Wednesday, 3 December 2014

मुग्धा -५ - शेवटचा भाग

मुग्धा सुन्न होवून बघतच राहिली त्याच्याकडे . तो जे काही बोलला , ते समजायला वेळ लागला तिला . आणि तिला अचानक सगळ्याची भयानकता जाणवली . काय करून बसलो आपण हे ? वरद असा आहे ? आपल्याला कसं कळल नाही हे ?
"बघ मी असा आहे . आपल्याला कुणी आवडलं तर चार दिवस मजा करावी झालं . नंतर तू तुझ्या वाटेला , मी माझ्या . कुणीही एकमेकाच्या वाटेत यायचं नाही . मी लग्न करेन पण तुझ्यासारख्या मुलीशी नक्की नाही . "  एवढं बोलून वरद उठला आणि निघून गेला .
ती तशीच बसून राहिली मिळणारे धक्के पचवत . हे सगळ असह्य होतं तिच्यासाठी . ती कितीतरी वेळ तशीच बसून राहिली . जेंव्हा वेटर थोडा मोठ्या म्हणाला ," काही आणु का मॅडम ?" तेव्हा ती दचकली आणि भानावर आली . ती तशीच उठली , सगळ जग आपल्याभोवती गरगरतय असा वाटत होतं तिला . ती ऑफिस कडं निघाली , पण धड चालताही येईना तिला . पायातली ताकद कुणीतरी शोषून घेतली आहे असं वाटत होतं तिला . डोक्यातले विचार भरकटत चालले होते तिचे . काय करून बसलो आपण हे ? एवढे वाहवलो ? त्याच्यासाठी , ज्याला आपली काहीही किंमत नाहीये . त्याच्यासाठी हा  खेळ होता फक्त . आपण  मूर्ख आहोत . आपण कसलीच खात्री करून घेतली नाही . त्याच्या प्रेमाची पण नाही .  त्याने बोलावलं आणि आपण गेलो . शी .
याच विचारांमध्ये ती ऑफिस ला पोहोचली . शिल्पा तिच्या जवळ आली . " मुग्धा , काय झालाय तुला ? अशी का दिसते आहेस ? तू आणी वरद हॉटेल मध्ये गेला होता ना ?  काय झालं ?"  ती सुन्नपणे बघतच राहिली शिल्पाकडे . शिल्पाच बोलणं जणू तिच्या कानापर्यंत पोहोचताच नव्हंत . शिल्पा ला कळेना हि अशी का बघतेय ते . काहीतरी झालं आहे एवढ लक्षात आलं तिच्या . तिने थोडं काळजीनच विचारलं " काय झालं ?" तिच्या काळजीन मुग्धाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तशी शिल्पा तिला  बाहेर आली आणि थोडी वैतागूनच म्हणाली ,"काय झालं आहे नक्की ? सांगणार आहेस का आता ? काल पण असंच केलंस ."
थोडी शांत होत पहिल्यांदाच मुग्धा ने जे घडलं ते सांगितलं . शिल्पा आवक् झाली ऐकुन . " अगं , इतकं सगळं मनात होतं  आणि एकदाही बोलली नाहीस मला ? निदान त्याच्याघरी जायच्या आधी तरी ? काहीतरी माहिती काढली असती आपण . अशी कशी तू ? त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही , आणि भेटायला गेलीस तू त्याला ?"
ती काहीही बोलली नाही . फक्त रडतं राहिली . शिल्पा ला दया आली तिची . " रडू नको गं . मी बोलू का वरद शी ?"
"काय बोलणार तू ? त्याच प्रेम नाहीये माझ्यावर ", कळवळून मुग्धा म्हणाली ," त्याला फक्त शरीर हवं होतं गं, माझ्या मनाशी काही लेणदेण नाही त्याला . मी सगळ्यांपासून लांब राहत होते तेच बरं होतं . निदान अशी फसले तरी नसते . " शिल्पाने तिला थोडं शांत होवू दिलं आणि मग विचारलं ," आता काय ठरवलं आहेस ?"
" मी नोकरी सोडेन ".
"काय !?" शिल्पाचा काय इतका मोठा होता , कि आजूबाजूने जाणारे सगळे तिच्याकडे बघायला लागले .
" अगं वेड लागलं आहे का तुला ? एवढी सोन्यासारखी नोकरी सोडणार तू ? आणी घरी काय सांगणार ? "
"घरी काय सांगणार अगं ?पण वरद समोर असताना असं परक्यासारख काम करणं जमणार नाही मला . आणि त्यातून तो दुसऱ्या मुलीच्या हातात हात घालून बसलेला तर अज्जीबातच चालणार नाही . वेडी होईन गं मी . " एवढं बोलून ती परत रडायला लागली .
"अगं रडतेस कसली ? चीड यायला हवी तुला . त्याच्या मुस्कटात मारायला हवीस . सरांच्या कडे तक्रार करायला हवीस . ते राहील बाजूला , रडतेस कसली ? आणी या असल्या माणसासाठी नोकरी सोडणार तू ? त्याला काय तू साधी आहेस , त्याच्यावर प्रेम करतेस हे कळलं नसेल ? त्यान गैरफायदा घेतला आहे तुझ्या भावनांचा ,त्याला काय असंच सोडायचं ?" खूप  पोटतिडकीन बोलत राहिली आणि आपण फक्त तिला खूप रडवतो आहे हे जाणवल्यावर गप्प झाली .
