Wednesday, 4 March 2015

मृण्मयी -३

मनु कशीबशी स्वतःला सांभाळत घरी आली . स्वतःच्या खोलीमध्ये बसून पोटभर रडावसं वाटत होत तिला . तीने पर्स टेबलावर ठेवली , आणि काकूने हाक मारली . काकूचा चिडका आवाज ऐकून धडकीच भरली तिला . ती हाॅल मध्ये आली . काका पण तिथेच होते , त्यांचा चेहरा पडला होता आणि काकू रागाने लालबुंद झाली होती. ती जशी हाॅल मध्ये आली तशी काकू कडाडली ,
" लाज नाही वाटत तुला ? मैत्रिणीच्या होणा-या नव-यावर डोळा ठेवायला ?"
मनु बघतच राहिली . आपण काही बोलायला हवं हे पण सुचलं नाही तिला .
" आई - बाबा विना पोर म्हणून पोटच्या पोरीप्रमाणे वाढवली तुला , ते काय असले खेळ करायला ?"
हे शब्द तिच्या कानात सळईप्रमाणे घुसले आणि ती बधिर झाली . सगळ अंग गरम झालं तीच , कानशिलं तापली . काकू काय बोलतेय हे पण कळेनासं झालं . काकू कदाचित बराच वेळ बोलत होती , मग काकांनी तिला आत नेलं . तिला शांत करून ते बाहेर आले आणि त्यांना मनु खाली कोसळलेली दिसली .
मनु ला जेव्हा जाग आली तेव्हा आपलं डोकं खूप जड झालंय हे जाणवलं . तिला पटकन आपण कुठे आहोत हे कळेचना . तिने परत डोळे मिटले आणि काकांचा हात कपाळावर जाणवून उघडले . आता तिच्या लक्षात आलं . ती हाॅल मधेच सोफ्यावर झोपली होती , आणि काका शेजारी बसले होते , चिंताग्रस्त .
"कसं वाटतंय बाळा ?" काकांनी खूप प्रेमाने विचारलं .
मनुने बोलायचं प्रयत्न केला , पण तिच्या तोंडातून शद्ब फुटला नाही . आपल्या तोंडाला कोरड पडलेली जाणवली तिला.
"थोडं पाणी घेतेस का ?" काकांनी परत विचारलं . तिने मान डोलावली . काकांनी तिच्या मानेखाली हात देवून तिला उठवलं आणि तिच्या हातात पाण्याच भांड दिलं . पाणी पिल्यावर तिला थोडी हुशारी वाटली .
आणि काय झालं होतं ते पण आठवलं . बघता बघता तिचे डोळे भरून आले . हुंदका दाबून ती म्हणाली ," काका, यात... "
तिला तिथेच थांबवत काका म्हणाले ,
"मनु , शांत हो बाळा . मला काय नक्की झालं हे माहिती  नसलं तरी तुझी यात चूक नसणारच . माझे संस्कार इतके तकलादू असूच शकत नाहीत . तू शांत हो आणि नंतर सांग मला काय झालय ते . इथे नक्कीच काहीतरी समजण्यात घोटाळा आहे ".
काकांच्या बोलण्याने मनुचा हुंदका बाहेर पडला . तिने मीत भेटल्यापासून जे जे घडलं होतं , ते सगळं काकांना सांगितलं . काका गंभीर झाले , " तुझी काहीच चूक नाहीये मनु , पण यापुढे तू त्यांच्याबरोबर जात जाऊ नको . काकूची समजूत कशी काढायची ते मी बघतो ".
आई - बाबा गेल्यावर काका जेव्हा पहिल्यांदा तिला घरी घेवून आले तेव्हापासून तिने सतत काकुच्या कपाळावर आठ्याच पहिल्या होत्या . पण काकांच्या प्रेमाच्या बळावर ती सगळं सहन करत होती . काकाचं तिच्यावर आणि तीच काकांवर खूप प्रेम होतं . प्रत्येकवेळी काका तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते , आत्तापण ते तसेच तिच्या पाठीशी होते , तिला कसलाही दोष न देता .
