Monday, 24 November 2014

मंगला

अशीच एक संध्याकाळ, भिजलेली, आणि मुंबई -पुणे हायवे वरून गाडी घेवून एकटीच निघालेली  मी . चिंब वातावरण आणि हिरवाई बघून भजी खायची खूप इच्छा झाली. आणि एका वळणावर ती दिसली , छोटीशी टपरी . जशी टपरी जवळ आली तसा कांदा भजी आणि चहाचा मस्त वास आला . लगेच गाडी थांबवली. टपरी वर एक तरुणी होती . तिला म्हटलं , " मला एक गरम गरम कांदा भजी आणि आल्याचा चहा दे". ती खुदकन हसली आणि म्हणाली , "बसा तर ताई , आत्ता देते तुमास्नी ".
दोनचं मिनिटांत गरम गरम भजीची प्लेट समोर आली . वासानं खाऊन घेतली आधी भजी ती . मस्त वाटलं एकदम . पहिली भजी तोंडात घातली आणि जिभेची तृप्तता झाली . चहा टाकून तिने विचारलं ,"आवडली का ताई भजी ?" "खूप सुंदर झाली आहे गं , अगदी मनाची चव आली आहे तिला ". तिला हसू फुटलं . आणि मग ती माझ्या समोर येवून बसली . आम्ही गप्पा मारायला लागलो .
तसंपण रहदारी कमी होती त्या दिवशी त्यामुळे वेळ होता बहुतेक तिच्याकडे . कोण , कुठली ? इथे इतक्या लांब कशी टपरी टाकली ? वगैरे प्रश्न सुरु झाले माझे. कदाचित तिला पण कुणाशीतरी बोलावसं वाटंत असेल. तिने बोलायला सुरवात केली .
"माझ नाव मंगला, ताई. जवळच्याच खेड्यात राहते. एकटीच टपरी चालवते . तसं हाकेवर एक पान बिडीच दुकान आहे बघा . जे गावातली अजून एक बाई सांभाळते . इथे कायबी धोका नाही . आम्ही बरोबर येतो आणि बरोबर जातो . तसे खूप मिळत नाहीत पैसे इथे पण खायचे वांधे होत नाहीत . आणि पावसाळ्यात लोक बरीच थांबतात . काहीतर नेहमीचे गिर्हाईक आहेत आता. "
इतक्यात कोपर्यातून रडण्याचा आवाज आला. बघितलं तर एक १-१/२ वर्षाचं पोर रडंत उठलं . ती लगबगीने तिकडे गेली . तिच्याकडे बघितल्यावर फारतर १८-१९ वर्षाची दिसत होती . ना कपाळावर कुंकू ना गळ्यात मंगळसूत्र. बोलण्यावरून थोडीफार शिकलेली असावी असं वाटलं .
तिने शांत केलं बाळाला आणि जोजवून झोपवलं परत त्याला. "ताई , माझी मुलगी आहे ,सरस्वती . आज , हट्ट केला म्हणून आणलं , नाहीतर आत्या सांभाळते तिला".
"म्हणजे तुझी सासू नाही ? आणि नवरा काय करतो ? कुठं असतो तो ? ". माझे प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं . मला कळेना , आपलं काही चुकलं का ? थोडी शांत होवून म्हणाली ," ताई , १६ वर्षांची होते . घरी आई -बाबा , भाऊ , सगळेच होते . माझे मामा -मामी पण शेजारच्याच गावात राहायचे . माझी नुकतीच दहावीची परीक्षा झाली होती . अभ्यास चांगला झाला होता त्यामुळं मला चांगले गुण मिळणारचं होते. माझा भाऊ माझ्यापेक्षा ३ वर्षांनी लहान , बाबांची नोकरी चांगली होती . आई घरीच असायची . मला काका - काकु वगैरे कुणी नाहीत . माझी दहावीची परीक्षा झाली , माझ्या भावाची पण परीक्षा संपली . शाळेला सुट्ट्या सुरु झाल्या. मला गणपतीपुळे बघायचं होतं, तसा मी बाबांकडे हट्ट धरला . बाबा एवढ्यात नको म्हणत होते , त्यांनी खूप समजावयाचा प्रयत्न केला . पण मी काहीही ऐकायला तयार नव्हते . म्हणतात न ताई , वेळ आली कि कुणाचं काही चालंत नाही  .माझंपण तसाच झालं असावं . बाबा म्हणत होते , कि हे पैसे तुला पुढं काॅलेज ला जायला लागतील . पण मी काहीच ऐकलं नाही ." तिचे डोळे परत भरून आले . काहीतरी कडू आठवण असावी असं वाटलं मला.