ऑफिस मधून घरी येताना पण रस्त्यावरच्या सगळ्यांना कळलंय आपण काय केलाय ते ,आपण कसे मुर्ख आहोत ते , असंच काहीसं वाटत राहिलं तिला .
 घरी आल्यावर बरं नाही म्हणून ती सरळ आत जाउन पडली . तशी आई आत आली ," मुग्धा , तुला राग येत असेल ना गं माझा ? सारखी बोलते म्हणून ? पण अगं आम्ही असेच वाढलो आहोत . स्वतःच्या मनाला मारून जगायचं . मनासारखे काहीही करणं म्हणजे चुकीचंच आहे असंच शिकवलं गेलं आम्हाला . मन मारण्यात संसाराचं भलं होत याच विचारांची
झाले गं मी पण . तु पण तसंच करावस असं वाटत होत मला . म्हणून तुझ्यावर बंधन घालंत गेले मी . लोकांना भिवून जगतो  गं आम्ही, तू पण तसंच जगावस असा वाटत राहील मला . तुला वाटत असेल आई आज हे सगळं का बोलतेय ? खरतर २-३ दिवसापासुन बोलायचं ठरवत होते मी . पण तुझी तब्येत बरी नाही  बसले .
परवा तुझी डायरी वाचली , त्यातली तुझी स्वप्नं वाचली . उंच आकाशात उडायची , सगळ जग बघायची , भरपूर पुस्तकं वाचायची , एक सुंदर हसरं आयुष्य जगायची . आणि जाणवलं आपण आपल्या पोटाच्या मुलीलाच ओळखु शकलो नाही . आई अशी नसते न गं ? तुलापण असंच वाटत असेल ."  बोलतां  बोलतां आईचा कंठ भरून आला .
मुग्धा बघतां  बघतां आई च्या कुशीत शिरली आणि स्फुंदून स्फुंदून रडायला लागली . आईचा हात डोक्यावरून फिरत असताना अपराधीपणाची जाणीव अजूनच गडद झाली .
सकाळी तिला उठवेना , डोकं आणि अंग पण जड झाल्यासारखं  वाटत होतं . आई उठवायला आली आणि तिची अवस्था बघून घाबरली . तिने कपाळावर हात ठेवला आणि चटका बसला तिला . चांगलीच तापली होती ती . आईने तिला ताप  उतरायची गोळी दिली आणि त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन केला .
" खूप जास्त ताण घेतला आहे मुग्धाने वाहिनी . तिला एक आठवडा तरी ऑफिस ला जाऊ देवू नका . फक्त विश्रांती गरजेची आहे ." डॉक्टरांनी सांगितले .
तिने एक आठवड्याची सुट्टी टाकली .  एकीकडे आईशी संबंध सुधारत होते आणि दुसरीकडे टोचणी अजूनच वाढत होती.
आठवड्यानंतर ती ऑफिस ला परत आली . शिल्पा तिच्या जवळ आली ," कशी आहेस मुग्धा आता ? किती त्रास करून घेतलास गं स्वतःला ? तिकडे तो मज मारतोय आणि तू मात्र ?"
" चूक माझ्या हातून घडली आहे . शिक्षा पण मलाच भोगायला हवी . " खिन्नपणे मुग्धा म्हणाली .
"मुग्धा तू बदली करून घे , आपल्या गोव्याच्या ऑफिस ला . आवडेल तुला तिथं राहायला "
"बघते " म्हणून तिने कॉम्पुटर मध्ये डोकं घातलं . पण तिचं  मन काही कामात लागेना . तेवढ्यात तिला वरद दिसला , मीना बरोबर परत येताना . आणि मुग्धाच्या हृदयातून कळ आली . ती अस्वस्थ झाली खूप . वरद नं लक्ष दिला नाही .
आजचा दिवस संपतच नाहीये असं वाटलं तिला .
शेवटी आईशी बोलून तिनं गोव्याला बदली करून घेतली . आईने पण फारसे आढेवेढे घेतले नाहीत . कुणास ठाऊक आजपर्यंत जे वागली त्याचं परिमार्जन असावं .
गोव्याला दोघींच्या पण आयुष्याचा नवीन अध्याय सुरु झाला . गोव्याच्या वातावरणान तिला भुरळ घातली . जे घडलं त्याची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागली . दोघींचं आयुष्य खूप छान जायला लागलं . इथे दिवस भरभर जात होते . ती आईबरोबर अष्टविनायक करून आली आणि आई तिच्यासाठी म्हणून केरळ ला आली . दोघींना पण आपण एकमेकींसाठी आहोत याचा खूप आनंद होत होता , नव्याने सापडलेलं नातं दोघीही मनापासून उपभोगत होत्या .
बघता बघता दोन वर्ष निघून गेली . आता मात्र आईला तिच्या लग्नाचे वेध लागले . आणि ती मात्र विषय टाळायला लागली . मात्र या सगळ्यामुळे तिला जे घडलं होतं ते आठवल आणि पहिल्यांदाच जाणीव झाली , हे ओझ घेवून आपण लग्न नाही करू शकत .
