हणूनच तुला भेटायला बोलावलं होत मी . तू हो म्हणाली असतीस तर मी घटस्फोट घेणार होतो . नाहीतरी सगळ बिनसलचं  होतं.  लग्नानंतरच भेटलीस एकदम . तेव्हा जाणवलं कि तुझा संसार विस्कटणं योग्य नाही . तुझ प्रेम कळलं होततं गं मला. पण तुझ्याशी बोलायला मी उशीर केला. मला माफ कर . त्या दिवशी तुला दुखावून बाहेर पडलो मी , आणि एका गाडीने धडक दिली. २ दिवस हॉस्पिटल मध्ये होतो , बेशुद्ध . बारा व्हायला २ महिने लागले . घरी आलो तर बायकोने घटस्फोटाचे पापर समोर ठेवले. शांतपणे त्यावर सह्या केल्या. आणि दोघेही मोकळे झालो . त्यानंतर ६ महिन्यात काका गेले . जाताना सगळ माझ्या नावावर करून गेले . एक दिवस विचार करून सगळ विकल आणि हि नाटक कंपनी काढली. आता फक्त प्रयोग करत फिरतो . पण इतके दिवस मनात एक सल होता. तुला दुखावल्याबद्दल तुझी माफी मागायची होती. माफ कर मला ,"
घरी आल्यावर शांत वाटत होत तिला , जुन्या आठवणी त्रासदायक नव्हत्या वाटत. ती तशीच सोफ्यावर डोक ठेवून बसली . आणि तिला जाणवलं तिचा नवरा तिच्या कपाळावर हात फिरवतो आहे . खूप आवेगाने ती त्याच्या मिठीत शिरली . पहिल्यान्दाच तिला तो खूप हवाहवासा वाटला .