थोडी शांत होवून पुढं सांगायला लागली ती , " बाबा कसेतरी तयार झाले . मी मामा - मामीला पण तयार केलं. मामी नाहीच म्हणत होती .   छोटुला जमणार नाही म्हणत होती . पण माझ्या हट्टापुढे तीच काही चाललं नाही. शेवटी आम्ही ट्रॅक्स ने निघालो. आमचं दर्शन खूप छान झालं. परत येताना सगळे खूप आनंदी होतो. पण सकाळी लवकर उठून निघाल्यामुळे सगळेच पेंगुळले होतो . बहुतेक गाडीचा ड्रायवर पण पेंगुळला असावा . एका वळणावर गाडी कधी दगडाला धडकली आणि खाली दरीत घसरली हे कुणालाच कळलं नाही . काय घडतंय काही कळत नव्हतं. खूप अंग दुखत होतं . मला जाग आली ती हॉस्पिटल मध्ये. हातापायाला बॅण्डेज होतं. मला क्षणांत सगळं आठवलं. आणि मी आजूबाजूला बघितलं . माझ्या पलीकडच्या कॉट वर मामा दिसला मला, डोक्याला आणि हाताला बॅण्डेज लावलेला . पण बाकीच कुणीच दिसलं नाही. मी आई बाबा भाऊ दिसतातं का बघायचा प्रयत्न केला . थोडी उठले आणि मस्तकात कळ गेली . तेवढ्यात शेजारी असलेली नर्स पुढे आली आणि म्हणाली ," अज्जिबात उठायचं नाही . खूप लागंल आहे तुला". "माझे आई-बाबा कुठे आहेत ?" मी विचारलं . तर काहीच न बोलत पाठमोरी होत म्हणाली , 'कशाला दारुडे ड्रायवर घेवून जातात कुणास ठावूक? सगळ्यात जास्त आमचीच धावपळ '.
मी गप्प बसले , एकदम शांत झाले . मामाकडे बघताना लक्षात आलं कि मामी आणि छोटू पण दिसत नाही आहेत . मग वाटलं कि ते बरे असतील म्हणून सगळे बाहेर थांबले असतील . पण आई कशी नाही माझ्याजवळ ? एवढ लागलय मला आणि हि बाहेर काय करतेय? मला खूप राग यायला लागला तिचा . पण औषधाच्या परिणामामुळे मी फार वेळ जागी नाही राहू शकले आणि परत झोपले . कितीवेळ झाला काय माहिती ? कानाशी कुणीतरी कुजबुजत आहे असा वाटल्यामुळे मी डोळे उघडायचा प्रयत्न केला . पण ते इतके जड झाले होते कि उघडेचनात. तेवढ्यात मगाच्याच नर्स चा आवाज आला , ' डॉक्टर, मगाशी शुद्धीवर आली होती, आता परत झोपलेली दिसतेय.' 'सांगितलं का तिला कि फक्त ती आणि पलीकडचा माणूस , दोघंच वाचले आहेत म्हणून ", बहुतेक डॉक्टरांचा आवाज होता.
मी सुन्न झाले . फक्त मामा आणि मी ? आई, बाबा , भाऊ , मामी . छोटू सगळेच गेले ? मला काही कळंतच नव्हतं. काय झालं हे ? माझ्या भोवती सगळं तशाच अवस्थेत गरगरत राहिलं . माझ्या दुखा:मुळे मला बरं व्हायला जरा वेळ लागला .
मी बरी होवून घरी आले , मामाच्या . कारण , माझ्या घरी आता कुणी नव्हतंच . मला सारखी आई -बाबांची आठवण यायची . डोळ्यातून पाणी यायचं सारखं . मामा पण बदलला होता . बोलयचाचं नाही माझ्याशी . असेच ७-८ महिने निघून गेले . शेजारच्या काकुंशी  ओळख झाली होती . त्या मला स्वयंपाक शिकवत होत्या , माझ्याशी बोलत होत्या . त्यांच्यामुळे मला खूप बरं वाटत होतं.