एके दिवशी ऑफिस मध्ये काम करत असताना कुणीतरी अचानक समोर येवून उभं राहिलं . तिने मन वर करून पाहिलं . वरद . ती दचकली . तो खूप हरवल्यासारखा दिसत होता , बारीक झाला हित , डोळे खोल गेले होते .
"काय हवंय ?" नकळत खूप कोरडेपणाने तिने विचारले ?
" तुझ्याशी बोलायचं आहे " त्याच आवाज पण खूप खोल गेला होता
" मला वेळ नाही , खूप काम आहेत मला "
" नाही म्हणू नको गं मला , खूप धाडस करून आलो आहे इथं मी . हात जोडतो तुझ्यापुढे . खूप वेळ नाही घेणार तुझा ." तो गयावया करत म्हणाला . तिला आश्चर्याचा धक्का बसला  आणी नकळत बोलून गेली ती ,"ठीक आहे , लंच मध्ये भेटू . ऑफिस समोर सुखसागर म्हणून हॉटेल आहे तिथे ये १वाजता . "
" खूप उपकार झाले गं " त्याने हात जोडले
तो गेला आणी मुग्धाच कामातलं लक्ष उडालं . काय  झालाय याचं ? असा काय झाला आहे हा ? काय बोलायचं असेल ? ते पण एवढ्या दिवसांनी ?
कसाबसा १वाजेपर्यंत वेळ काढला तिने . आणि ती हॉटेल कडे गेली . तो आधीच आला होता .
"काही खाणार का ? "
"नको "
" थोडं  घे गं  , प्लीज ." त्याने आर्जवाने म्हटलं , तिला नाही म्हणता आलं नाही .
त्याने कॉफी आणी सॅंण्डविचेस् मागवली. "बोल आता , माझ्याकडे फारसा वेळ नाही " .
" माफ कर माल . मी तुझा अपराधी आहे गं . मला त्याची जाणीव नव्हती . आपल्याच मस्तीत होतो मी . जोपर्यंत सॅली भेटली नाही , तोपर्यंत मुलीना वापरून सोडून द्यायचं असतं , असाच वाटत राहिलं मला . खूप चुकलं गं माझं" म्हणून त्यानं ओंजळीत चेहरा लपवून रडायला सुरवात केली .
मुग्धाला आपण काय करावं हे कळेना . ती गप्प बसली . थोडा शांत झाल्यावर वरद ने परत बोलायला सुरवात केली ," तू निघून गेल्यावर मला काहीही फरक पडला नाही . किंवा तुझ मी काय करून ठेवलं होता याचाही . कारण मला भेटलेल्या मुलीपण अशाच होत्या, फारशा न गुंताणाऱ्या . माझी मौजमजा चालुच होती . आणी त्यातचं ती भेटली , सॅली. तुझ्याच जागेवर आली . सुंदर , हुशार आणि खूपच छान होती . कुणीही प्रेमात पडावी अशी .
मी तर तिला बघितल्यावर पागलच झालो . एकदम प्रेमात पडलो . तिच्याशिवाय जगण व्यर्थ आहे असं वाटायला लागलं.  एकत्र काम करत असल्यामुळं तिचा सहवास पण भरपूर होता . तिच्या  वागण्याने  आणि हुशारीने तर  जास्तच आवडायला लागली मला ती . तिच्याशिवाय मला काही सुचेना . ती पण खूप जवळ येत गेली . बाकी मुलींबद्दल जसं वाटायचं तसं सॅलीबद्दल वाटत नव्हत . तिच्याबद्दल फक्त प्रेम होतं मनात . तिचं माझ्याबरोबर असणं खूप महत्वाचं वाटत होत मला . तिच्याशिवाय एकही क्षण काढणं म्हणजे शिक्षा वाटत होती मला . मी तिला काहीही सांगितलं नव्हत पण तिला कल्पना आली असावी . माझे सगळे दिवस आनंदाने भरलेले होते . ती म्हणेल ते करायची तयारी होती माझी . अगदी उंच कड्यावरून उडी मार म्हणाली असती तरी , मी मारली असती .
जवळपास ६ महिन्यांनी मी तिला मागणी घालायची ठरवली . तिला लोणावळा खूप आवडायचं . म्हणून मग तिकडेच तिला घेवून जायचं ठरवलं . मी तिला विचारल्यावर ती हो म्हणाली . तिला बहुतेक अंदाज आला होता . लोणावळ्याला पोहोचल्यावर एका छानशा ठिकाणी नेलं तिला मी . तिथे पोहोचल्यावर तिला एक टपोरं लाल गुलाबाचं फुल दिलं . आणि सिनेमात दाखवतात तसा तिच्यापुढे गुडघे टेकून , तिच्यासाठी घेतलेली हिऱ्याची अंगठी पुढे करत तिला म्हणालो ,' सॅली, आयुष्य खूप सुंदर आहे . पण , त्याला जर सुंदर साथ मिळाली तर ते अजूनच सुंदर होतं . मला तुझ्या साथीने माझं आयुष्य सुंदर करायचं आहे . तुझ माझ अस्तित्व एकचं असावं असं वाटतंय मला . माझ्या आयुष्याला अर्थ तुझ्यामुळे मिळणार आहे . तू आणि मी एक व्हावं असं वाटतंय मला . होशील का गं माझी ? विरघळशील माझ्यात ?'