मनु आपल्या खोलीत आली . तीच डोकं अजूनही दुखंत होतं.तिने डोकेदुखीवरची गोळी घेतली आणि बघता बघता गाढ झोपली. रात्रीत कधीतरी जाग आली तिला . किती वाजले बघण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला , तर मीत चे २-३ मेसेजेस आले होते . तिने whats app उघडलं .
'I'm really sorry मनु . रेणुने जे काही केलं त्याबद्दल खरंच , मनापासून माफी मागतो तुझी . तिने तुझ्या घरी पण फोन केला म्हणून सांगितलं मला . सगळ ठीक आहे नं ?
दुसरा मेसेज होता , 'मनु , तू खूप disturb झाली असशील माहिती आहे मला . हे सगळं माझ्यामुळे झालं , पण काय करू गं ? तुझ्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही मी '.
तिसरा मेसेज होता ,' मनु , एकदा भेटशील का गं मला ? फक्त एकदा . आपण दोघेच . रेणू नको . please ?'
मनु ला काय करावं कळेना . जे झालं ते सगळं आठवंत होतं तिला आणि दुसरीकडे आपल्याला please लिहिताना मीत चा चेहरा किती केविलवाणा झाला असेल , असं पण वाटंत होतं .
तेवढ्यात परत एक मेसेज आला ,' मनु online दिसते आहेस . तूच आहेस नं ?' तिने काहीच उत्तर दिलं नाही .
परत मेसेज आला ,' बोल मनु . तूच आहेस नं ? '
'हो ' तिने शेवटी उत्तर दिलं .
'भेट नं एकदा , please '.
'मीत , अरे कसं शक्य आहे ? '
'का शक्य नाही ? मला एकदा भेटून सगळं सांगू तर दे तुला . '
मनु ला कळेना काय लिहावं यावर , खरंच एकदा भेटायला काय हरकत आहे ? आणि तसंपण एवढ सगळं झाल्यावर आपल्याला नक्की काय घडलंय हे जाणून घ्यायचा हक़्क़ तर आहेच .
'मनु ????' मीत ने परत बीप केलं .
'ठीक आहे ' मनुने शेवटी हो म्हणून टाकलं .
'thank you so much my dear . उद्या साधारण ११ वाजता तू बाजारापाशी उभी रहा . मी गाडी घेवून येतो आहे . आपण किल्ल्यावर जाउन येवू .'
'इतक्या लांब ?'
'हो , कारण तिथे आपल्याला बोलतां येईल आणि कुणी बघणार पण नाही '
'हं , ठीक आहे '.
उद्या मीत काय बोलेल याचा विचार करत करत तिला झोप लागली .
"काकु , संध्याकाळी थोडी उशिरा येईन . ऑफिस मध्ये थोडं काम आहे आणि नंतर जेवण पण ".
मनुला सहाच महिने झाले होते नोकरी करायला सुरवात करून  , आणि तिथेच तिला रेणुका भेटली होती आणि नंतर मीत .
जेवणाच कारण तिने मुद्दाम काकूला सांगितलं होतं . मीत ला भेटून आल्यावर तिला काकु समोर जायची इच्छा नव्हती. आॅफीस मधे फोन करुन तीने ती येत नसल्याच कळवलं .
तिने बाजारात फिरून थोडा वेळ काढला . तिथल्या आवाजांनी जर बरं वाटलं , निदान तिच्या डोक्यातले विचार बाजूला पडले . ठरलेल्या वेळी मीत आला आणि ती त्याच्या गाडीत बसली . बसताना कुणी बघत नाहीये याची खात्री करून घेतली तिने .
किल्ल्यावर पोहोचेपर्यंत दोघेही एकमेकांशी काहीही बोलले नाहीत . तिथे पोहोचल्यावर तिथल्या बागेत दोघेही जाउन बसले . कुणीच काही बोलत नव्हंत  . शेवटी मीत नेच सुरवात केली .
"मनु , मला खूप काही सांगायचं आहे तुला ."
"बोल नं ", मनूच्या गळ्याशी आवंढा आला एकदम .