असंच एका रात्री सगळं आवरून अंथरुणात पडले होते मी . विचार तर सुरूच होते , आता पुढे काय करावं ? मामा तर कॉलेज बद्दल काहीच बोलत नव्हता . आपणच विषय काढावा का? का काही काम करावं ? मामा ला पण फारसे पैसे मिळायचे नाहीत . काहीतरी काम केलं तर त्याला पण मदत मिळेल. आजच काकू विचारत होत्या , पापड लाटशील का म्हणून . १० पापडांचे २ रुपये मिळतील . विचार  करता करता कधी झोप लागली कळलीच नाही. रात्री अचानक जाग आली . माझ्या अंगावरून कुणीतरी हात फिरवत होतं . मी उठायचा प्रयत्न केला तसं माझ्या तोंडावर हात दाबून तो म्हणाला 'तुझ्या मामाला १००० रुपये रोख दिलेत तुझ्यासाठी , आवाज काढलास तर मुडदा गाडीन तुझा . ' मी खूप घाबरले . तेवढ्यात त्याने माझी ओढणी तोंडावर बांधली , आता माझा आवाज पण बाहेर येईना . मला कळलं माझ्या मामाचा मित्र होता तो . अलीकडं सारखा घरी यायचा आणि टक लावून पाहायचा . मला खूप त्रास व्हायला लागला , खूप कळा यायला लागल्या आणि माझी शुद्ध हरपली ." मंगला थोडी थांबली . टपरीमध्ये  पाणी घेवून शांत बसली . तिच्या चेहऱ्यावरची खळबळचं सांगत होती कि हिने खूप सोसंल आहे .
" मला जाग आली तशी घरात कुणी न्हवत . दरवाजाला बाहेरून कडी होती . मी उठायचा प्रयत्न केला पण माझ्या अंगातून एक जीवघेणी कळ आली . तशीच पडून राहिले मी . थोड्यावेळाने उठले . आणि थंड पाणी अंगावर ओतून घेतलं . मला त्या आठवणीने मळमळंत होतं . भरपूर रडत होते मी . काय झालं हे असं वाटंत होतं . आई - बाबांची खुर आठवण येत होती . आईच्या कुशीत जावसं वाटत होत मला . तशीच पडून राहिले मंग काहीही न खाता . दुपारी कधीतरी दार उघडलं आणि मामा आला . वडापाव माझ्याकडे फेकत म्हणाला  'सटवे , तुझ्या हट्टामुळे माझी बायको आणि छोटू मेले . माझी एकुलती एक बहिण गेली . कुटं फेडशील पाप हे ? बघंच आता कसं हाल करतो तुझं ते !' रागानं मामाचा चेहरा अगदी विचित्र दिसत होता . मी घाबरले . आता मला कळंल होतं मामा असा का वागतोय ते ? मला खूप भीती वाटायला लागली . काय करावं ते समजेना . मामा तसाच निघून गेला . दाराला बाहेरून कडी घालून . रडून रडून दमल्यावर झोपले मी . आणि रात्री परत तसंच झालं सगळं . माझं मन धसंकल , आपंल काही खरं नाही हे कळलं .
दुसर्या दिवशी मामा घरात नाही बघून मी शेजारच्या काकुंना जोरजोरात हाका मारल्या . काकुंनी कसंबसं कुलूप तोडलं आणि दरवाजा उघडला . माझी अवस्था बघून त्या पण घाबरल्या . पण डोक्यावर हात फिरवून मायेनी विचारलं त्यांनी 'काय झालं ग मंगल ?' मी हंबरडाच फोडला आणि सगळं सांगितलं त्यांना . कसं असतं मन ताई , जरा मायेचा स्पर्श मिळाला कि सगळं बोलुन टाकतं. त्या मला त्यांच्या घरी घेवून गेल्या. आणि लगेच मुलाला बोलावून घेतलं .  काकूंचा मुलगा पोलिसात होता .  