सॅली खूप लाजली . तिने पुढे केलेल्या बोटात मी अंगठी चढवली आणि तिला मिठीत घेतलं . मी पूर्ण झालो होतो .
आजही लाजलेली सॅली आठवली कि पीळ पडतो माझ्या मनाला . माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता तो . आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो , नवीन आयुष्याची स्वप्नं रंगवत होतो .
पण आयुष्य किती क्रूर असतं गं . मी तुझ्याशी जे वाईट वागली त्याचा बदला म्हणून देवाने माझी सॅली माझ्यापासून दूर केली . " वरद चा गळा भरून आला . मुग्धा शांत बसली होती .
" आम्ही परत येत असताना एका ट्रक ने धडक दिली आम्हाला . सॅली जागच्या जागी गेली . मी बेशुद्ध होतो आठवडाभर . शुद्धीत आलो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या हातात ती अंगठी ठेवली . आणि मला कळलं आपण आता कायमचे एकटे राहिलो . दोन महिन्यात मी बरा झालो . पण मनाच्या जखमा भरून येत नाहीत गं . तुला मी दिलेल्या जखमा पण तशाच असतील . सॅली शिवाय येणारा प्रत्येक दिवस माझ्या यातना वाढवत होता . मला जगणं  नकोसं करत होता . माझी अवस्था बघून आईने मानसोपचार तज्ञाला दाखवले मला . त्यांच्या उपचाराने मला बंर वाटत होतं . पण मनावरच ओझं काही उतरत नव्हत . असंच  एके दिवशी मी डॉक्टरांना तुझ्याबद्दल सांगितलं . आणि त्यांनी मला माझीचूक सांगितली . तुझी माफी मागायला सांगितली . खंर सांगतो मुग्धा , तुझी माफी मागायची ठरवली आणि मला खूप हलक वाटलं . खूप धाडस करून आज तुझ्यापुढे उभा आहे मी . माझ खूप चुकलं गं , माफ कर मला " त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि हात जोडून उभा होता तो .
मुग्धाच्या डोळ्यात अश्रु होते आणी मनात खळबळ . खूप वाईट वाटत होता तिला . तो कसाही असला तरी एकेकाळी प्रेम केलं होत तिने त्याच्यावर .
तिथून निघताना पहिल्यांदा खूप मोकळं वाटत होतं तिला . एवढ्या दिवसातली अपराधी पानाची जाणीव नाहीशी झाली होती . खांदे पाडून पाठमोऱ्या चालणाऱ्या वरद कडे पाहून देवाला साकडं घातलं तिने ,'याला सुखी ठेव'.




Tuesday, 2 December 2014

मुग्धा - 4

असेच ३-४ महिने निघुन गेले. . एवढ्या वेळात आॅफीसच्या पार्टीच्या नावाखाली तिघेही १-२ वेळा रात्री जेवायला गेले, सिनेमाला गेले. त्यावेळी ती आणि वरद जवळ बसले होते. त्याच्या अधुन मधुन होणा-या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उठत होते.
यातच एकदा त्याने 'माझ्या घरी येशील का ?' म्हणून विचारले . शिल्पाला सांगू नको म्हणून सांगायलाही विसरला नाही तो . तिला आपण जगाच्या सर्वोच्च स्थानी असल्यासारखं वाटलं . काय करू आणि काय नको . माझ्या आईला आवडेल तुला भेटायला . असं म्हटल्यावर तर स्वर्ग दोन बोटं उरला तिला .
ती खूप खुश होती , अजून घरी सांगितलं नव्हत तिने . पण, अलीकडे आईच्या बोलण्याच काही वाटेनास झालं होतं . तरीपण आईला न सांगता असं त्याच्या घरी जाणं म्हणजे काहीतरी धाडसी वाटत होतं मुग्धा ला . आई आजपर्यंत जे काही वागली , जो काही मनाचा चुराडा तिने केला , त्या सगळ्याचा बदला घेतल्यासारखा वाटत होता . आपल्याला वरद मिळणार असेल तर अजून काहीही नको , इथपर्यंत विचार गेले तिचे .
तिच्या आईला तिचं वागण खूप खटकत होतं . नवीन कपडे घेणं , बाहेर जेवायला जाणं , सिनेमाला जाणं , काही काहीच बरं वाटत नव्हतं . येणाऱ्या सगळ्या स्थळांना ती नकार देत सुटली होती , त्यामुळं आई अजूनच अस्वस्थ होत होती . फक्त नोकरी चांगली आहे म्हणून आई टोकाला जात नव्हती .
पण आज मात्र , सुट्टीच्या दिवशी , नटून थाटून बाहेर जाणाऱ्या आपल्या लेकीला तिने जर वैतागुनच विचारले ," आता कुठे दौरा ? घरी नाही का बसता येत?"