"रेणू जे काही बोलली त्याबद्दल माफी मागतो मी तुझी ", असा म्हणून त्याने खरंच तिच्यापुढे हात जोडले . तिने नकळत त्याच्या हातांवर आपले हात ठेवले आणि म्हणाली ,
"नको रे मीत , यात तुझी काहीच चूक नाहीये . माझं नशिबच असं आहे ", डोळे भरून आले तिचे आणि तिला जाणवलं आपण मीत च्या हातांवर हात ठेवले आहेत . तिने गडबडीने ते बाजूला केले , पण तोपर्यंत मीत नेच तिचे हात पकडले .
" मनु , रडू नको. मी तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत . चूक माझीच आहे गं . मी आधीच बोलायला हवं होत हे सगळ्यांशी .रेणु ला मी आवडतो हे माहिती आहे मला , आमच्या घरी आमच्या लग्नाची बोलणी पण सुरु होती . पण माझ्यापाशी अजून कुणी शब्द काढला नव्हता . मला तिच्या पपांच्या business मध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये गं . मला माझ्या बळावर सगळं उभं करायचं आहे . पण माझ्या पप्पानी आणि त्यांनी मिळून जे काय ठरवलं होतं त्यातलं मला काहीच माहिती नव्हतं .
आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हाच तू आवडलीस मला. हळू हळू तुझ्यामध्ये गुंतत गेलो. तुला सगळं सांगायचं ठरवलं पण धीर झाला नव्हता . तू नाही म्हणाली असतीस तर मला सहन झालं नसतं. माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर . आणि मला माझं आयुष्य तुझ्याबरोबरच काढायचं आहे . "
"पण , मग रेणूशी झालेला साखरपुडा ?".
"सांगतो मनु , सगळं सांगतो . रेणूने त्या दिवशी हॉटेल मध्ये हंगामा केल्यावर मी घरी जाउन पप्पांशी बोललो . आणि त्यांनी मला emotionally blackmail केलं . आई गेल्यावर त्यांनीच माझं सगळं केलं होतं. वय असूनही दुसरं लग्न करायचं टाळलं त्यांनी . या लग्नानी  माझच भलं होणार आहे हे त्यांच्या मनानी घेतलं होतं . आणि त्यापुढे ते माझं काहीही ऐकायला तयार नव्हते . त्याच दिवशी रात्री रेणूचे पप्पा आमच्या घरी आले , आणि साखरपुडा ठरवून गेले . पप्पानी मला गप्प राहायला सांगितलं , स्वतःची शप्पथ घातली . मला काही करता आलं नाही गं ." बोलता  बोलता मीत चा गळा भरून आला.
"पण आता नाही . मला रेणू बरोबर लग्न करायचं नाही . मला तुझ्याबरोबर राहायचं आहे . गेले दोन दिवस माझी प्रचंड घुसमट होतेय . न जेवण जातंय अन झोप येतेय . डोळ्यापुढे सारखा तुझा हॉटेल मधला रडवेला चेहरा उभा राहतोय . मी साखरपुडा तोडून टाकतोय. पण मला तुझी साथ हवीये . देशील ना ग मनु मला साथ ? ". त्याचा काकुळतीचा स्वर एकुन  मनुला कसतरीच झालं .
"मित "
"नाही म्हणू नको मनु , मी जगू शकणार नाही तुझ्याशिवाय . माझ जग मला तुझ्याबरोबर हवंय. बोल मनु , देशील नं साथ ?"
मनुचे पाणावलेले डोळे त्याच्याकडे बघतच राहिले .
" मीत , मी … मी … ".
"नाही म्हणालीस तर आत्ता जीव देईन ". असा म्हणून मीत उठला पण . मनु धसकली. तिने पटकन मीत चा हात धरला .
" देईन , तू म्हणशील तशी साथ देईन तुला ". मीत खाली बसला . मनुकडे बघत म्हणाला ,"मनु , कसा सांगू तुला , मला आज काय वाटतय ते ?. या जगात जर सगळ्यात आनंदी कोण असेल , तर तो मीच आहे . ". त्याच्या हस-या चेहऱ्याकडे मनु बघतच राहिली आणि मंग हळू हळू त्या आनंदाची लागण तिला पण झाली . सगळ विसरून तिने मीत च्या खांद्यावर डोकं टेकलं आणि डोळे मिटून घेतले.





No comments:

Post a Comment