त्यांनी त्याला सांगितलं संगळ. तो म्हणाला ,' पोलिसात तक्रार दिली तर हिला रिमांड होम मध्ये जावं लागेल कारण अजून लहान आहे हि. ' काकू म्हणाल्या 'अरे, तिथं तरी अत्याचार होणार नाही कशावरून ? त्यापेक्षा त्या दोघांना अद्दल घडेल असं काहीतरी कर आणि हि राहील इथेच माझ्याजवळ . तू पण इथे असत नाहीस . मला सोबत होईल हिची . ' ऐकून मला इतकं बंर वाटलं . ताई , जगात देव असाच असतो . माणसांच्या रुपात भेटतो बघा . काकूंच्या मुलाने पोलिस ठाण्यात नेवुन त्या दोघांना भरपूर बडवलं आणि ताकीद केली परत या गावात पाय ठेवायचा नाही म्हणून . माझा मामा आणी त्याचा मित्र त्यानंतर दिसलेच नाहीत कुटं.
माझं परत एकदा नवीन आयुष्य सुरु झालं काकूंबरोबर . पण देव माझी परीक्षा घेण काही सोडत न्हवता बघा . माझी पाळी चुकली . आणि काकू म्हणाल्या तुझं सगळं आयुष्य पडलं आहे पुढं, आताच ठरव . ताई , माझं आयुष्य संपलंच होतं . एवढं झाल्यावर परत एका जीवाचा बळी घ्यायचं पाप कसं करणार हो ? काकुंना पण समजावलं . आणि जे झालं होत त्यात जन्माला येणाऱ्या जीवाचा काय दोष हो ? काकुना हे पटलं . त्या तयार झाल्या , पण गाव? ५०-६० घरांच्या गावात काही लपत नाही . गावात सगळ्यांना कळलं बघा . आणि मग एका सकाळी गावाचे पंच काकूंच्या दारात आले . ते म्हणायला लागले काकू आम्ही तुमचा आदर करतो , पण हि घाण इथं नको . उद्या आमच्या पोरी बाळींची लग्न हिच्यामुळ व्हायची न्हाईत.
मग मीच म्हटलं पंचांना , 'तुमी काकुना बोलू नका , मी जात्ये इथून '.
सगळे पंच निघून गेल्यावर काकू म्हणाल्या ,' कुटं जाणार गं तू ? '. मला एक लांबची आत्या होती . कधीमधी आमच्याकडं यायची . ती आठवली . काकुना सांगितलं आणि काकुनी पत्र लिहिलं तिला , माझ लग्न केलं मामानं गडबडीत आणि नवरा मेला . आता गरोदर असलेल्या मला माझ्या सासरचे सांभाळायला तयार नाहीत . मामाचा पत्ता नाही कुठं , तुम्ही येवून घेवून जा .' ती आत्या आली . गरीब विधवा असणारी हि आत्या मात्र स्वभावानं फार चांगली होती. तिला बाबांनी अधे मध्ये केलेल्या मदतीची खूप जाणं होती . तसंपण तिला मुलबाळ काही न्हवत , त्यामुळ माझा आधार मिळेल असं वाटलं तिला '. निघताना काकुनी हातात २०० रुपये ठेवले आणि जप म्हणून सांगितलं .डोळे भरुन आले माझे. 
तेव्हापासून इथेच आहे. मला शिकायला मिळालं नाही . माझ्या आयुष्याची वाट लागली . पण सरस्वतीला शिकवून मोठ करायचं आहे आता  . तिचं माझ्यासारखं होवु नये म्हणून रोज थोडे पैशे बाजूला ठेवते मी . मला तिला खूप मोठी झालेली बघायचं आहे ताई . "
सांगताना तिचे चमकणारे डोळे बघतंच राहिले मी . पुढ्यातली भजी कधीच थंड होवून गेली होती . पण आता काही खायची इच्छा पण न्हवती . चहा घेतला आणि मी निघाले .
समोरच आभाळ मोकळं झालं होतं आता . पण मन ? ते कळतंच नव्हत , मोकळं झालाय का भरून आलंय ते .



3 comments:

  1. Kata aala angavar katha vachtana.. Mast katha..lihit raha..:-)

    ReplyDelete
  2. लेखन बहरत चाललंय ...विविधता येत आहे,खुपच छान. आता focus shift होऊ देऊ नका.अभिनंदन

    ReplyDelete
  3. लेखन बहरत चाललंय ...विविधता येत आहे,खुपच छान. आता focus shift होऊ देऊ नका.अभिनंदन

    ReplyDelete