" अगं तुला मधे बोलले नव्हते का मी ?ऑफिस मध्यल्या सगळ्याजणी मिळून आम्ही बाहेर जेवायला जाणार आहोत ते? तू माझी वाट बघत बसू नको , मी किल्ली घेतली आहे . तू जेव आणि झोप . " मुग्धाचं बोलणं ऐकुन , आई चिडूनच म्हणाली ,
" हे बघ मुग्धा , या आधी पण सांगितलं होतं तुला , मला हि असली थेरं पसंत नाहीत . लग्न करायचं आहे तुझ , उगाच मुलाकडच्या लोकांच्या कानावर काही वाकडं तिकडं जाता कामा नये . "
"चुकलं माझं आई , शेवटचं जाऊन  येते . यापुढे नाही जाणार . आजच्यासाठी आधीच कबूल केलं होतं त्यांना . " अगदी गयावया करत बोलली . आजचा दिवस कोणत्याही परिस्थितीत चुकवायचा नव्हता तिला .
वरदने सांगितलेल्या खुणांवरून त्याचं घर शोधणं जड गेलं नाही तिला . आजूबाजूची वस्ती तशी बरी होती . ज्या इमारतीत त्याचा फ्लॅट होता ती पण चांगली दिसंत होती . तिच्यापण नकळत तिला हायसं वाटलं . लग्न झाल्यावर आपण इकडे राहणार या विचरानेच   लाजली ती . वरद चा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता आणि त्याला लिफ्ट होती , म्हणून बरं . तिला त्यांच घर आठवलं . एका साध्याशा बिन लिफ्ट च्या इमारतीत , चौथ्या मजल्यावर होत्या .
विचारांच्या धुंदीत तिने वरदच्या फ्लॅटची बेल कधी वाजवली , हे पण तिला कळलं नाही . एका तरुणाने दार उघडलं . " वरद , वरद इथेच राहतात का?" तिने थोडं आश्चर्याने विचारलं . "हो " ताडकन बोलून बोलून तो तरुण झपझप पायऱ्या उतरून गेला .
" ये गं मुग्धा , आत ये " वरद चा आवाज आला तशी ती आत गेली . घर मोठं नसावं असं  वाटलं तीला . हाॅल तरी लहान होता. घरात सामान पण फारसं दिसत नव्हतं . हाॅलमधून दुसऱ्या खोलीकडे जाणारया वाटेवर उभं राहून वरद बोलत होता . त्या बाजूला बहुतेक दोन खोल्या आहेत , तिच्या मनात आले . सोफ्याकडे बोट दाखवत वरद म्हणाला ," बैस बैस . मी पाणी घेवुन येतो . आता गेला तो माझा मित्र . आमचा जरा वाद झाला म्हणून तो भांडून गेला आहे . येईल परत . तू बैस , मी पाणी आणतो ".
त्याच्या मनमोकळ्या खुलाशाने तिला बंर वाटलं . घरात अजून कुठलाच आवाज येत नव्हता . तिला थोडं आश्चर्य वाटलं . याची आई कुठं गेली ? तिच्या मनात आलं आणी तेवढ्यात पाणी घेवून वरद आला . मस्तपैकी ट्रे मधून काचेच्या पेल्यातील पाणी बघून तिला एकदम हसू आलं .
" काय झालं ?"
" काही नाही रे , खूप छान वाटलं ".
तिच्या हातात पाणी देवून वरद तिच्या जवळ बसला. त्याला आपल्या इतकं जवळ बसलेलं बघून लाजली ती . त्याच्या स्पर्शाने अंगावर रोमांच आले .
"वरद , आई कुठे आहे रे ?"

" आई ? अगं आई इथे राहत नाही . ती गावाकडे असते . इथे मी आणि  मगाशी गेला तो मित्र , असे आम्ही दोघेच राहतो."
मुग्धा दचकली आणि पटकन उभी राहिली . " मी त्यांना भेटायला आले होते , निघते अरे मी . " तिच्या हाताला धरून खाली बसवत वरद म्हणाला ," तुला आवडत नाही का गं मी ? तुझ्याबरोबर अज्जिबात वेळ मिळत नाही म्हणून तुला इथे बोलावलं . आणि तू निघालीस .?" वरद अशा  पद्धतीने म्हणाला कि मुग्धा पटकन खाली बसली . वरद तीच्या बोटांत बोटं अडकवून , तिच्या डोळ्यात डोळे घालून कानात कुजबुजत म्हणाला ," मला तू खूप आवडतेस मुग्ध . अगदी मनात लपवून ठेवावी अशी. तू खूप सुंदर आहेस . मला खूप आवडतेस ". तिला त्याचा श्वास आपल्या कानावर जाणवत होता. त्यामुळे येणारे शरीरातील उमाळे थांबवण तिला शक्य झालं नाही . तो अजूनच जवळ सरकला .
साधारण दोन तासांनी दारावरची बेल वाजली . त्याने गडबडीने तिच्या अंगावर कपडे फेकले . आणी "आलो आलो " अशी आरोळी ठोकली .  ती दचकली , आपल्या आयुष्यातल्या इतक्या सुंदर प्रसंगाची अशी सांगता ? पण तिला विचार करायला फारसा वेळ न देता, तो तिला कपडे घालायची घाई करायला लागला . ती बेसिन पुढे उभे राहून विस्कटलेले केस आणि चेहरा सरळ करत असतानाच त्याने दार उघडलं . तो मगाचा मित्र आत आला , तशी मुग्धाच्या हाताला धरून तिला जवळ जवळ ओढतच वरद खाली घेवून आला .
"काय झालं वरद ? आपण असे घाई गडबडीने खाली का आलो ? ". वरद काहीच बोलत नाहीये असं बघून मुग्धाच पुढे म्हणाली ," वरद , जेवायला जाऊया ना रे ?" तिच्याकडे एकदम वैतागून बघत वरद म्हणाला ," तू जा आता घरी , उद्या बोलू " तिच्या बोलण्याची वाटही न बघता तो सरळ इमारतीकडे चालायला लागला . तिला धक्का बसला . त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघतच राहिली , सुन्न होवून . कितीवेळ अशी उभी होती कोणास ठावून . रस्त्यावर मारलेल्या कर्कश होर्नमुळे दचकली आणी भानावर आली . आधी तिला आपण या इमारतीकडे का बघत आहोत हेच लक्षात येईना . मग हळू हळू मागे वळून ती रस्त्याकडे चालायला लागली . आपलं  काहीतरी हरवलं आहे असा वाटंत राहिलं तिला .
रिक्षातून परत येताना लागणाऱ्या गार वाऱ्याने जर बंर वाटलं तीला . मनातले विचार शांत व्हायला लागले . उद्या विचारू त्याला . नक्की काय झालं ते ? आणी लग्नाचं पण विचारू . आपण उगाचच असा विचार केला . त्याच नक्कीच प्रेम
असणार आपल्यावर . या विचारांबरोबर तिला खूप छान वाटलं . त्याचा स्पर्श आठवला आणि लाजली ती . त्याच धुंदीत
घरी कधी पोचली ते कळलंच नाही तिला .
आई झोपली होती म्हणून बरं. नाहीतर तिला आज तोंड देण खूप अवघड झालं असतं. ती झोपायला गेली , पण आज झोप लागणं शक्यंच नव्हतं . सगळ्या अंगभर सुखाच्या लाटा जाणवत होत्या तिला . ती तशीच पडून राहिली . पाहते कधीतरी डोळा लागला तिचा . आणि लगेच आईची हाक आली . आज अंग जड झालं असलं तरी मन मात्र ताजतवानं होतं . कधी एकदा ऑफिसला जाउन वरद ला बघू असं झालं होतं तिला . त्याला आवडणारा ड्रेस घालून ती ऑफिस ला निघाली . आई तिच्याकडेच  बघत होती . पण बोलली नाही काही . तिला थोडं विचित्र वाटलं . पण आज आईकडे लक्ष द्यायचा दिवस नव्हता. ती निघाली .
नेहमीप्रमाणं ती आपल्या जागेवर बसली . तिला वाटलं , तिला आलेली बघून वरद लगेच येईल . पण बराचवेळ झाला तरी तो काही आला नाही . मग तीच त्याच्या जागेकडे निघाली आणि वाटेतच थबकली . तो मीनाशी बोलत होता , तिच्या डोळ्यात डोळे घालून काहीतरी सांगत होता . मीना लाजत होती . मुग्धाच्या भोवती ऑफिस गर्र्कन फिरलं . तिचे डोळे भरून आले. ती पटकन आपल्या जागेवर येवून बसली . तेवढ्यात शिल्पा आली . मुग्धाच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताचं दचकली .
" काय गं ? काय झालं मुग्धा ? अशी का दिसते आहेस ? आईशी भांडण झालं का ? का साहेब काही बोलले ?"
मुग्धाच्या तोंडातून शब्दच फुटेना . शिल्पा च्या प्रेमळ बोलण्याने तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या . शिल्पाच्या लक्षात आलं कि काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात बिनसलं आहे . शिल्पा तिला घेवून बाहेर आली आणि सरांना सांगून येते म्हणून परत आत गेली . मुग्धा तशीच उभी राहिली , हरवल्यासारखी . तिला काही सुचत नव्हत . वरद असा का वागतो आहे आपल्याशी ? मीनाशी इतक्या जवळून काय बोलत असेल ? विचारांचा नुसता गुंता होता तिच्या . इतक्यात वरदाच बाहेर येताना दिसला . तिच्याकडे बघून बेफिकीरपणे हसत म्हणाला , " मंग ? मजा आली न काल ? " तिच्या उत्तराची वाट ही न बघता तो समोरच्या हॉटेल मध्ये शिरला .
ती थिजली . "मजा " शब्द तिच्या मस्तकात घण घातल्यासारखा आदळला . आपलं प्रेम , आपलं समर्पण म्हणजे मजा ?तिचं डोक भिरभिरायला लागलं , आणि तिला चक्कर आली . तेवढ्यात शिल्पा आली म्हणून बरं . तिने सावरलं . सरळ
रिक्षा केली आणि मुग्धाला घरी सोडलं . तिला असं घरी आलेलं  बघून आई घाबरली. तिने मुग्धाला झोपवलं . . दुपारच गरम गरम खायला घातलं. एरवी कटकट करणारी आई इतक्या प्रेमाने लागतेय हे तीला सहन झालं नाही . तीला एकदम खुप रडायला आलं.
आपल्याला नक्की काय होतंय हे कळेना तिला . वरद च्या वागण्याने खूप अस्वस्थ झाली होती ती . सगळी दुपार आणि संध्याकाळ अस्वस्थतेत गेली तीची . ससंध्याकाळी कुणीतरी बाहेर आलेलं जाणवलं तिला . आई कुणाशी तरी बोलत होती . ' हो हो आहे ती . बरी आहे आता . थांबा उठली आहे का बघते , म्हणत आई आत आली  . " मुग्धा साहेब आले आहेत गं तुझे " . तिला उठलेली बघून तिने हाॅल कडे बघून म्हटलं ," या सर , आत या ". मुग्धाला आश्चर्य वाटलं , सर ? इथे ? आणि तेवढ्यात वरद आत आला , त्याला बघून मुग्धा दचकली . हा ! इथे ? आई चहा आणते म्हणून आत गेली . वरद तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाल " कुठं काय झालं आहे तुला ? ठणठणीत तर दिसते आहेस . मी आज पण संध्याकाळचा बेत ठरवला होता , भेटायचा ." आणि वरद हसला . तिला एकदम किळस आली . इतक्यात आई आली . चहा घेवून , " उद्या बरी होवून ऑफिस ला ये " असं काहीसं म्हणत वरद निघून गेला . तिला हायसं वाटलं .
थोड्या धडधडत्या मनानेच दुसऱ्या दिवशी ती ऑफिस ला गेली . जागेवर बसत क्षणीच वरद तिच्या जवळ आला . " आज संध्याकाळी तू घरी यायचं आहेस . " थोडा दरडावून बोलला आणि निघून गेला . तिला घाम फुटला , हे काय चाललं आहे तिला काळात नव्हत . आपण याविषयी वरद शी बोलायलाच हवं हे मात्र लक्षात आलं तिच्या .
" वरद बोलायचं आहे मला तुझ्याशी . "
"बोल "
" नाही इथे नाही , आपण बाहेर जाऊ कुठेतरी "
" चल , समोरच जाऊ . म्हणजे पटकन येत येईल . आज कामं पण खूप आहेत ".
दोघ हॉटेल मध्ये जाऊन बसले .
" वरद , काय झालाय  तुला ? असा का वागतो आहेस ? " भरल्या गळ्याने तिने विचारले .
"कुठं काय झालं आहे मला ? असा काय वागलो आहे मी तुझ्याशी ?"
"तू , तू मला असा का विचरतो आहेस सारखं ? "
" ते ? तुला नाही आवडलं का ? बघ मुग्धा , मला तू आवडलीस आणि तुला पण मी आवडतो म्हणून मी घरी बोलावलं तुला . राजीखुशीचा मामला आहे अगं सगळा "
"तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते ? मी तसली मुलगी नाही . माझं तुझ्यावर प्रेम आहे , म्हणून …"
वरद खो खो हसायला लागला ," प्रेम ? कोणत्या जमान्यात राहतेस अगं तू ? "
" म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही ? " तिचा आवाज तिलाच ओळखता येईना .
" नाही , मी कधीतरी म्हटलं का कि माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? तू जर बरी दिसतेस पण मी प्रेम करावं एवढी चांगली नाहीस . वेळ घालवायला चांगली आहेस , बस्स . तू प्रेम वगैरे शब्द वापरणार असलीस तर आपण लांबच राहू ".

क्रमश:






Monday, 1 December 2014

मुग्धा - 3

आज सकाळ तशी आळसावलेली होती. घड्याळात बघितले आणि ती दचकलीच , एक तास उशीर झाला होता तिला . त्यात आईने तिच्या नावाने ठणाणा सुरु केला . आईपेक्षा आज वरद महत्वाचा होता तिला त्यामुळे आईच्या बोलण्याकडे तीने लक्ष दिलं नाही आणि आवरायला सुरवात केली . एवढ्या वर्षात पहिल्यांदाच तिला जाणवलं कि आपल्याकडे एकही ड्रेस चांगला नाही. खट्टू झाली ती . त्यातल्यात्यात बरा ड्रेस घालून ती ऑफिस ला गेली आणि जाताजाताचं तिने ठरवलं कि आपण शिल्पा ला विचारु , आपल्याबरोबर खरेदीला येशील  का म्हणून . तिला कळंत यातलं खूप . आणि तसंही कितीही झालं तरी ती एकटीच अशी होती जिची मदत होवू शकली असती. ऑफिस मध्ये आल्याआल्या तिची नजर वरदला शोधत शोधत त्याच्यावर जाउन स्थिरावली आणि तो  आपल्याकडेचं बघतो आहे म्हटल्यावर दचकली . खाली मान घालून धडधडत्या हृदयाने आपल्या जागेवर येवून बसली .
दुपारी शिल्पा जेवायला हाक मारेपर्यंत ती तशीच काम करत राहिली . जेवण हसत खेळत पार पडलं. म्हणजे वरद आणि शिल्पा हसत होते , गप्पा मारत होते आणि मुग्धा मात्र मान खाली घालून त्यांच बोलण ऐकत होती. १-२ वेळा दोघांनी तिला गप्पात ओढायचा प्रयत्न केला . पण ती गप्प राहिलेली बघून त्यांनी परत आग्रह केला नाही .
जेवून परत आल्यावर मात्र ती शिल्पाच्या जागेवर गेली . "शिल्पा , माझं एक का आहे . मदत करशील का गं?"
"बोल ना , काय झालं?"
"अगं मला थोडी खरेदी करायची आहे , येशील का ? जावूया का आज ? "
"आज? बंर ,  सांगते घरी आईला , जाऊया आपण ".
मुग्धा एकदम खुश झाली , शक्य असतं तर , लगेचंच गेली असती ती . संध्याकाळी दोघींनी मिळून तिच्यासाठी चांगले ५-६ ड्रेस घेतले . ती सगळे ड्रेस शिल्पाच्या आवडीचे घेत होती. शेवटी परत निघताना शिल्पा म्हणाली पण तिला , "काय गं ? काय विशेष आहे आज ? एकदम एवढे सगळे ड्रेस आणि ते पण माझ्या आवडीचे ? "
"काही विशेष नाही गं . तुला कळंत त्यातलं म्हणून."
"हो ? पण हा साक्षात्कार आता कसा झाला बाई ? एका वर्षाने ? शहाणे , सहा महिन्यापूर्वी तुला चांगले ड्रेस घे म्हटलं तर आजीबाई किती घाबरल्या होत्या ? मग आता काय झालं ? थांब , थांब काही बोलू नको . हा वरदइफेक्ट नाही ना ? बोल , बोल ?"
तीच बोलण एकूण मुग्धा खूप लाजली . हिला कसं कळंल ? नकळतच तिची मान नाही नाही म्हणत खाली गेली . तशी शिल्पाने हसायला सुरवात केली . "अगं लाजू नको इतकी , मला हा बदल आवडला तुझ्यातला म्हणून चेष्टा केली फक्त ". तरीपण शिल्पा जे समजायचं ते समजली .
दुस-या दिवशी नवीन ड्रेस घालताना तिच्या मनात आलं , वरद बघेल न ? त्याला ड्रेस आवडेल न ? त्याच्या लक्षात येईल का ? काय म्हणेल तो आपल्याला ? त्याला समजेल आपल्याला तो आवडला आहे ते ? हा विचार मनात येताच लाजली ती . आणि पटापट आवरून ऑफिस ला पोहोचली . काळाच्या प्रसंगाची पुनरावृत्ती नको म्हणून सरळ खाली मान घालून ती जागेवर गेली . खरतर ती आत आली तसा वरद तिच्याकडेच बघत होता . आणि त्याला तिच्यातला बदल जसा लक्षात आला तसं त्याच्या चेहऱ्यावर स्मित आलं . तो उठून तिच्याकडे गेला ,
"आज काहीतरी विशेष आहे का ?"
"न नाही ", ती गडबडली आणि बघतच राहिली त्याच्याकडे . "नाही म्हणजे ऑफिस मधे काही असेल तर माहिती नाही मला "
"अगं ऑफिसबद्दल नाही विचारात आहे तुला , खूप छान दिसते आहेस आज . "
त्याच्या बोलण्यावर लाजली ती आणि वरद च्या तोंडातून हलकी शीळ बाहेर पडली . तेवढ्यात मागून येत शिल्पा म्हणाली ,"वरद, अरे तू बोलतो आहेस , हेच विशेष आहे तिच्यासाठी ". मुग्धाला अगदी कानकोंड झालं .
अशी कशी हि शिल्पा ? काहीही सांगतेय . असं बोलतात का ? उगाच नेलं काल आपण तिला . इकडे वरद आणि शिल्पा हसत होते . शिल्पा तेवढं बोलून निघून गेली , तसा वरद तिला म्हणाला , "खरंच का गं ? काहीही असलं तरी खूप छान दिसते आहेस तू आज ". हे आईकून तिने मान वर केली , तर वरद तिच्या डोळ्यांमधेच बघत होता . ती लाजली . आज मात्र जेवताना तीच लक्ष पूर्णपणे वरद कडेच होतं. तो काय खातोय , काय बोलतोय आणि तिला जाणवल कि ओ पण आपल्याकडे बघत असतो .
 हे असं रोजच घडायला लागंल आता . ती ऑफिस ला पोहोचल्यावर वरद जर बोलायला आला नाही तर चुकल्याचुकल्या सारखं व्हायला लागलं . आता तर ती पण आपणहून त्याच्याशी बोलायला जायला लागली . आणि तिचं जगचं जणु स्वप्नांचं होवून गेलं . आजूबाजूला काय चाललं आहे यातलं लक्ष उडालं तिचं . तिच्यासाठी सगळीकडे वरदचं  असायला लागला . पण , अलीकडे शिल्पा ला मात्र आपण तिसरे असल्यासारखं वाटायला लागलं . आणि तिने मुग्धाला वरद वरून चिडवायला सुरवात केली . मुग्धाच्या स्वप्नांना पंख फुटले आणि तिने लग्नाची स्वप्न रंगवायला सुरवात केली .

क्रमशः